समांतर क्रांती / खानापूर
काल सोमवारी माणिकवाडीकडे गेलेल्या हत्तींच्या कळपाने पुन्हा रात्री सावरगाळीच्या शिवारात हैदोस घालून शेकडो टन ऊसाचा फडशा पाडला. सावरगाळी येथील ज्ञानेश्वर जायाप्पा पाटील यांना लाखोंचा फटका बसला आहे. रविवारी त्यांच्याच शेतातील पाण्याचा पंप, जलकुंभ आणि पिकांचे नुकसान हत्तींच्या कळपाने केले होते.
गेल्या महिनाभरापासून गुंजी वनविभागात नऊ हत्तींनी ठाण मांडले आहे. या कळपाने कामतगा-गुंजीहून दनि आठवड्यांपूर्वी सावरगाळी गाठले होते. त्यातील पाच हत्तींनी आनंदगडाला वळसा घालून नंदगड डॅम परिसरात तळ ठोकला तर चार हत्तींचा कळ सावरगाळी-माणिकवाडी परिसरात ठाण मांडून आहे.
रविवारी (ता. २२) चार हत्तींच्या कळपाने ज्ञानेश्वर पाटील यांच्या शेतातील पाण्याची पंप, जलकुंभ आणि शेती आवजारांसह ऊसाचे नुकसान केले होते. सोमवारी रात्री पुन्हा या कळपाने त्यांच्याच शेतातील ऊसाचा अक्षरश: फडशा पाडल्यामुळे वर्षभराचे कष्ट मातीमोल झाले आहेत. त्याशिवाय त्यांची वर्षभराची कमाईदेखील पाण्यात गेली आहे. त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
वन अधिकारी केवळ पंचनामा करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे नाटक करीत आहेत. हत्तींना हुसकावून लावण्यासाठी खात्याकडून कांहीच केले जात नाही. परिणामी, शेतकऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे. त्याशिवाय शेतकरी चिडल्यामुळे हत्तींदेखील संकटात सापडण्याची शक्यता आहे. हत्तींच्या कळपाला जंगलात हुसकावून लावण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत असली तरी वनखात्याकडून अजिबात लक्ष दिले जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. हत्तींचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी आंदोलन छेडण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.
One thought on “सावरगाळीत ऊसाचा फडशा; शेतकऱ्यांवर संकट”