समांतर क्रांती / साहित्य संमेलन विशेष
तोंडाला पाणी लावून
महाराष्ट्रीयन गेले
इथल्यांनी सवतीचे
सवतूर पोरं केले
मलपुरीची कावेरी
नक्कीच झाली असती
विकासाची गंगा इथं
हिरवं लेणं ल्याली असती
इकडे आड, तिकडे विहीर
मध्येच बसलंय आपलं पूर
तरीही त्याच प्रतिक्षेत
झक्क मारतंय खानापूर !
अनगडी येथील कवी संजीव वाटुपकर यांच्या खानापूर या कवितेतील ओळी खानापूरची चपखल ओळख करून देतात. वाटुपकरांनी खानापूर तालुक्याच्या सद्यःस्थितीवर लिहिलंय. येथील भ्रष्टाचाराचाही त्यांनी खरपूस समाचार घेताना आईचा चष्मा या कवितेत त्यांनी…
तलाठ्याचा सातबारा
बराच आता जोरात आहे.
डायरी करा, शेत सारा
इकडं सगळं सुरूच आहे.
म्हणती फुट हिस्सा असंल
इतकं आम्ही जरूर घेतो.
त्याचं नाव असंल तिथं
तुमचं पक्क लावून देतो.
असे म्हणत शासकीय पातळीवरच्या भ्रष्टाचाराचे बिंग फोडले आहे.
संजीव वाटुपकर, मराठा मंडळ संस्थेत शिक्षक म्हणून सेवा बजावून नुकतेच निवृत्त झालेत. माचीगड- अनगडी येथे सुब्रम्हण्य साहित्य अकादमीच्यामाध्यमातून साहित्य संमेलन भरविण्याचा मक्ता या माणसानं घेतलाय. गणिताचा शिक्षक असूनही साहित्याकडे वळलेला हा बापडा माणूस अगदीच साधा. गावपंढरीतून बाहेर पडून समाजात फिरू लागला अन् विलक्षण हादरला. ज्यावेळी खानापूरचं रूपडं कळलं तेव्हा बेफामपणे लिहून गेला. ‘झक्क मारतयं खानापूर आणि आईचा चष्मा’ या कविता जेव्हा ते एखाद्या ठिकाणी आपल्या निखळ पहाड़ी आवाजात वाचू लागतात, तेव्हा खानापूर तालुक्याचा अंतरंग उलगडत जातो आणि शहाणी माणसंही विचारात पडतात.कधीकाळी विविध कारणांनी प्रसिद्ध असलेले खानापूर आज विद्रुप रूप धारण करतंय. देशाच्या पाठीवर कुठेही जा, खानापूर म्हणून सांगायची फुरसत की, तेलगी खानापूर का ? हा सवाल हमखास ऐकावयास मिळतो. भाग्यलक्ष्मी साखर कारखान्यातील ९२ कोटींचा भ्रष्टाचार खरं तर राज्याला हदरवून टाकणारा, पण तोही पचविला गेला. शासकीय कार्यालयातून बोकाळलेला भ्रष्टाचार,लोकप्रतिनिधींकडून होणारे दुर्लक्ष, सामान्य माणसाच्या हाताला काम नाही, सगळीकडेच फरफट चाललीय, अशा परिस्थितीत सर्वसामान्य माणूस हातात बंदूक घेऊन नक्षलवादी व्हायच्या गोष्टी करतोय. या पार्श्वभूमीवर कवी संजीव वाटुपकर यांनी कवितेतून ही विदारक परिस्थिती मांडण्याचे धाडस केले आहे.
अव्वाच्या सव्वा थापांनी
कोणी गाभण होणं दूर
तरीही त्याच प्रतिक्षेत
झक्क मारतंय खानापूर
असे लिहिताना वाटुपकर तालुक्यातील नेत्यांना झापतात. थापेबाज राजकारणाबाबत तीव्र संताप व्यक्त करताना ते म्हणतात..
कुणी याच तालुक्याचे
सहकार महर्षी झालेले
कुणी आम जनतेचे
लोकप्रिय नेते झालेले
कुणी स्वप्नेच धुळीला
मिळाली म्हणून खचलेले
इमल, बंगले, इस्टेटीचे
कुणी खच रचलेले
विकासाचं नावच मात्र
कानाखालून काढतात सूर.
