आमदार निलेश लंके यांचे आवाहन; गर्लगुंजीत मुरलीधर पाटील यांना प्रचंड प्रतिसाद
- खानापूर: म.ए.समिती हा पक्ष नाही, पार्टी नाही. मराठी माणसाला स्वाभिमानाने जगविणारी ती संघटना आहे. समितीतून निवडून जाणारे हे आमदार हे पक्षाच्या आमदारासारखे मिरविण्यासाठी नसतात, तर ते मराठी माणसाचे खऱ्या अर्थाने प्रतिनिधीत्व करीत असतात. म्हणून मराठी माणसाला स्वाभिमानाने जगण्यासाठी मराठी भाषिकांनी एकसंघ होऊन समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी केले.
सोमवारी (ता.०१) गर्लगुंजी येथे मुरलीधर पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते. सभेला मराठी भाषिकांनी तोबा गर्दी केली होती. त्यांच्या प्रचाराच्या धडाक्याने विरोधकांनाही धडकी भरली आहे.
गेल्या ६६ वर्षांपासून मराठी भाषिक सीमाभागात कितपत पडला आहे. कर्नाटक सरकार मराठी माणसांवर अनन्वित अत्याचार करीत आहे. तरीही आपली मायमराठी टिकली पाहिजे, जगली पाहिजे यासाठी मराठी भाषिकांनी केलेला त्याग कौतुकास्पद आहे. लोकशाहीने दिलेला हक्क आपण मागत आहोत, निश्चितपणे सर्वोच्च न्यायालयात आपला विजय होईल. त्यासाठी आधी ही आमदारकीची विजयी गुढी उभारावी लागेल. खानापूर तालुकावासीयांनी मुरलीधर पाटील यांना प्रचंड बहुमतांने विजयी करून त्यांना विधानसभेत पाठवावे, असे आमदार निलेश लंके म्हणाले.
सुरूवातीला संयुक्त महाराष्ट्राच्या गगनभेदी घोषणा देत गर्लगुंजी गावातून प्रचारफेरी काढण्यात आली. प्रत्येक गल्लीत सुहासिणींनी मुरलीधर पाटील यांना आरती करून त्यांचे स्वागत केले. यावेळी अबालवृध्द आणि महिलांसह तरूणांनी त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. लक्ष्मी मंदिरसमोर सभा पार पडली. यावेळी बोलतांना जेष्ठ नेते गोपाळ पाटील म्हणाले, गर्लगुंजी गावाचे सीमालढ्यात मोठे योगदान आहे. यापूर्वी कधीही गावाने सीमालढ्याशी फारकत घेतली नाही. यावेळी तर राष्ट्रवादी काँग्रेसने सीमालढ्याला मोठे पाठबळ दिले आहे. त्यामुळे मुरलीधर पाटील यांना सर्वाधिक मताधिक्याने विजयी करण्यात गर्लगुंजी गाव नक्कीच योगदान देईल, अशी ग्वाही दिली. प्रसंगी समिती नेत्यांसह गावपंच आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विरोधकांना धडकी
गर्लगुंजी हे गाव समितीचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे हा किल्ला भेदण्याचा प्रयत्न राष्ट्रीय पक्षांनी चालविला असतांनाच सोमवारच्या प्रचारफेरी आणि प्रचारसभेतील मराठी भाषिकांच्या आवेषाने विरोधकांना धडकी भरली आहे. मुरलीधर पाटील यांच्या विजयावर जणू शिक्कामोर्तब झाला असून आता मागे हटायचे नाही. लढायचे आणि जिंकायचे असा वज्रनिर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.यावेळी युवा नेते शुभम शेळके, माजी आमदार दिगंबर पाटील, अध्यक्ष गोपाळ देसाई, कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे यांची भाषणे झाली.