खानापूर: कर्जबाजारी शेतकऱ्याने शिवारातील काजूच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना निट्टूर येथे घडली. कल्लाप्पा बाळाराम कांजळेकर (वय ४८) असे या शेतकऱ्याचे नाव असून त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे, विवाहित मुलगी असा परिवार आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, कल्लाप्पा यांनी विविध बँक आणि सहकारी संस्थांकडून कर्ज घेतले होते. त्याची परतफेड करता न आल्याने ते चिंतेत होते. त्याच नैराश्येतून त्यांनी त्यांच्या शेतातील काजूच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपविले. बुधवारी (ता.१४) ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. प्राथमिक आरोग्य केंद्रात शवचिकित्सा केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यात आला. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
महिलेचा मलप्रभेत आत्महत्येचा प्रयत्न
बुधवारी रात्री आठच्या सुमारास महिलेने मलप्रभा नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.त्या सुदैवाने वाचल्या असल्या तरी पात्रात पाणी नसल्याने त्या दगडावर पडून गंभीर जखमी झाल्या आहेत. सदर अनोळखी महिलेचे वय अंदाजे ६० असून त्यांच्यावर बेळगाव येथील जिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत.
बुधवारी रात्री एक महिला मलप्रभेच्या पुलावरून उडी टाकत असल्याचे तेथून जाणाऱ्या प्रवाशांच्या लक्षात आले. त्यानंतर प्रसंगावधान दाखवित तिघांनी त्या महिलेला जखमी आवस्थेत पात्राबाहेर काढून प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. गंभीर जखमी झाल्याने सदर महिला बेशुध्दावस्थेत होती. त्यांना तात्काळ बेळगावला हलविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत त्यांची ओळख पटली नव्हती. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
One thought on “निट्टूर येथे शेतकऱ्याची आत्महत्या; खानापुरात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न”