भात पिकांचे नुकसान; तालुकाभर उच्छांद
समांतर क्रांती / खानापूर
दोन दिवसांपूर्वी भटवाडा-कामतगा परिसरात मुक्त संचार करणाऱ्या हत्तीच्या कळपांनी आता माणिकवाडी परिसरात मोर्चा वळविला आहे. मंगळवारी हत्तींनी माणिकवाडी क्रॉसजवळील गुंजाप्पा घाडी यांच्या भाताच्या वळींचे हत्तींनी नुकसान केले. हातातोंडाला आलेले पीक मातीमोल होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून तालुक्यातील शेतकऱ्यांना हत्ती समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तब्बल नऊ हत्तींच्या एका कळपाने दक्षिण भागातील गुंजी वनपरिक्षेत्रात उच्छांद मांडला आहे. दोन दिवसांपूर्वी हा कळप भटवाडा, भालके, वाटरा आणि कामतगा परिसरात वावरत होता. त्या कळपातील पाच हत्ती भटवाडा तर चार हत्ती कामतगा परिसरात होते. त्यातील एका कळपाने माणिकवाडी परिसरात मोर्चा वळविला आहे. माणिकवाडी येथील शेतकरी गुंजाप्पा घाडी यांच्या शेतातील भात वळी कोसळून भात पीक हत्तींनी पायदळी तुडविले आहे. बेळगाव-पणजी महामार्गावर त्यांचा वावर असून या परिसरातील भातपीकाचे त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
एका टस्कराने पूर्व भागातील कोडचवाड परिसरात तळ ठोकला आहे. मुबलक पाणी आणि उसाचे मळे यामुळे हा टस्कर या भागात स्थिरावला आहे. सध्या उसतोडणी सुरू असल्याने शेतकऱ्यांचा शिवारातील वावर वाढला आहे. पण, टस्कराच्या भितीमुळे शेतकरी शिवारात जाण्यास धजेनासे झाले आहेत. दिपावळीपर्यंत पावसाने हजेरी लावल्यामुळे यंदा भातकापणी हंगाम लांबला होता. आता पावसाने उसंत दिल्यानंतर भातकापणी आणि मळणीच्या कामांना वेग आला असला तरी मजुरांअभावी पुन्हा शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे. हत्तींच्या तावडीतून शिल्लक राहिलेले पिक घरी घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडत आहे.
तालुक्याच्या दक्षिण आणि पूर्व भागात हत्तींनी हाहाकार माजविला असतांना वनखात्याकडून केवळ सतर्कतेचा इशारा दिला जात आहे. हत्तींना जंगलात हुसकावून लावण्यासाठी कोणत्याच प्रकारच्या उपाययोजना वनखात्याकडून योजल्या जात नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. एरवी, तालुक्याचे तारणहार असल्याच्या तोऱ्यात वावरणारे तालुक्यातील नेत्यांची दातखिळी बसली असल्याने प्रशासन निद्रिस्त आहे.
..म्हणे ३१ मार्चपर्यंत विज्ञान शिक्षक देऊ
समांतर क्रांती / खानापूर जून महिन्यापासून विज्ञान शिक्षक नाही, त्यामुळे या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. जवळपास मार्च-एप्रिलदरम्यान परिक्षा होणार आहेत. असे असतांना तात्काळ शिक्षकाची नियुक्ती करण्याऐवजी ३१ मार्चपर्यंत शिक्षक देऊ असे आश्वासन येथील शिक्षणाधिकाऱ्यांनी देत जणू अकलेचे तारे तोडले आहेत. विशेष म्हणजे शिरोली येथील आंदोलनकर्त्यांनीदेखील त्यांच्या या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले आहे. परिणामी, आंदोलन […]