तरीही, त्याच प्रतिक्षेत झक्क मारतंय खानापूर !
केवळ नेत्यांवरच फटकारे मारून ते गप्प बसले नाहीत तर आजच्या प्रशासकीय व्यवस्थेचेही त्यांनी धिंडवडे काढले आहेत.
जिकडं आता जाशील तिथं
हप्ता तेवढा सुरू आहे
शिक्षक देखील सुटला नाही
हप्ता देऊन सुखी आहे
दिन जांदे म्हणत आता
मास्तरं खुर्चीत लोळतली
कॉपीशिवाय परिक्षा कुठं ?
म्हणून पोरं खेळतली
शिक्षणही व्यवस्थेतील स्थिती त्यांनी स्वानुभावाने मांडली आहे. एवढेच नाही तर देशभरातील भ्रष्टाचारावरही त्यांनी कवितेच्या माध्यमातून ताशेरे ओढले आहेत.
रेल्वे घ्या, विद्युत घ्या
पेट्रोलचबी हेच हाय
रॉकेलशिवाय जाळून बघा
पेट्रोल कुठे जळतं काय ?
एकूणच खानापूर तालुक्यातील सद्य:स्थितीवर लिहिण्याची धमक वाटुपकरांनी दाखविली. समाजातील असंवेदनशिलतेबाबत प्रचंड चीड व्यक्त करणारे वाटुपकर आशावादी आहेत.
आमचे असतात विचार वांझ
त्यांना फळं येत नाहीत
आमच्या अशा डोसांनी
आताचे रोग जात नाहीत
जनाच्या नाहीतर मनाच्या
लाजेमध्ये व्हारे चूर…
असे आवाहनही ते करतात. तालुक्यातील परिस्थितीवर नियंत्रण आणण्याची आज सक्त गरज आहे. मात्र, पुढाकार घ्यायचा कुणी हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. वाटुपकरांनी कवितेच्या माध्यमातून का असेना एक पाऊल पुढे टाकले आहे. २००५ साली त्यांचा ‘मनलहरी’ तर २०२१ साली ‘थवे माणसांचे’ हा काव्य संग्रह प्रसिद्ध झाला आहे. त्यांना राणी चन्नम्मा विद्यापीठाचा महात्मा जोतीराव फुले पुरस्कार २००६ मध्ये मिळाला आहे. तरीही अगदी साधेपणाने वागणारा हा कवी तालुक्यातील सामान्यांबद्दल लिहितोय.
या गालावर खाऊन दुसरा
पुढं आम्ही करणारे
इकडून बुक्का, तिकडून मार
पकवाझ आमचा झाला रे
तालुक्यातील संवेदनशिल माणसाला जागे करण्याचं काम वाटुपकर यांनी चालविले आहे. खानापूरकर जागे होतील का? हा प्रश्न वाटुपकरांनाही पडून राहतो. त्यांच्यासाठी ते आईचा चष्मा या कवितेत म्हणतात-
यदा कदाही धर्मस्य
म्हणत कोण येईल काय?
आत्ताचं हे पालटलेलं
सुंदर चित्र बघील माय?
एक पिढी गळसून गेली
दुसरी कळवटून जातेच की,
जिकडं आता जाशील ना
तिकडं असंच होणार आहे.
बरं झालं तुझा आई
चष्मा आज फुटला आहे !
माणूस उलगडते ती भाषा: डॉ.बी.एम.हर्डिकर
माचीगड / दिवंगत अजित सगरे साहित्यनगरी गावाचं गावपण टिकविण्यासाठी आज साहित्य संमेलनांची गरज आहे. शहरातील संमेलनांना अनेक कंगोरे असतात. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांनी भाषेचे महत्व जाणले. त्यांनी माणूस मांडला. तुकारामांनी त्यांच्या अभंगातून प्राणी, पक्षी, वनस्पती आणि निसर्गाचा व्यवहार मांडला. मातृभाषा ही जीवनाचा महामार्ग आहे. ती कुणाचीही मक्तेदारी नाही. भाषा कुणालाही शिकता येते. भाषा माणूस […]