रेल्वे अपघात म्हटलं की, बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील लोकांना २९ डिसेंबर १९८० साली झालेल्या रेल्वे अपघाताची आठवण येते. त्या अंगावर शहारे आणणाऱ्या अपघाताच्या आठवणी आजही इदलहोंड परिसरातील लोक सांगतांना दिसतात. २९ डिसेंबर १९८० च्या पहाटे डेक्कन एक्स्प्रेस लोंढ्याहून बेळगावकडे जात असतांना इदलहोंडजवळ हा अपघात झाला होता. रेल्वेच्या सर्व बोगी रुळावरून घसरल्या होत्या. त्यात सुमारे १२५ प्रवाशी ठार तर शेकडो प्रवाशी जखमी झाले होते. परिसरात रक्त आणि मांसाचा सडा पडला होता. अपघातानंतर जखमी प्रवाशांच्या विव्हळण्याने परिसर दणाणून गेल्याच्या आठवणी आजही इदलहोंड परिसरातील नागरीकांकडून सांगितल्या जातात. ओडिशामधील अपघातानंतर पुन्हा एकदा या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
नागरगाळीजवळ अपघात
खानापूर तालुक्यातील नागरगाळीच्या जंगलात २०११ मध्ये दादर एक्स्प्रेसच्या बोगी रुळावरून घसरल्या होत्या. केवळ सुदैवाने या अपघातात जिवित वा वीत्त हानी झाली नव्हती. केवळ सुदैवाने त्यावेळी इदलहोंड येथील डेक्कन अपघाताची पुनरावृत्ती टळली होती. तसेच गुंजीजवळ एका ट्रकला रेल्वेने उडविले होते. त्यात जिवितहानी टळली मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले होते.
- कर्नाटकातील रेल्वे अपघात
- १९ मार्च १९६८: हुबळी ते पुणे एक्स्प्रेस रुळावरून घसरून याळविगी स्टेशनजवळ झालेल्या अपघातात ५३ प्रवाशी ठार झाले तर ४२ जखमी झाले होते.
- २६ एप्रिल १९७२: म्हैसूरजवळ रेल्वे घसरून २१ ठार ३७ जखमी
- १९ मे १९८९: कर्नाटक एक्स्प्रेसला अपघात, ६९ ठार
- ६ मार्च १९९९: म्हैसूरजवळील मलकीदुर्गा घाटात रेल्वेच्या बोगी कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत ३३० प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू.
- २३ ऑक्टोबर २००६: म्हैसूर – बंगळूर पॅसेंजरला पल्लीहळ्ळी येथे अपघात, चार महिला ठार तर ३८ जखमी.
- १८ जून २०१०: अमरावती एक्स्प्रेसला कोप्पळ येथे अपघात, २९ जखमी
- २५ सप्टेंबर २०११: बंगळूर येथे मालवाहू रेल्वेला अपघात, सुदैवाने जिवितहानी नाही. मात्र दोन बोगींचे तुकडे झाल्याने हा अपघात राज्यभरात चर्चेत राहिला होता.
- २६ मार्च २०१२: बंगळूर येथे रेल्वेने ट्रकला उडडविल्याने झालेल्या अपघातात ट्रकचालक जागीच ठार.
- १६ ऑक्टोबर २०१२: सोलापूर- हैद्राबाद पॅसेंजरच्या बोगीला गुलबर्गा येथे आग. सहा प्रवाशांनी बोगीबाहेर उड्या मारून जीव वाचविला, अनेक जण जखमी झाले होते.
- १३ फेब्रुवारी २०१५: बंगळूर शहर एर्नाकुलम् रेल्वेला अनेकलजवळ अपघातात १२ ठार, १० जखमी.
One thought on “खानापूरजवळही घडला होता भीषण रेल्वे अपघात; आठवणी झाल्या ताज्या”