
समांतर क्रांती / खानापूर
नंदगड येथील महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आमदार विठ्ठल हलगेकर यांनी काल शुक्रवारी तिसऱ्यांदा बैठक घेतली. केवळ अधिकाऱ्यांना सूचना करण्यापलिकडे त्यांनी समस्यांवर कांहीच ठोस उपाय न योजल्याने नंदगडवासीयांची घोर निराशा झाली आहे. बैठकीत माना डोलावून आमदारांच्या होला हो म्हणणाऱ्या अधिकाऱ्यांनी निधीच नाही, तर कामं कशी करणार? असा सूर आळवण्यास सुरूवात केली आहे. परिणामी, आमदारांच्या कचखाऊ कार्यप्रणालीबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

नंदगडमध्ये २४ वर्षांनंतर ग्रामदेवता महालक्ष्मी देवीचा यात्रोत्सव होणार आहे. त्यासाठी गावातील समस्या मार्गी लावण्याची आवश्यकता होती. पण, अद्याप एकही समस्या मार्गी न लागल्याने संतापाचे वातावरण तर आहेच, शिवाय यात्रा काळात उद्भवणाऱ्या संभाव्य धोक्यामुळे नंदगडवासीय चिंतेत आहेत. या बाबत नागरीकांनी आक्रोश व्यक्त केल्याने काल शुक्रवारी (ता.१७) आमदार विठ्ठल हलगेकर यांनी बैठक घेतली. पण, ही बैठक म्हणजे बोलाचा भात आणि बोलाचीच कडी ठरली आहे.
याच बैठकीत सदस्य संदीप पारिश्वाडकर यांनी आपण यात्रेनिमित्त नंदगडसाठी किती निधी मंजूर केला अशी विचारणा आमदारांकडे केली. यावेळी त्यांनी पाच लाखांचा निधी दिल्याचे सांगितले. या पाच लाखांतून गदगेचे सुशोभीकरण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तसेच उर्वरित काम रोजगार हमी योजनेतून करण्याची सूचना करून आमदारांनी काढता पाय घेतला.
सध्या नंदगडातील कलाल गल्ली, बाजारपेठसह अनेक गल्ल्यांतील रस्त्यांची डागडुजी करण्याची गरज होती. गावातील एकही गटारीचे काम पूर्ण झालेले नाही. आता यात्रा आवघ्या कांही दिवसांवर येऊन ठेपली असताना रोजगार हमी योजनेतून कामांना मंजूरी केव्हा मिळविणार आणि कामे केव्हा पूर्ण होणार असा प्रश्न माजी जि.पं.सदस्य पुंडलिक कारलगेकर यांनी उपस्थित केला आहे.
नंदगड हे तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे. या गावाला ऐतिहासिक महत्व लाभले असल्याने यात्रेला लाखोंच्या संख्येने भाविक हजेरी लावणार आहेत. पण, त्यामानाने विकास कामे झालेली नाही. तसेच ज्या समस्या आहेत, त्यादेखील सोडविलेल्या नाहीत. खरंतर आमदारांनी मुख्यमंत्री, जिल्हा पालक मंत्री यांची भेट घेऊन अधिकाधीक निधी मंजूर घेण्याची आवश्यकता होती. पण, त्यांनी बैठकीत पाच लाखांचा निधी दिला हे सांगणेच हास्यास्पद असल्याची प्रतिक्रीया ग्रा.पं.माजी अध्यक्ष महमद शफी काझी यांनी ‘समांतर क्रांती’शी बोलतांना व्यक्त केली. आमदारांनी तीन बैठका घेतल्या या बैठकांना तालुकास्तरावरील अधिकारी उपस्थित राहिले. मात्र, या बैठका केवळ फार्स ठरल्याने संताप व्यक्त होत आहे. आमदारांच्या कार्यप्रणालीवरच यामुळे प्रश्न उभा राहिला आहे.

विद्यार्थ्यांची ‘गांधीगिरी’
समांतर क्रांती / खानापूर पोलिसांनी रस्त्या-रस्त्यावर, नाक्या-नाक्यावर थांबून दुचाकीस्वारांना दंड ठोठावले तरी त्याचा कांहीच परिणाम वाहन चालकांवर होत नाही. उलटअर्थी पोलिसांकडून लुबाडणूक होत असल्याची ओरड नेहमीचीच बनली आहे. त्यावर उपाय म्हणून शिक्षण खात्याकडून आज अनोख्या पध्दतीने हेल्मेटबाबत दुचाकी चालकांत जागृती करण्यात आली. येथील सरकारी कन्नड प्राथमिक शाळेच्या स्काऊट अँड गाईडच्या विद्यार्थ्यांनी शहरात जागृती फेरी काढली. […]