समांतर क्रांती विशेष / चेतन लक्केबैलकर
खानापूर तालुक्याचा पश्चिम भाग हा कुतुहल जागविणारा आणि निसर्गाने ओंजळभरून विष्कार केलेला परिसर आहे. अनेक गमती-जमती आणि अफलातून अशा रहस्यकथा या भागात अनुभवायास मिळतात. देवाला तंबाखू, सुपारी, दारू चालत नाही, अशी समातन धारणा हिंदू संस्कृतीत आहे. पण, तालक्याच्या पश्चिम भागात जंगलवाटेवर एका देवाला मात्र पान,सुपारी, तंबाखू आणि दारूचा नैवेद्य देण्याची परंपरा आहे. त्यामागील आख्यायिका आणि इतिहासही रंजक असाच आहे. जावे त्यांच्या गावा..
भीमगड अभयारण्यात प्रवेश केल्यानंतर नेरसे आणि पुढे सायाचा माळ ओलांडल्यानंतर कोंगळा गावाच्या अलिकडे एक कोंबड्याचे खुराडे वाटावे असे मंदिर दिसते. त्यातील मूर्ती नक्की कोणत्या देवाची हे निश्चितपणे सांगता येत नाही. मात्र, या रस्त्यावरून प्रवास करणारा प्रत्येकजण तेथे कांही काळ थबकतो. आपणाला ज्याचे व्यसन आहे, त्याचे पदार्थ या देवाला अर्पण करतो आणि पुढे मार्गस्त होतो. त्याबाबत अनेक रंजक आणि कुतुहल जागविणाऱ्या अख्यायिका सांगितल्या जातात. पण, खरा इतिहास वेगळाच आहे. त्याला ऐतिहासिक पुरावेदेखील आहेत.
हा मार्ग गवाळीपर्यंत जातो इतकीच त्रटक माहिती उपलब्ध आहे. खूपच झाले तर हा मार्ग छ. शिवराय आणि छ. संभाजी राजेंचा पदस्पर्श झालेल्या भीमगडापर्यंत जातो, असे कांही जण सांगतात. प्रत्यक्षात मात्र या मार्गाचा इतिहास हा गोव्याच्या उगमापासून असावा असे मानले जाते. गोव्यातून थेट गवाळी ते नेरसे आणि पुढे गुंजी, सावरगाळीतून आनंदगड आणि पुढे नंदगड तसेच कित्तूरपर्यंत हा अखंड मार्ग असावा, असे अभ्यासकांचे मत आहे. याबाबत कांही पोर्तूगीज आणि ब्रिटीश प्रवाशांनी लेखनदेखील केले आहे. आजदेखील या मार्गाची नोंद सरकारी दप्तरात सापडते.
गोव्यातील तत्कालीन व्यापारी याच मार्गाने नारळ, मद्य आणि मासळी, पोफळी, मीठ नंदगडच्या बाजारात विकायला आणायचे. आता जसे भीमगडाचे जंगल दाट आहे, त्याहून अधिक ते त्याकाळी असावे. हे व्यापारी जातांना नंदगडमधून सुताचे कपडे आणि किराणा माल घेऊन जायचे. त्यांना या घनदाट जंगलातून प्रवास करतांना कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नये, यासाठी ते कोंगळ्याजवळच्या या देवाला त्यांच्याकडे असलेल्या वस्तूंचा नैवेद्य दाखवायचे. त्यामुळे ही परंपरा सुरू झाली. वाट सूकर व्हावी, म्हणून आजदेखील या मार्गाने मार्गस्त होणारे प्रवासी तंबाखू, पान-सुपारीसह दारूचाही नैवेद्य दाखवितात. प्रत्यक्षात त्याकाळात व्यापाऱ्यांकडे याच वस्तू असायच्या म्हणून त्याचा नैवेद्य म्हणून वापर केला गेला असावा.
या परंपरेबाबत कोंगळा येथील ग्रा.पं.माजी सदस्य जयंवत गावकर यांना विचारले असता, आम्ही एकदा रस्ता करीत असतांना हे देवस्थान आढळले. तो देव नवसाला पावतो अशी या परिसरातील लोकांची धारणा आहे. त्यामुळे नवस फेडतांना देवासमोर घंटा बांधली जाते. नैवेद्य म्हणून तंबाखू वगैरे ठेवले जातात. या देवाविशयी कुणालाच अधिक माहिती नसल्याचे त्यांनी ‘समांतर क्रांती’ला सांगितले. लोक मात्र तेथे थांबल्याशिवाय पुढे एक पाऊलही टाकत नाहीत. इतकच काय तर वनखात्याचे लोकही त्या देवाला अव्हेरण्याचे धाडस करीत नाहीत. तो जंगलाचा राखणदार असल्याचे मानले जाते. कांहीही असो, पण श्रध्देला मोल नाही आणि श्रध्देशिवाय प्रवास सुखकर नाही, हेच खरे..
One thought on “‘या’ देवाला लागतो, तंबाखू-सुपारी आणि दारूचा नैवेद्य..”