
समांतर क्रांती / खानापूर
The dirt on the road…! What’s the secret behind this? अज्ञात ठिकाणाहून वाहतूक होणारा कचरा महामार्गावर पडत आहे. ही बाब साधी वाटत असली तरी खानापूर तालुक्यासाठी धोकादायक आहे. काय आहे यामागील गुढ? वाहने भरून वाहतूक होणारा हा कचरा नक्की येतो कुठून? कुठे टाकला जातो? याचे खानापूर तालुक्यावर काय परिणाम होत आहेत?
गेल्या कांही दिवसांपासून ट्रकमधून कचऱ्याची वाहतूक केली जात आहे. बेळगाव-लोंढादरम्यानच्या महामार्गावर ठिकठिकाणी दुर्गंधीयुक्त कचरा पसरून पडल्याचे चित्र आता दररोजचे बनले आहे. हा कचरा घरगुती असल्याने एखाद्या शहरी भागातून वाहतूक केला जात असल्याचे दिसून येते. वाहनात कचरा व्यवस्थित भरला जात नसल्याने रस्त्यावर विखरून पडत आहे. म्हणजेच ही कचरा वाहतूक बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट होते. खानापूर ते लोंढापर्यंत एकही कचरा डेपो नाही, मग हा कचरा कुठे जातो, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वाहनचालकांना धोका
वाहनातील कचरा महामार्गावर विखरून पडत आहे. माणिकवाडी ते नायकोलदरम्यान नेहमी हा प्रकार घडत आहे. हा परिसर दाट जंगलाचा असून वन्यप्राण्यांचा वावर हा सामान्य आहे. जंगली प्राणी हा कचरा खाण्यासाठी रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे प्रवाशांना धोका निर्माण झाला आहे. शिवाय ओल्या कचऱ्यावरून दुचाकी घसरून अपघात संभवण्याचा धोका आहे.
कचरा येतो कुठून? जातो कुठे?
मुदलात, ट्रकमधून हा कचरा कुठून येतो आणि कुठे टाकला जातो? असा प्रश्न आहे. हा कचरा एखाद्या शहरातून आणून लोंढा – रामनगरच्या जंगलात टाकला जात नाही ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे. तसे होत असेल ही धोक्याची घंटा आहे. यापूर्वी बेळगावातील कचरा खानापूर शहरालगत राजा टाईल्स्च्या परिसरात महामार्गालगत टाकला जात होता. तो प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती. आता पुन्हा अशा प्रकारे कचऱ्याची वाहतूक सुरू झाल्याने संशय बळावला आहे.

बाहेरील कचरा खानापूर तालुक्याच्या विविध भागात टाकण्याचे हे प्रकार नवे नाहीत. हा कचरा एकतर जंगलात टाकला जातो. ज्यामुळे वन्य प्राण्यांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहेच; शिवाय महामार्गाच्या कडेला टाकला जात असल्याने तो पावसात शेतवडीत पसरून शेती नापीक बनत आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन ही चोरटी वाहतूक थोपविण्याची आवश्यकता ग्रा.पं.सदस्य प्रा. शंकर गावडा यांनी ‘समांतर क्रांती’शी बोलतांना व्यक्त केली आहे.
- गेल्या कांही दिवसांपासून सकाळी महामार्गावर ठिकठिकाणी कचरा विखरून पडल्याचे दिसते. ही वाहतूक पहाटे होत असावी, त्यामुळे त्यांचा पत्ता लागत नाही. एकुणच हा प्रकार बेकायदेशीर आहे. पण, यामुळे या भागाला आणि महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना धोका संभवत आहे. टोल नाक्यांवर या कचरावाहू वाहनांचा शोध लागू शकतो. तरी तालुका प्रशासनाने या वाहनांची चौकशी करून कारवाई करावी. अन्यथा नाईलास्तव आंदोलन छेडावे लागेल.
- प्रा. शंकर गावडा, ग्रा.पं.सदस्य माणिकवाडी

खानापूरला सहा महिन्यांनी मिळणार नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष
समांतर क्रांती / खानापूर येथील नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडीचा मार्ग अखेर मोकळा झाला असून सोमवार दि. २७ रोजी त्यासाठी निवडणूक होणार आहे. तब्बल सहा महिन्यांनी शहराला नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष मिळणार आहे. मागील वर्षी २६ ऑगस्टला ही निवडणूक होणार होती. पण, दोन्ही जागा सामान्य महिलेसाठी राखीव ठेवण्यात आल्याने नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन […]