कारवार: उत्तर कन्नड लोकसभा मतदार संघासाठी खानापूर तालुक्यातून चार जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. एकुण १७ उमेदवारांनी २९ अर्ज दाखल केले आहेत. उद्या शनिवारी (ता.२०) अर्जांची छाणणी होणार आहे. तर २२ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे यातील किती जण रिंगणात राहणार याबद्दलचे चित्र सोमवारी (ता.२२) स्पष्ट होईल, अशी माहिती निवडणूक अधिकारी गंगुबाई मानकर यांनी ‘समांतर क्रांती’शी बोलतांना दिली.
खानापूर तालुक्यातून काँग्रेसच्या डॉ. अंजली हेमंत निंबाळकर (दोन अर्ज), म.ए.समितीचे निरंजन उदयसिंह सरदेसाई (तीन अर्ज), अपक्ष म्हणून कृष्णाजी पुंडलीक (के.पी.) पाटील (दोन अर्ज) तर राजशेखर शंकर हिंडलगी (कोडचवाड) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी काँग्रेसच्या डॉ. अंजली निंबाळकर यांनी दोन वेळा विधानसभेची निवडणूक लढविली असून त्या एकदा खानापूरच्या आमदार राहिल्या आहेत. त्यांना निवडणुकीचा अनुभव आहे. के.पी. पाटील यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून अर्ज दाखल केला होता. पण, छाणणीत त्यांचा अर्ज अवैध ठरला होता. आता पुन्हा त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
म.ए.समितीचे निरंजन सरदेसाई हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात राहणार आहेत. यापूर्वी त्यांनी कोणतीही निवडणूक लढविलेली नाही. ते स्वत: एम.बी.ए. शिकलेले असल्याने निवडणुकीचे व्यवस्थापन कसे करणार याकडे समिती नेत्यांसह जनतेचे लक्ष लागले आहे. राजशेखर हिंडलगी हेदेखील नवखे असून त्यांनीही यापूर्वी कोणतीच निवडणूक लढविलेली नाही. ते माघार घेतील, अशी अटकळ आहे.
शिरसीतून सर्वाधीक पाच उमेदवार
शिरसी तालुक्यातून भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे यांच्यासह अन्य चार जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यात कृष्णा हणमंतप्पा बळेगार (तीन अर्ज), प्रमोद मोहन मडगावकर, उमेश कृष्णाप्पा दैवज्ञ, उत्तमा प्रजाकीय पार्टीचे सुनिल देवेंद्र पवार यांचा समावेश आहे. एकाच तालुक्यातील अन्य चार उमेदवारांनी अर्ज दाखल करून एकप्रकारे भाजपबद्दलची नाराजीच व्यक्त केली आहे.
इतर उमेदवार असे..
कारवारमधून कर्नाटक राष्ट्र समितीचे विनायक मंगेश नाईक (दोन अर्ज) व नागराज अनंत शिराळी या अपक्षाने उमेदवारी अर्ज भरले आहेत. गोकर्ण येथील सुजय सुधीर गोकर्ण, सिध्दापूरचे अरविंद सिताराम गौडा, कुमठ्याचे राष्ट्रीय जनसभावना पक्षाचे उमेदवार नागराज श्रीधर शेट, होन्नावरच्या रुपा गजानन नाईक, मुंदगोडचे एसयुसीआय (कम्युनिस्ट) पक्षाचे गणपती वेंकटरमण्णा हेगडे आणि चिदानंद हणमंतप्पा हरिजन यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उद्या शनिवारी अर्जांची छाणणी आणि सोमवारी (ता.२२) रोजी माघार घेतल्यानंतर किती उमेदवार रिंगणात राहणार हे स्पष्ट होईल.
‘कित्तूर’मध्ये डॉ. अंजली निंबाळकरांच्या प्रचाराचा झंझावात
कित्तूर: काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या प्रचाराचा झंझावात शुक्रवारी (ता.१९) कित्तूर तालुक्यातील कळभांवी आणि कादरवल्ली येथे पहावयास मिळाला. आमदार बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली कित्तूर तालुक्यातील अनेक गावात प्रचार रॅलीसह सभांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. अंजली निंबाळकर यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. कित्तूरने आतापर्यंत भाजपला सहकार्य केले, पण […]