समांतर क्रांती / खानापूर
अंगणवाडीत नोकरी देण्याचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक केल्या प्रकरणी भाजपच्या कायदा सेलचा संचालक आकाश अथणीकर याला गुरूवारी रात्री पोलिसांनी अटक केली. न्यायालयासमोर त्याला हजर केले असता त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
संशयीत आरोपी आकाश अथणीकर याने पाली येथील शितल प्रवीण पाटील यांना अंगणवाडीत नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून तीस हजार रूपये उकळले होते. तसेच बनावट नियुक्तीपत्र देऊन त्यांची फसवणूक केली होती. याविरोधात काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन कारवाईची मागणी केल्यानंतर पोलीसांनी सु-मोटो गुन्हा दाखल करून आकाश अथणीकर याला अटक केली.
गेल्या तीन दिवसांपासून हे प्रकरण तालुक्यात गाजत होते. अखेर भाजपचा हा नेता कायदा सेलचा संचालक असल्याचे समोर आले आहे. गुरूवारीच (ता.१२) माजी आमदार तथा राष्ट्रीय काँग्रेसच्या सचीव डॉ. अंजली निंबाळकर यांनी त्यांच्या फेसबूक अकाउंटवर त्याचा फोटो शेअर करीत कांही प्रश्नदेखील उपस्थित केले होते. त्यांनी कारवाईची मागणी केली होती. त्याची दखल घेत खानापूर पोलीसांनी भारतीय दंड संहिता कलम ४०६ अनव्ये फौजदारीपात्र न्यासभंग, ४२० अनव्ये फसवणूक आणि ४६५ अन्वये बनावटीकरणाबद्दल गुन्हा नोंदविला. त्याला तात्काळ अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
- कायदा सेलचा संचालक?
- आकाश अथणीकर हा स्वत: वकील असल्याचे भासवत होता. मात्र, त्याला अद्याप सनद मिळाली असल्याचे खानापूर वकील संघटनेकडून समजते. एकंदर, आकाश अथणीकर यांने सगळ्यांचीच फसवणूक चालविली होती. त्याला भाजपचे अतिउत्साही नेतेदेखील‘बळी’ पडले. त्यामुळेच त्याची भाजप कायदा सेलच्या संचालकपदी वर्णी लावण्यात आली होती. त्याची कसून चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
2 thoughts on “अंगणवाडी घोटाळाप्रकरणी भाजपच्या ‘त्या’ भामट्यास अटक”