३० वर्षांच्या निष्क्रीय राजकारणाला मुठमाती द्या: डॉ. निंबाळकर
खानापूर: इतर शहरांच्या तुलनेत आपले शहर अजूनही अनेक सुविधांपासून वंचीत आहे. केंद्राकडून या शहराच्या विकासासाठी प्रयत्न व्हायला हवेत. पण, गेल्या ३० वर्षात निष्क्रीय भाजप खासदारामुळे कोणतीच योजना येथे राबविली गेलेली नाही. मला कर्मभूमीच्या विकासासाठी मला संधी देऊन ३० वर्षांच्या निष्क्रीय राजकारणाला मुठमाती द्या, असे आवाहन काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी केले.
मंगळवारी (ता.३०) खानापूर शहरातून प्रचार पदयात्रा काढण्यात आली. यावेळी त्यांनी प्रारंभी शिवस्मारकातील छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर महालक्ष्मी, संत ज्ञानेश्वर, रवळनाथ आणि चौराशी मंदिरात जाऊन देव-देवतांचे दर्शन घेतले. शहरात पत्रके वाटून तसेच नागरीक आणि व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांनी काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले.
पुढे बोलतांना डॉ. अंजली निंबाळकर म्हणाल्या, खानापूर शहराने मला एकदा विकास करण्याची आणि समस्या सोडविण्याची संधी दिली. पुन्हा एकदा तालुक्याच्या समस्या दिल्ली दरबारी मांडण्याची संधी माझ्या कर्मभूमीतील जनता देईल, यावर माझा विश्वास आहे. गेल्या तीस वर्षात भाजपच्या खासदारांनी आणि स्थानिक नेत्यांनी खानापूरच्या जनतेला खोटी अश्वासने देऊन झुलवत ठेवले आहे. खानापूर शहरातील नव्याने बांधकाम होत असलेले हायटेक बसस्थानक आणि महिला व बाल चिकित्सा हॉस्पीटल ही माझ्या आमदारकीच्या काळातील महत्वाकांक्षी कामे आहेत. यापुढील काळात देशातील क्रमांक एकचे शहर बनविण्यासाठी मी कार्यरत राहीन.
यावेळी बोलतांना ॲड. ईश्वर घाडी यांनी भाजपवर तोफ डागली. ते म्हणाले, भाजपचे गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे सगळेच नेते खोटारडे आहेत. कर्नाटकात सत्तापालट झाल्याचा राग ठेवून राज्य सरकारला हक्काचा निधी दिला जात नाही. तरी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी सर्वोच्च न्यायालयात हक्काच्या निधीसाठी दाद मागितली. आपल्या राज्यातील जनतेच्या सेवेसाठी केवळ काँग्रेसचे सरकारच योगदान देऊ शकते. तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी डॉ. अंजली निंबाळकरांना विजयी करणे, ही काळाची गरज आहे.
यावेळी यशवंत बिर्जे, विनायक मुतगेकर, नगरसेवक लक्ष्मण मादार, तोहीद चांदखन्नावर, महादेव घाडी, चंबान्ना होसमनी, दत्ता देसाई, अभीषेक होसमनी यांच्यासह अनेक कार्यकर्ते प्रचारफेरी सहभागी झाले होते.
—
काँग्रेसच्या नेत्यांनी आवळली वज्रमूठ; ही तर भाजपच्या पराभवाची नांदी
कारवार: काँग्रेसमधील नेत्यांत कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. त्याउलट भाजपच्या नेत्यांची चलबिचलता जनतेसमोर आहे. उत्तर कन्नड मतदार संघातील सर्व काँग्रेस नेते यावेळी डॉ. अंजली निंबाळकर यांना विजयी करण्यासाठी वज्रमूठ आवळली आहे. भाजपचे आमदार, खासदारदेखील भाजपच्या सोबत नाही, ही भाजपच्या पराभवाची नांदी आहे, असे मत माजी खासदार मार्गारेट अल्वा यांनी कारवार येथील नेत्यांच्या बैठकीनंतर व्यक्त केले. तब्बल […]