समांतर क्रांती / खानापूर
खानापूर तालुक्यातील राखीव जंगलात पोलीस कर्मचाऱ्यांच्या टोळक्याने पार्टी केल्याने वादाला तोंड फुटले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केला असून आता व्हायरल होत आहे. एका आठवड्यापासून चर्चेत असलेल्या व्हिडिओमध्ये सुमारे १२ ते १५ पोलिस कर्मचारी परवानगीशिवाय संवेदनशील वनक्षेत्रात प्रवेश करताना दिसत आहेत. त्यांनी आग पेटवून अन्न शिजवले आणि मद्यपान केल्याचे व्हिडीओत दिसत आहे. ते जंगलात फिरत होते आणि पाण्यात पोहत होते. वन्यप्राण्यांना त्रास देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या असंवेदनशील कृतीमुळे संताप व्यक्त होत आहे.
या प्रकाराची उप वनसंरक्षक (DCF) मारिया क्रिस्तू राजा डी यांनी पुष्टी दिली आहे. “खानापूर तालुक्यातील काही पोलीस कर्मचारी लोंढा वनविभागातील राखीव जंगलात बेकायदेशीरपणे घुसले हे खरे आहे. आम्ही पोलीस विभागाला या घटनेत सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांची ओळख पडताळून पाहण्यास सांगितले आहे. आवश्यक दंडात्मक कारवाई आम्हाला माहिती मिळाल्यावर सुरू केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
मात्र, पोलीस कर्मचारी भीमगडमध्ये घुसल्याचा दावा डीसीएफनी फेटाळून लावला आहे. अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये कर्मचाऱ्यांनी ते भीमगड वन्यजीव अभयारण्य असल्याचा दावा केला आहे. वन्यजीव अभयारण्य एक संवेदनशील आणि संरक्षित जंगल आहे, जेथे बाहेरील लोकांच्या विनापरवाना प्रवेशास बंदी आहे.
याबाबत पोलिस अधिक्षक डॉ. भीमाशंकर गुलेद यांनी कर्मचाऱ्यांचा बचाव केला आहे. मला एका आठवड्यापूर्वी याची माहिती मिळाली. त्यांनी राखीव जंगलाला भेट दिली हे खरे आहे. तथापि, त्यांनी राखीव वनक्षेत्रात मद्यपान किंवा जेवणाचे आयोजन केले नाही. त्यांनी जंगलाबाहेर मद्यपान आणि जेवण केल्याचे डॉ. गुळेद यांनी सांगितले.
भीमगड वन्यजीव अभयारण्यातील जैवविविधता आणि वनस्पती आणि प्राणी यांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने वन विभागाने वज्रपोहा धबधब्यामध्ये प्रवेशास बंदी घातली आहे. वज्रपोहा धबधब्यांना भेट देणारे लोक अभयारण्यात जातात. पोलिस कर्मचाऱ्यांच्या व्हिडिओशिवाय, वज्रपोहा धबधब्याच्या बेकायदेशीर भेटीचे अनेक जुने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेक ग्राम विकास अधिकारी (पी.डीओ) भीमगड अभयारण्यात हुल्लडबाजी करतांनाचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
जुन्या व्हिडिओंबाबत बोलतांना, डीसीएफ मारिया क्रिस्तू राजा डी यांनी, आम्ही या गुन्ह्याची दखल घेतली आहे. वज्रपोहा जलप्रपातांवर अवैध प्रवेश आणि वन्यजीवांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल संबंधीतावर कारवाई केली जाईल. गुन्हेगारांची ओळख पटल्यानंतर त्यांचा शोध घेण्यासाठी आम्ही सायबर सेलच्या संपर्कात आहोत, असा दावा केला आहे. दरम्यान, पोलिसांनी कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे खात्यात एकच खळबळ माजली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
खानापूरचे तहसीलदार गायकवाड यांच्या घरावर लोकायुक्तांचा छापा
Big Breaking: Lokayukt Raid येथील तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या बेळगावातील घरावर पहाटे लोकायुक्त अधिकाऱ्यांनी अचानक छापा मारल्याने खळबळ माजली आहे. त्यांच्या घरातील कागदपत्रांची पडताळणी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी चालविली आहे. यात मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता आहे. तहसीलदार गायकवाड यांच्याबद्दल अलिकडेच एका शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकाराचा गैरवापर करून ते खानापूर तालुक्यातील जमिनी बळकावत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर […]