
समांतर क्रांती / खानापूर
नंदगड येथील महालक्ष्मी यात्रोत्सव आवघ्या महिनाभरावर येऊन ठपली आहे. आमदार, माजी आमदारांनी गावातील समस्या सोडवून वेळेत विकास कामे पूर्ण करण्याची सूचना केली होती. पण, पंचायतीने त्यांच्या सूचनांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. यात नागरीकांची परवड होत असून चिंता वाढली आहे.
तब्बल २४ वर्षांनी नंदगडात यात्रा भरणार आहे. या यात्रेला सुमारे दीड लाख भाविक येतील, असा अंदाज आहे. त्या दृष्टीने गावात विकास कामे राबविण्याची गरज होती. यात्रेच्या निमित्ताने विकासाची गंगा आवतरेल, अशी नागरीकांची आपेक्षा होती. मात्र गावातील उखडलेले रस्ते आणि तुंबलेले गटार पाहता ती सध्या धुळीस मिळाल्यात जमा आहे.
प्रभाग तीनमध्ये गटारीचे काम अर्धवट सोडण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यावर जागोजागी मातीचे ढिगारे आहेत. वाहनचालकांना यामुळे कसरत करावी लागत आहे. एकीकडे नागरीक घरांची दुरूस्ती, रंगरंगोटी आणि यात्रा नियोजनात गुंतले आहेत. दुसरीकडे व्यस्त नागरीकांना त्रास देण्याची चंग जणू पंचायतीने बांधला आहे. एक ना धड, भाराभर चिंद्या, अशी पंचायतीच्या कामांची आवस्था आहे.
गावात भटकी कुत्री आणि मोकाट डुक्करांनी हैदोस मांडला आहे. त्यांचा बंदोबस्त करण्यात पंचायत अपयशी ठरली आहे. नंदगड पंचायतीला अ दर्जा प्राप्त आहे. नगर पंचायतीच्या दर्जाच्या या पंचायतीचा कारभार मात्र संतापजनक आहे. तालुकास्तरीय लोकप्रतिनिधींसह पंचायतीच्या कारभाऱ्यांनीदेखील नंदगडच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याने यात्रा काळात अनेक संकटांचा सामना नंदगडवासीयांना करावा लागण्याची शक्यता आहे. नंदगडात तालुकास्तरीय नेते आहेत. पण, त्यांचा अधिकाऱ्यांवर धाक नसल्याचा हा सगळा परिपाक आहे. शिवाय स्थानिक नेते आणि पंचायतीच्या कारभाऱ्यांचा ‘दलाली’चा सर्वश्रृत धंदा नंदगडातील विकास कामांच्या बोकांडी बसल्याचा नागरीकांचा आरोप आहे. येत्या आठवडाभरात अर्धवट कामे पूर्ण न केल्यास यात्रेच्या नियोजनाचा बोजवारा उडाल्याशिवाय राहणार नाही, त्यासाठी आमदारांसह गावातील नेते, पंचायत आणि यात्रा कमिटीने समन्वय साधण्याची गरज व्यक्त होत आहे.

हलसीवाडीतील शिकाऱ्याची शिकार
Breaking : हलसीवाडी (ता. खानापूर) अट्टल शिकाऱ्याचीच शिकार झाली आहे. डुक्कराची शिकार करून त्याची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत असताना नागरगाळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या मुसक्या अवळल्या आहेत. संशयिताकडे आठ किलो मांस आणि शिजवलेले दोन किलो मांस सापडले आहे. संशयिताला ताब्यात घेऊन वन विभागाने तपास चालवीला आहे.