समांतर क्रांती / खानापूर
शिवारात पुन्हा टस्कर दाखल झाल्याने एका शेतकऱ्यांने नुकसान टाळण्यासाठी सकाळीच भाताची मळणी घातली होती. मळणी जवळपास पूर्ण व्हायला आली असल्याने शेतकरी आणि मळणीसाठी गेलेले कुटुंबीय निर्धास्त झाले होते. इतक्यात टस्कर अचानक मळणीच्या खळ्यावर दाखल झाल्याने सगळ्यांचीच तारांबळ उडाली. ही घटना जळगे येथील शिवारात घडली.
महिनाभरापूर्वी या परिसरातून हा टस्कर पूर्व भागात गेला होता. तो पुन्हा येणार नाही, अशी जळगे परिसरातील शेतकऱ्यांची धारणा होती. पण, गेल्या चार दिवसांपासून पुन्हा या टस्कराने जळगे परिसरात तळ ठोकला आहे. मुबलक पाणी आणि ऊस व चाऱ्यामुळे हा टस्कर दुसऱ्या ठिकाणी जायला तयार नाही.
टस्कर पुन्हा आल्याने शेतकऱ्यांनी मळणीसाठी लगीनघाई चालविली आहे. गावातील एका शेतकऱ्याने आज शुक्रवारी शेतातील खळ्यात मळणी घातली होती. मळणी पूर्ण होणार इतक्यात टस्कर त्या ठिकाणी दाखल झाला. चक्क खळ्यात आलेल्या हत्तीने गवत विस्कटले. तसेच मळणीसाठी ताडपत्री आणि इतर साहित्य फेकून दिले. मळलेल्या भातावर ताव मारल्यानंतरही तो तेथेच थांबून होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला.यावेळी तेथे लहान मुलेदेखील होती. हत्ती असा दिवसाढवळ्या राजरोसपणे मुक्त संचार करीत असल्याने परिसरात घबराट पसरली आहे. वनखात्याने टस्कराचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
जांबोटी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
समांतर क्रांती / खानापूर जांबोटी येथील जांबोटी मल्टीपर्पज पतसंस्थेच्या २०२५ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन शुक्रवारी थाटात संपन्न झाले. तालुक्यातील पतसंस्था असलेल्या जांबोटी पतसंस्थेच्यावतीने दरवर्षी दिनदर्शिकेचे प्रकाशन केले जाते. तसेच ही दिनदर्शिका सभासद आणि ग्राहकांना मोफत वाटली जाते, अशी माहिती यावेळी संस्थेच्यावतीने देण्यात आली. सचीव भैरू पाटील यांनी स्वागत केले. त्यानंतर उपस्थितांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. […]