
समांतर क्रांती / खानापूर
जांबोटी वनविभागातील वडगावच्या जंगलातून राजरोसपणे वृक्षतोड करून वाहतूक केली जात आहे. याबाबत नुकताच एकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर येथील स्थानिक जंगल माफियांचा पर्दाफाश झाला आहे. विशेष म्हणजे या वृक्षतोडीत एका पंचायत कारभाऱ्यासह वडगावातील अनेक ‘मान्यवर’ व्यक्ती तसेच वनखात्याच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याने नेहमीच या प्रकाराकडे दुर्लक्ष करून वनखात्याकडून मूकसंमती दिली जात आहे.
गेल्या कांही वर्षांपासून वडगाव येथील जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. कांही दिवसांपूर्वी ट्रॅक्ररमधून लाकूड वाहतूक करणारा सागर नारायण दळवी याच्यावर जांबोटी वन खात्याने गुन्हा दाखल केला आहे. ट्रॅक्टर आणि लाकूड ताब्यात घेण्यात आले असून संशयीत आरोपी सागर हा फरारी असल्याचे वनखात्याचे म्हणणे आहे. या प्रकरणानंतर वडगावातील इतर तस्करांच्या कारनाम्यांची जोरात चर्चा आहे.
एका महिला वनकर्मचाऱ्याच्या सहकार्यानेच वडगावच्या जंगलातून लाकडांची चोरी केली जात असल्याचे बोलले जात असून गावातील अनेकजण यामध्ये सहभागी असल्याचे बोलले जाते. सध्या अनेक घरांमध्ये लाकडांचा साठा असल्याची खात्रीलायक माहिती वनविभागाला असली तरी कारवाई करण्याचे धाडस वनखाते का दाखवत नाही? असा प्रश्न विचारला जात आहे.
अशी होते तस्करी..
परिसरातील जंगलात वृक्षतोड करणारी एक टोळी कार्यरत आहे. हीटोळी झाडांची कत्तल करून ठेरलेल्या गिऱ्हाईकाला लाकडांचे पुरवठा करते. त्यासाठी दोन ट्रॅक्टर कायम याच कामासाठी तयार ठेवले जातात. ट्रॅक्टरमध्ये लाकडे भरून वरून गवत टाकले जाते. त्यामुळे कुणालाच चोरट्या लाकूड वाहतुकीचा संशय येत नाही. शिवाय वनखात्याच्या ‘त्या’ कर्मचाऱ्यांकडून खात्याचे अधिकारी कुठे आहेत, याची लाईव्ह माहिती मिळते. त्यामुळे लाकडांची चोरटी वाहतूक करणे सोपे होते. अशी ही लाकूड चोरीची सिस्टिम असल्याचे समजते.
वडगाव परिसरातील जंगल आताश: उजाड माळरान बनत चालले आहे. मात्र, कुंपणच शेत खात असल्याच्या या प्रकारात वनखात्यातील कोण अधिकारी गुंतले आहेत? याची चौकशी करण्याची मागणी निसर्गप्रमींतून होत आहे.

निवृत्त शिक्षक राजाराम पाटील यांचे निधन
खानापूर : चन्नेवाडी (ता. खानापूर) येथील रहिवासी राजाराम लक्ष्मण पाटील (वय 86) यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, सूना, नातवंडे असा परिवार आहे. हलशी येथील सरकारी मराठी शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून त्यांनी सेवा बजावली होती. तसेच त्यांना तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला होता. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील व […]