
समांतर क्रांती / खानापूर
येथील नगर पंचायतीच्या नगरध्यक्षक-उपनगराध्यक्षांची निवड अविरोध झाल्याने गेल्या कांही दिवसांपासून सुरू असलेल्या गोंधळावर पडदा पडला आहे. नगराध्यक्षपदी मिनाक्षी बैलूरकर तर उपनगराध्यक्षपदी जया भुतकी यांची निवड जाहीर करण्यात आली.
दोन्ही पदे सामान्य महिलांसाठी आरक्षीत झाली होती. त्याला आक्षेप घेत नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून दोन्ही पदे रिक्त होती. दरम्यान, उच्च न्यायालयाने स्थगिती उठवून निवडणूक घेण्यास हिरवा कंदील दाखविला होता.
न्यायालयाच्या निर्देशानुसार आज सोमवारी (ता.२७) आज निवडणूक घेण्यात आली. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत केवळ एकेक अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकारी तहसिलदार प्रकाश गायकवाड यांनी ही निवड अविरोध घोषीत केली. नगर पंचायतीतील २० पैकी १४ आणि ६ नगरसेवकांचे दोन गट होते. दुसऱ्या गटाला मोर्चेबांधणी करण्यात अपयश आल्याने अखेर ठरल्याप्रमाणे मिनाक्षी बैलूरकर व जया भुतकी यांची निवड जाहीर करण्यात आली. निवडीनंतर आमदार विठ्ठल हलगेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.
निधन वार्ता: शुभांगी संभाजी पाटील
खानापूर: असोगा येथील रहिवासी शुभांगी संभाजी पाटील (वय ४६) यांचे आज सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा आणि अविवाहीत मुलगी असा परिवार आहे. अंत्यंविधी मंगळवारी (ता. २८) सकाळी ११ वाजता असोगा येथे होणार आहे. ‘समांतर क्रांती’ परिवारातर्फे मृतात्म्यास भावपूर्ण श्रध्दांजली..!