बेळगाव: संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतलेल्या बेळगाव ग्रामीण मतदार संघामध्ये आता महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार म्हणून आर . एम. चौगुले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता म. ए. समितीच्या विजयासाठी मराठी बांधवांनी संघटित होऊन त्यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामीण मतदारसंघामध्ये म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्यासाठी 5 जणांनी अर्ज दाखल केले होते. त्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर निवड समितीने उमेदवाराचे नाव जाहीर केलयं. तालुका म. ए. समितीने बेळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन केले होते. यानुसार ग्रामीणमधून माजी महापौर शिवाजी सुंठकर (कणबर्गी), आर. एम. चौगुले (मण्णूर), रामचंद्र मोदगेकर (निलजी), आर. आय. पाटील (कंग्राळी खुर्द), आणि अॅड. सुधीर चव्हाण (कंग्राळी बुद्रुक) यांनी समितीकडे उमेदवारीसाठी अर्ज केला होता. अखेर मुलाखत आणि निवडीनंतर आज बुधवारी निवड समिती सदस्यांनी केलेल्या मतदानानंतर बेळगाव ग्रामीण मतदारसंघामधून आर. एम. चौगुले यांना समितीची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर कीनेकर यांनी ही निवड जाहीर केली. त्यानंतर इतर इच्छुकांनी त्यांच्या पाठीशी उभे राहीन विजयी करण्याचे अभिवाचन दिले. त्यांचे मतदार संघातून अभिनंदन होत आहे.
अरविंद पाटील बंडाच्या पावित्र्यात?
खानापूर: प्रचंड उत्कंठा लागून राहिलेली खानापूर भाजपची उमेदवारी विठ्ठल हलगेकर याना जाहीर झाली आहे. दरम्यान, त्यांना शह देण्यासाठी भाजपचे नेते माजी आमदार अरविंद पाटील, बाबुराव देसाई, मंजुळा कापसे आणि बसवराज सानिकोप्प यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. आज त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक येथील शनाया पाल्ममध्ये झाली यावेळी कार्यकर्त्यांनी अरविंद पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढवावी, […]