समांतर क्रांती / खानापूर
एकीकडे दरवाढ न देऊन साखर कारखाने शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. तर दुसरीकडे ऊस तोडणीसाठी ऊसतोड कामगारांचे मुकादम आणि वाहतुकदार ट्रक चालक खुशालीच्या नावाखाली लुबाडणूक करीत आहेत. तोडणीचे दर दिवसागणीक बदलत असून टोळी मालक प्रतिटन ५०० ते ६०० रुपये मागत आहेत, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
खानापूर तालुक्यातील एकमेव सहकारी साखर कारखाना सध्या भाडेतत्वावर महालक्ष्मी ग्रूपकडून चालविला जात आहे. यंदा या कारखान्याच्या गाळपाला उशिर झाला. त्यामुळे गळीत हंगामाच्या सुरूवातीला तालुक्यातील बहुतांश ऊस तालुक्याबाहेरील कारखान्यांना गेला. शेतकऱ्यांचा नाईलाज होता. आता कारखाना सुरळीत सुरु झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी लैला शुगर्सला ऊस पाठविण्यास सुरूवात केली त्यांना ऊस तोडणीसाठी अधिक दर मोजावा लागत असल्याचा आरोप म.ए.समितीचे उपाध्यक्ष रमेश धबाले (चापगाव) यांनी केला आहे.
गाळप उशिरा सुरू झाल्याने कारखान्याने दरवर्षीप्रमाणे यंदा ऊस तोडणीचे नियोजन व्यवस्थित केलेले नाही. महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांसह त्यांच्याच ऊस वाहतूक ट्रक आणल्या आहेत. दरवर्षी स्थानिक वाहनांना ऊस वाहतुकीची संधी मिळायची. त्यामुळे कांही अंशी ऊस उत्पादकांना दिलासा मिळत होता. आता मात्र, महाराष्ट्रातील वाहनचालक शेतकऱ्यांकडून अमूक इतकी रक्कम देण्याचा अट्टाहास धरत आहेत. शिवाय प्रतिटन ५०० ते ६०० रुपये तोडणीची मागणी होत आहे. खुशालीच्या नावाखाली प्रत्येक ट्रक वाहतुकीमागे हजार ते १५०० अतिरिक्त रक्कम वसुल केली जात असल्याचे समजते. खुशालीची सध्या खंडणी बनली असून ऊसतोड कामगार, मुकादम आणि ट्रक चालकांना खूष करण्यासाठी वर्षभराच्या मेहनतीवर पाणी सोडण्याची वेळ आली आहे.
शेतकऱ्यांची लुबाडणूक होत असल्याची कल्पना कारखान्यांच्या कारभाऱ्यांना आहे, पण त्याकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही. केवळ लैला शुगर्सच नव्हे तर इतरही सर्वच कारखान्यांच्या ऊसतोड कामगारांनी शेतकऱ्याला वेठीस धरले आहे. आधीच हत्ती आणि जंगली प्राण्यांनी ऊसाचे नुकसान चालविल्यामुळे हवालदिल असलेला बळीराजा या प्रकारामुळे चांगलाच मेटाकुटीस आला आहे. लैला शुगर्सचे चेअरमन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी या समस्येकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी श्री. धबाले यांनी केली आहे.
एकिकडे तालुक्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या नागवला जात आहे तर दुसरीकडे नेतेमंडळी विशेषतः राष्ट्रीय पक्षांतले पुढारी आपले वाढदिवस थाटामाटात साजरे करण्यात मशगुल आहेत. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाली कोण ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारखाना प्रशासन असे बेजबाबदार वागत असेल तर तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याने पुढे येऊन संघटित होऊन तहसिलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची गरज असल्याचे धबाले यांनी म्हटले आहे.
सीमाप्रश्न: तारा भवाळकर यांना भेटणार
समांतर क्रांती / खानापूर दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सीमाप्रश्न विनाविलंब सोडविण्याची मागणी करणारा ठराव समंत करावा.अशी मागणी नियोजित संमेलनध्यक्षा तारा भवाळकर यांच्याकडे करण्याचा निर्णय गुरुवारी येथील शिवस्मारक सभागृहात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. लवकरच भवाळकर यांची सांगलीत भेट घेतली जाणार असल्याचे यावेळी अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी सांगितले. हुतात्मा दिनी १७ जानेवारी खानापुरातील हुतात्मा […]