गेल्या कांही दिवसांपासून भाजप आणि काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी त्यांच्या पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार चालविला आहे. गुरूवारी बेळगाव ग्रामीण मतदार संघात अशोक चव्हाण यांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविण्यात आला होता. त्यातून त्यांना शहाणपण येईल, असे वाटले असतांनाच शुक्रवारी ते खानापूर मतदार संघात काँग्रेस उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी दाखल झाले. गर्लगुंजी येथे त्यांच्या वाहनांचा ताफा येताच समिती कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणांसह संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देण्यात आल्या. काळे झेंडे दाखवून त्यांच्या कृत्याचा निषेध नोंदवित असतांना पोलिसांनी समितीच्या २० कार्यकर्त्यांना अटक करून खानापूर पोलिस स्थानकात आणले.
गर्लगुंजीत मोठा पोलिसफाटा तैनात करण्यात आला होता. सुरूवातीपासूनच प्रशासनाची समिती आणि मराठी भाषिकांवर वक्रदृष्टी आहे. त्यात निषेध नोंदवित असल्याच्या कारणावरून पोलिसांनी लागलीच कार्यकर्त्यांना अटक केली. एरवी, महाराष्ट्राच्या नेत्यांचा द्वेष करणाऱ्या पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल मराठी भाषिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. एकंदर, प्रशासकीय यंत्रणादेखील राष्ट्रीय पक्षांच्या पाठीशी असल्याचे दिसून आले.
दादागिरी नही चलेगी..
अशोक चव्हाण यांनी मागील निवडणुकीत सुध्दा गर्लगुंजीत येऊन प्रचार करण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्यावेळी समिती कार्यकर्त्यांनी अर्ध्या वाटेतून हुसकावून लावले होते. त्यातूनही त्यांना शहाणपणा आला नाही. पुन्हा ते गर्लगुंजीत दाखल झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला. नही चलेगी, नही चलेगी दादागिरी नही चलेगी, अश्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.
राष्ट्रीय पक्षांनी खानापूर तालुक्याचं वाट्टोळं केलं
संवाद / चेतन लक्केबैलकरसीमाप्रश्नाची सोडवणूक हाच आमचा मूळ आजेंडा आहे. खानापूर तालुक्यातील मराठी भाषा आणि संस्कृती टिकविण्यात समितीने ऐतिहासिक योगदान दिलेले आहे. कुप्पटगिरीचे नागापण्णा होसुरकर यांनी हौतात्म्य पत्करले. सुमारे ५०० हून अधिक सत्याग्रहींनी त्यांच्या संसारावर तुळशीपात्र ठेऊन तुरूंगवास भोगला. सीमाप्रश्न हा ६६ वर्षे इतका प्रदीर्घ काळ चाललेला हा जगातील एकमेव लढा म.ए.समितीने टिकऊन ठेवला आहे. […]