
समांतर क्रांती / खानापूर
खानापूर – जांबोटी रस्त्याला जोडणाऱ्या मुघवडे रस्त्याची चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहेच; शिवाय चढ-उतार आणि नागमोडी वळणाच्या या मार्गावरील प्रवास धोकादायक बनला आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी या भागातील नागरीकांतून होत आहे.
मुघवडे रस्त्यावर अल्लोळी, मळव, आंबोळी, बांदेकरवाडा, जोगणमठ, निलावडे, कोकणवाडा, मुघवडे आणि कबनाळी ही गावे आहेत. या भागातून दररोज विद्यार्थी आणि कष्टकरी खानापूरला येतात. रस्त्याच्या दूरवस्थेमुळे त्यांचे हाल होत आहेत. या गावांसाठी बसची सुविधा आहे. सध्या कशीतरी ही बससेवा सुरू आहे, पण पावसाळ्यापूर्वी रस्त्याची डागडुजी न केल्यास बस सेवा ठप्प होणार असल्याने नागरीकांतून चिंता व्यक्त केली जात आहे.
पुलावर कठडेच नाहीत..
मुघवडे रस्त्यावर मळवनजीकच्या मलप्रभा नदीच्या पुलावरील कठडे गेल्या चार-पाच वर्षांपासून पूरात वाहून गेले आहेत. नेहमी हा पूल पावसाळ्यात पाण्याखाली जातो. त्यावर सध्या संरक्षक कठडेच नसल्याने हा पूल वाहतुकीस धोकादायक बनला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने त्याकडे दुर्लक्ष चालविले असून एखादी दुर्घटना घडल्यानंतरच खात्याला जाग येणार का? असा प्रश्न नागरीक विचारत आहेत.
आश्वासनांचे काय झाले?
निवडणुकांच्या काळात या भागाच्या विकासाची हमी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी दिली होती. पण, निवडणुकीनंतर त्यांनी इकडे फिरकूनही पाहिलेले नाही. रस्त्याची दूरवस्था पाहता येत्या पावसाळ्यात हा रस्ता वाहतुकीस बंद होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास मोठी गैरसोय होणार असल्याने तात्काळ रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी माजी ग्रा.पं.सदस्य राजू धुरी यांनी केली आहे.
पकडून तर दाखवा.. चोरटे पोलिसांवर शिरजोर
समांतर क्रांती / खानापूर शहर आणि उपनगरातील चोरीच्या घटना ही कांही नवी बाब नाही. पण, गेल्या कांही महिन्यांपासून चोरट्यांनी खानापूर पोलिसांना थेट आव्हानच दिले आहे. शहराच्या मध्यवर्ती असलेल्या शिवस्मारक चौकातील दुकान फोडीच्या घटनांनी खानापूर पोलिसांच्या कार्यप्रणालीचे अक्षरश: धिंडवडे काढले आहे. कांही महिन्यापूर्वी जुन्या कोर्ट आवारातील दुकाने फोडून चोरी झाल्याची घटना ताजी असतांनाच पुन्हा काल सोमवारी […]