समांतर क्रांती / खानापूर
विद्यमान संचालक मंडळाने नोकर भरतीत गैरव्यवहार केल्याचा आरोप विरोधक विकास पॅनेलने केला आहे. प्रत्यक्षात, त्या पॅनेलमध्ये तीन विद्यमान संचालकांचा समावेश आहे. त्यांना नोकरभरती कशी झाली याबद्दल माहिती नाही का? नोकर भरती कुणाच्या देखरेखीखाली होते, याची माहिती नसलेले हे अशिक्षीत लोक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत आहेत, असा टोला विद्यमान संचालक मंडळाच्या सहकार पॅनेलने लगावला आहे.
बॅंकेची प्रगती आणि सभासदांचा विकास न पाहवणाऱ्यांनी बँकेच्या व्यवहाराबद्दल वावड्या उठविल्या आहेत. नोकर भरती ही सहकार खात्याच्या नियमावलीनुसार संयुक्त निबंधकांच्या देखरेखीखाली झाली आहे. बँकेच्या विस्ताराचा विचार करून आम्ही तीन नव्या शाखांना मंजुरी मिळविली. तेथे कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्यानेच नियमानुसार भरती प्रक्रीया राबविण्यात आली आहे. मेरिटनुसार कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली असून त्यात कोणाचाही हस्तक्षेप अथवा गैरव्यवहाराला थारा देण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण विद्यमान चेअरमन अमृत शेलार यांनी संचालकांच्यावतीने दिले.
बँकेने शतक महोत्सवी वर्ष पूर्ण केलेले असून बँकेचा विकास आणि सभासदांचे हित साधण्यासाठी तीन नव्या शाखा सुरू करण्यात आल्या. त्यामुळे बँकेला तोटा सहन करावा लागत असल्याच्या आरोप होत आहे, तो पूर्णत: बिनबुडाचा आहे. बिडी, पारिश्वाड आणि गोवावेस-बेळगाव येथील शाखांनी तीन महिन्यात साडेसात कोटींचे कर्ज वितरीत केले आहे. तिन्ही शाखा नफ्यात आहेत. या तीनही शाखांना रिझर्व्ह बँकेने दिलेली परवानगी हीच आमच्या पारदर्शक कार्याची पोचपावती आणि बँक प्रगतीपथावर असल्याचा पुरावा आहे, हे मतदारांना माहीत आहे, असेही अमृत शेलार यांनी यावेळी पत्रकार परिषदेत नमूद केले.
आमच्यावर आरोप करतांना आमच्यासह बँकेत संचालक म्हणून कार्यरत असणाऱ्या दोघा संचालकांनी स्वत:चे मुल्यांकन करायला हवे. त्या दोन्ही संचालकांना मनमानी करण्यास आम्ही वाव देत नसल्यानेच त्यांनी विद्यमान संचालक मंडळातून फुटून वेगळी चूल मांडली. नोकरभरती गैरव्यवहार केला असता तर याच मंडळींना फायदा झाला असता. पण, मुळात कायद्याने तसे करता येत नसल्याने त्यांचे नमसुबे धुळीस मिळाले आहेत, त्याच रागातून त्यांनी दुसरे पॅनेल काढून आम्हाला बदनाम करण्याचा फुकटचा अट्टाहास चालविला आहे.पण, मतदार सुज्ञ असून त्यांना त्यांची जागा दाखवतील, यात आम्हाला अजिबात शंका नाही, असा ठाम विश्वास अमृत शेलार यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी त्यांच्यासमवेत उमेदवार परशराम गुरव, विठ्ठल गुरव, मेघश्याम घाडी, चंद्रकांत पाटील, रविंद्र देसाई, रमेश नार्वेकर, अंजली कोडोळी, अंजुबाई गुरव, विजय गुरव, मारूती पाटील, मारूती बिलावर, अनिल बुरूड आदींसह त्यांचे समर्थक उपस्थित होते.
आम्ही नेहमीच विद्यमान संचालक मंडळासोबत राहिलो आहोत. अनेक वादळं झेलून येथील संचालकांनी वेळोवेळी बँक वाचविण्यासाठी केलेली धडपड आम्ही पाहिली आहे. सध्या कांहीना विद्यमान संचालकांना बाजुला सारून बँक ताब्यात घेण्याची स्वप्न पडू लागली आहेत. पण, ते योग्य नाही. बँकेची प्रगती साधण्यासाठी विद्यमान संचालक मंडळ कार्यरत राहणे गरजेचे आहे. शतक महोत्सव साजरा करण्याची संधी मतदारांनी त्यांना देऊन त्यांनी आजपर्यंत दिलेल्या योगदानाची पोचपावती द्यायला हवी. त्यासाठी सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांना मतदान करावे असे आवाहन करतो.
- श्री. अरविंद पाटील, माजी आमदार, संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक, बेळगाव
शेतकऱ्यांची लुबाडणूक: खुशालीची झाली खंडणी; संकटात ऊसतोडणी
समांतर क्रांती / खानापूर एकीकडे दरवाढ न देऊन साखर कारखाने शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. तर दुसरीकडे ऊस तोडणीसाठी ऊसतोड कामगारांचे मुकादम आणि वाहतुकदार ट्रक चालक खुशालीच्या नावाखाली लुबाडणूक करीत आहेत. तोडणीचे दर दिवसागणीक बदलत असून टोळी मालक प्रतिटन ५०० ते ६०० रुपये मागत आहेत, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. खानापूर तालुक्यातील एकमेव सहकारी साखर कारखाना सध्या […]