खानापूर: मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने जानेवारीच्या शेवटच्या आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष नारायण कापोलकर यांनी दिली. यंदा प्रतिष्ठान तपपुर्ती साजरी करीत असून त्या अनुषंघाने निबंध, वकृत्व, गायनसह सामान्यज्ञान-प्रज्ञाशोध परिक्षांचे आयोजन करण्यात आले असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. याप्रसंगी उपाध्यक्ष मऱ्याप्पा पाटील, सचिव वासुदेव चौगुले, सदस्य प्रल्हाद मादार आदींसह सर्व सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलतांना कापोलकर म्हणाले, मराठी संरक्षण आणि संवर्धनाच्या हेतूने बारा वर्षांपूर्वी प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली होती. या काळात प्रतिष्ठानने तालुक्यात अनेक उपक्रमाद्वारे मराठी जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. सुरूवातीला मराठी शाळा बचाव आंदोलनाच्या माध्यमातून शेकडो मुलांना पुन्हा मराठी शाळेत आणले. त्यानंतर सर्व सदस्यांचा आशावाद द्विगुणीत झाला आणि आतापर्यंत अनेक उपक्रम राबविले आहेत. फिरते वाचनालय आणि संगणक प्रशिक्षण केंद्रासह विविध उपक्रमाद्वारे खानापूर तालुक्यात प्रतिष्ठानने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
यावेळी बोलतांना सचिव वासुदेव चौगुले यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा सादर केला. तपपुर्ती निमित्त रविवार दि. २९ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तीन गटात ही स्पर्धा होणार असून प्राथमिक गटासाठी आई माझा पहिला गुरू, माझा गाव, पाऊस आला नाही तर.. , माध्यमिक गटासाठी माझे आवडते पुस्तक, शेतकरी संपावर गेला तर?, आजच्या काळात मोबाईलचे महत्व तसेच खुल्या गटासाठी ग्रंथ हेच गुरू, मातृभाषेतील शिक्षणाचे महत्व, निसर्ग माझा सोबती या विषयांवर निबंध लिहिता येणार येतील.
त्याच दिवशी १०.३० वाजता होणाऱ्या वकृत्व स्पर्धादेखील तीन गटात होणार आहे. प्राथमिक गटासाठी जिजाऊ: छ.शिवाजी महाराजांच्या पहिल्या गुरू, माझे स्वप्न, माझा आवडता संत, माध्यमिक गटासाठी मराठी भाषेची कैफियत, परिक्षा नसत्या तर.., डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि राज्यघटना, खुल्या गटासाठी जीवनातील मातृभाषेतील शिक्षणाचे महत्व, आई-वडिल: संस्काराचे विद्यापीठ, शीवशाही ते लोकशाही हे विषय देण्यात आले आहेत. या दोन्ही स्पर्धा रावसाहेब वागळे कॉलेजच्या सभागृहात होणार आहेत.
रविवार दि. १२ फेब्रुवारी १० वाजता शिवस्मारकात गायन स्पर्धा होणार आहे. सर्व स्पर्धांच्या सर्व गटातील विजेत्यांना पहिल्या क्रमांकाला ५ हजार, दुसऱ्या क्रमांकाला ३ हजार, तिसऱ्या क्रमांकाला १५०० रुपयांचे पारितोषिक तसेच प्रत्येक गटातील उत्तेजनार्थ विजेत्यांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे नियम आणि अटी जाणून घेण्यासाठी वासुदव चौगुले ९९०१०७०२३४, ईश्वर बोबाटे ९९४५३८४५०१ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सर्वात महत्वाचे..
सामान्यज्ञान-प्रज्ञाशोध परिक्षा
रविवार दि. ५ फेब्रुवारी रोजी सामान्यज्ञान-प्रज्ञाशोध परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धादेखील तीन गटात होणार असून प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यलयीन गटात ही परिक्षा होणार असल्याचे श्री.कापोलकर यांनी सांगितले. प्राथमिक आणि माध्यमिक गटातील सात विजेत्यांना रोख तसेच माध्यमिक गटातील पाच विजेत्यांना रोख रक्कमेची बक्षिसे दिली जाणार आहेत. ही स्पर्धा रावसाहेब वागळे महाविद्यालयात होणार आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना मराठी भाषादिनी २७ फेब्रुवारी रोजी १० वाजता शिवस्मारकात होणाऱ्या कार्यक्रमात पारितोषिकांचे वितरण केले जाणार असल्याची माहिती मऱ्याप्पा पाटील यांनी यावेळी दिली.
yes baby click my site hit baby marti temizlik hizmetleri