समांतर क्रांती / खानापूर
खानापूर को-ऑप बँकेचे मतदान चुरशीने पार पडले. पण, निकाल कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. मतमोजणी १० ते पंधरा दिवसानंतर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार होईल, असे निवडणूक अधिकारी रविंद्र पाटील यांनी स्पष्ट केले. सकाळपासून निर्धारित वेळेपर्यंत ७४ टक्के मतदान झाले.
गेल्या महिनाभरापासून खानापूर को-ऑप बँकेच्या निवडणुकीचीच चर्चा सुरू होती. शेलारविरुध्द शेलार अशा लढतीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक रंगतदार ठरली. आज रविवारी (ता. १२) येथील समर्थ स्कुलमध्ये झालेल्या मतदानाच्यावेळी चुरस दिसून आली. कालपर्यंत १९२१ मतदार मतदान करण्यास वैध होते. पण, दोन्ही पॅनेलनी उच्च न्यायालयातून मतदार वाढवून आणल्याने आज सकाळी ही संख्या २८६६ इतकी झाली. त्यापैकी २१३१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ७४.३५ टक्के मतदान झाले.
मतदानानंतर लगेच मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार होता. पण, कायदेशीर बाबींमुळे निकाल राखून ठेवण्यात आला आहे. मतदानानंतर लागलीच मतपेठ्या तहसिलदारांकडे सुपूर्द करण्यात आल्या असून उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरच मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, सर्वच उमेदवारांचा तूर्तास निराशा झाली आहे.
कायदा काय सांगतो?
आज रविवारी मतदानापूर्वी दोन्ही पॅनेलनी वाढीव मतदारांची यादी निवडणूक अधिकाऱ्यांकडे दिली. त्यामुळे मतदानाची प्रक्रीया विनासायास पार पडली असली तरी निकाल जाहीर करण्यास निवडणूक अधिकाऱ्यांना अधिकार राहिला नाही. उच्च न्यायालयातून वाढीव मतदारांची यादी जाहीर झाल्यामुळे नव्या मतदारांना हरकत घेण्यासाठी वा त्यांचे मत कळविण्यासाठी किमान १५ दिवसांची मुदत दिली जाते. या कालावधीत नव्या यादीतील मतदारांनी हरकत नोंदविल्यास नव्याने मतदान घेण्याचा आदेश उच्च न्यायालय देऊ शकते.
यापूर्वीही घडलेत असे प्रकार...
यापूर्वी बेळगाव जिल्ह्यात तीन बँकांच्या निवडणुकात असा प्रकार घडला आहे. औद्यागिक बँक आणि चिकोडी अर्बन बँकेचा निकाल अशाच प्रकारे राखून ठेवण्यात आला होता. तर राज्यातील अन्य कांही बँकांची निवडणूक रद्द करून नव्याने निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली होती.