समांतर क्रांती / खानापूर
जून महिन्यापासून विज्ञान शिक्षक नाही, त्यामुळे या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. जवळपास मार्च-एप्रिलदरम्यान परिक्षा होणार आहेत. असे असतांना तात्काळ शिक्षकाची नियुक्ती करण्याऐवजी ३१ मार्चपर्यंत शिक्षक देऊ असे आश्वासन येथील शिक्षणाधिकाऱ्यांनी देत जणू अकलेचे तारे तोडले आहेत. विशेष म्हणजे शिरोली येथील आंदोलनकर्त्यांनीदेखील त्यांच्या या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले आहे. परिणामी, आंदोलन हे केवळ फार्स ठरले आहे. तालुक्यातील शिरोली माध्यमिक शाळेत शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून विज्ञान शिक्षक नाही. त्यामुळे आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील एकही प्रकरण शिकविले गेलेले नाही. वारंवार मागणी करूनही शिक्षण खात्याकडून याकडे कानाडोळा केला जात आहे. शैक्षणिक नुकसान सहन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज बुधवारी येथील शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. विज्ञान शिक्षक देण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली. सकाळपासून दुपारपर्यंत उन्हात बसून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे खात्यातील अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नव्हते. दुपारी शिक्षणाधिकारी राजश्री कुडची या विद्यार्थ्यांना भेटल्या. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या पालकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरत विज्ञान शिक्षकाची कायमस्वरूपी नियुक्ती कधी करणार अशी विचारणा केली. पण, त्यांनी थातूरमातूर उत्तरे देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. शेवटी ३१ मार्चपर्यंत कायमस्वरूपी शिक्षक देण्याचे मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. सध्या विज्ञान विषयाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेणार असल्याचे श्रीमती कुडची यांनी सांगितले आहे.
काँग्रेस अध्यक्षांकडून आंदोलकांची भेट
यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष ॲड.ईश्वर घाडी यांनी आंदोलकांची भेट घेऊन समस्या जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी शिक्षणाधिकारी श्रीमती कुडची यांच्याशी चर्चा केली. त्यांनी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांशी दुरध्वनीवरून संपर्क साधून कायमस्वरूपी शिक्षकाच्या नियुक्तीची मागणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत विनायक मुतगेकर, विजय मादार,अशोक मादार, महादेव शिओलकर, सुशील देसाई, सागर तिनेकर तसेच शिरोली परिसरातील नागरीक उपस्थित होते.
अभ्यासक्रम कसा पूर्ण करणार?
शिक्षण खात्याकडून ३१ मार्चपर्यंत शिक्षकाची नियुक्ती करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. जून महिन्यापासून आतापर्यंत एकही प्रकरण शिकविले गेलेले नाही. मार्च महिन्याच्या सुमारास परिक्षा असतात. त्यामुळे कायमस्वरूपी शिक्षकाअभावी तिन्ही वर्गातील विज्ञानाचा अभ्यासक्रम कसा पूर्ण केला जाणार? असा प्रश्न निर्माण झाला असून त्यावर खात्याकडे कोणतेच उत्तर नाही. एकंदर, खात्याने आंदोलक विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचाच हा प्रकार असल्याचा आरोप होत आहे.
हत्ती-मानव संघर्ष: प्रशासनाला अजून किती बळी हवेत?
खानापूर तालुक्यात २५ वर्षात १५ जणांचा मृत्यू समांतर क्रांती विशेष / चेतन लक्केबैलकर खानापूर तालुक्यात दोन –अडिच दशकापासून हत्ती आणि माणसांतील संघर्ष जणू इरेला पेटला आहे. गेल्या २५ वर्षांच्या कालावधीत एका खानापूर तालुक्यात हत्तींनी १५ जणांचा बळी घेतला आहे. दिवसे-दिवस जटील बनत चालेल्या हत्ती समस्येबाबत शासन-प्रशासनाने ‘गेंड्याचे कातडे’ पांघरलेले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून दहा हत्तींनी […]