शंकर गावडा यांचे आवाहन; निलावडे भागात म.ए.समिती प्रचाराचा धडाका
खानापूर: सीमाभागातील मराठी भाषा आणि संस्कृती संपविण्याचा घाट राष्ट्रीय पक्षांनी घातला आहे. त्याला महाराष्ट्रातील भाजप आणि काँग्रेसचे नेते खतपाणी घालत आहेत. ही धोक्याची घंटा असून मराठी वाचविण्याची जबाबदारी सर्वस्वी आपल्यावर आली आहे. अशावेळी कर्नाटकाच्या विधानसभेत मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी मराठीचे प्रतिनिधी म्हणून मुरलीधर पाटील यांना संधी द्या. त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करून मराठी भाषिकांनी ताकद दाखवून द्या, असे आवाहन समितीचे युवा नेते शंकर गावडा यांनी मुघवडे येथील प्रचार सभेत केले. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देतांना मुघवडेवासीयांनी उस्त्फुर्दपणे प्रतिसाद दिला.
राष्ट्रीय पक्ष हद्दपार करणार..
मराठी भाषा आणि संस्कृती टिकविण्यात म.ए.समितीने मोलाचे योगदान दिले आहे. निवडणूक असल्यामुळे आता विविध राष्ट्रीय पक्षांचे नेते गावांमध्ये येऊन विकास करण्याचे आश्वासन देत आहेत. आमचा भाग हा दुर्गम आहे. एवढे दिवस हे राष्ट्रीय पक्षांचे नेते कुठे गेले होते. खऱ्या अर्थाने या भागाचा विकास हा समितीच्या आमदारांनीच केला आहे. सीमाप्रश्न हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे, त्यासाठी आमच्या वडिलधारी मंडळींनी तुरूंगवास भोगला आणि तरूणांनी आंदोलनात लाठ्या-काठ्या खाल्ल्या आहेत, त्यामुळे यावेळी राष्ट्रीय पक्षांना हद्दपार करून मुरलीधर पाटील यांना बहुमताने विजयी करणार, असा निर्धार निलावडे भागातील जनतेतून व्यक्त करण्यात आला.
समितीच्या कार्यकर्त्यांनी मळव, अल्लोळी, आंबोळी, निलावडे, कोकणवाडा आणि मुघवडे येथे प्रचारफेरी तसेच कोपरा सभा घेऊन प्रचार केला. यावेळी तेथील नागरीकांनी स्वयंस्फुर्तीने सभेत सहभाग घेत यावेळी कोणत्याही राष्ट्रीय पक्षांच्या आमिषाला बळी पडणार नाही. मराठी अस्मिता जपत समितीलाच मतदान करणार अशी ग्वाही दिली. सुरूवातीला मळव येथील विठ्ठल मंदिरसमोर सभा झाली. यावेळी निंगाप्पा पार्सेकर यांनी गावाच्यावतीने समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांना पाठींबा जाहीर केला. गावातील एकही मत इतर उमेदवारांना जाणार नाही, याची दक्षता घेण्याची ग्वाही दिली.
आंबोळी आणि निलावडे येथे घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला. गावातील गावपंचांनी कार्यकर्त्यांसमवेत प्रचारकार्यात सहभाग घेऊन मतदानाचे आवाहन केले. मुघवडे येथे कोपरा सभा घेण्यात आली यावेळी गावकऱ्यांनी मुरलीधर पाटील यांनाच मतदान करण्याचा आणि मराठी भाषा जपण्याचा निर्धार व्यक्त केला.सभेला महिला आणि पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलिसांची दंडेलशाही;गर्लगुंजीत समिती कार्यकर्त्यांना अटक
खानापूर: काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविणाऱ्या म.ए.समिती कार्यकर्त्यांना पोलिसांनी गर्लगुंजीत अटक केली. अशोक चव्हाणांना समिती उमेदवाराच्या विरोधात प्रचार करू नये असे आवाहन करण्यात आले होते.तरीही त्यांनी समितीचा बालेकिल्ला असलेल्या गर्लगुंजी येथे रोड शो करून मतयाचना करण्याचा प्रयत्न केला. गेल्या कांही दिवसांपासून भाजप आणि काँग्रेसच्या महाराष्ट्रातील […]