समांतर क्रांती विशेष
खानापूर तालुक्याला पौराणिक, ऐतिहासिक महत्व लाभलेले आहे. तरीही परप्रांतात खानापूरकरांना ‘तेलगी खानापूर’चे का? अशा लाजिरवाण्या प्रश्नाचा सामना करावा लागतो. पण, येथील अनेक सुपुत्रांनी देशभरात ही लाजिरवाणी ओळख पुसून काढण्याचा आटोकाट प्रयत्न त्यांच्या कामगिरीतून केला आहे. सध्या गोव्यात अशाच एका संवेदनशील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून रंगली आहे. तब्बल १५ हून अधिक तरूणींवर बलात्कार करून त्यांची हत्या करणाऱ्या महानंद नाईकला २१ दिवसांसाठी फर्लोगवर तुरूंगाबाहेर सोडण्यात आले आहे. १४ वर्षांपूर्वी या दुपट्टा किलरच्या मुसक्या खानापूर तालुक्यातील मेरडा गावचे सुपुत्र व फोंडा येथील तत्कालीन पोलीस निरीक्षक चेतन पाटील यांनी आवळल्या होत्या.
गोव्यातील गुन्हेगारी विश्वाला ज्यांचे नाव ऐकून घाम फुटतो, ते चेतन पाटील हे खानापूर तालुक्यातील मेरडा गावचे. त्यांनी गोव्यात पोलिस खात्यात रुजू झाल्यानंतर अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये शेकडो गुन्हेगारांना कारागृहात धाडले. दुपट्टा किलर-सिरियल किलर महानंद नाईक यांच्या अटकेनंतर त्यांनी दाखविलेली तत्परता आणि तपास अधिकारी म्हणून बजावलेली भूमिका यामुळे पुढील अनेक हत्या टळल्याच; शिवाय महानंद गेल्या १४ वर्षांपासून कारागृहाची हवा खात आहे. अलिकडे अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये साक्षी-पुराव्यांअभावी गुन्हेगार मोकाट सुटतात. पोलिसांच्या कामगिरीवर यामुळे बोट ठेवले जाते. १९९४ ते २००९ पर्यंतच्या १६ वर्षात घडलेल्या गुन्ह्यांचा तपास चलाखपणे करून महानंदला जन्मठेपेपर्यंत पोहचविण्यात चेतन पाटील यांनी दिलेले योगदान कौतुकास्पद आहे. त्यामुळेच तब्बल १४ वर्षानंतरही गोव्यात चेतन पाटील यांची चर्चा होत आहे.
भोंदू बाबांचे बुरखे फाडले..
गोवा म्हणजे देवभूमी. त्यामुळे साहजिकच देवभोळेपणा हा गोमंतकीयांचा स्थायीभाव. म्हणूनच भोंदुबाबांचेही येथे फावते. भोंदुगिरी करून सर्वसामान्यांना लुटणाऱ्या अशा अनेक भोंदुबाबांना गजाआड पाठविण्याची मोहिम चेतन पाटील यांनी गोव्यात सुरू केली होती. त्यांच्या या कामगिरीचीही त्या काळात अशीच चर्चा झाली. पोलीस अधिकारी म्हटलं की, सामान्यांना दंडुका आणि सधनांना सलाम अशी व्यक्तीरेखा डोळ्यासमोर येते. पण, चेतन पाटील याला नेहमीच अपवाद राहिले. त्यां दंडुक्यापुढे सगळे एकसमान. शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एका निरपराध्याला शिक्षा होता कामा नये, हे न्यायव्यवस्थेचे तत्व. चेतन पाटील यांनी निरपराध्यांना मदतच केली, पण तेवढ्याच शिताफीने गुन्हेगारांच्याही मुसक्याही आवळल्या. आपल्या हद्दीतील गुन्हेगारीला चाप बसवितांना त्यांनी कुणाचाही मुलाहिजा राखला नाही. त्याचा त्रासही त्यांना त्यांच्या कार्यकालात झाला, पण त्याचा त्यांनी कधीच बाऊ केला नाही.
सच्चे पुरोगामी..
चेतन पाटील हे खऱ्या अर्थाने पुरोगामी असल्याचे त्यांच्या कृतीतून वारंवार दिसून आले आहे. त्यांनी उघडलेली भोंदुबाबांविरोधातील मोहिम असेल किंवा अंधश्रध्दा निर्मूलनाबाबतची त्यांची भूमिका असेल, ते अधिकारी असूनही त्यांच्याशी चिकटून राहिले. अलिकडेच दोन वर्षांपूर्वी त्यांच्या एकुलत्या कन्येचा विवाहदेखील त्यांनी केवळ मोजक्या लोकांच्या उपस्थित लावून दिला. गोव्यातील उच्चपदस्त पोलीस अधिकारी अशा पध्दतीने वागतो, तेव्हा त्याची चर्चा तर होणारच! त्यांनी अंधश्रध्दा निर्मूलनावर अनेक व्याख्यानेही दिली आहेत.
काय आहे दुपट्टा किलींग प्रकरण?
सिरीयल किलर महानंद नाईक तब्बल १४ वर्षांनंतर कोलवाळ कारागृहातून २१ दिवसांच्या फर्लोवर गुरुवारी बाहेर आला. प्रथमच त्याला अशी सुटी देण्यात आली आहे. लग्नाचे अमिष दाखवून महानद तरूण मुली आणि महिलांना जाळ्यात ओढायचा. निर्जनस्थळी नेऊन बलात्कार केल्यानंतर दुपट्ट्याच्या सहाय्याने गळा आवळून तो त्यांचा खून करीत होता. म्हणून तो ‘दुपट्टा किलर’ म्हणूनही कुख्यात बनला. तुरुंग प्रशासनाने फर्लो मंजूर केल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी महानंदला कारागृहातून बाहेर सोडण्यात आले. आता २१ दिवसांनंतर म्हणजे ५ जुलै रोजी संध्याकाळी तो पुन्हा कारागृहात जाणार आहे. महानंदवर १६ महिलांची हत्या केल्याचा आरोप आहे. यांतील दोन प्रकरणात त्याला जन्मठेप झाली आहे. ही खून प्रकरणे १९९४ ते २००९ या कालावधीत घडली होती. २००९ मध्ये त्याला फोंडा पोलिस स्थानकाचे निरीक्षक चेतन पाटील यांनी अटक केली होती. तेव्हापासून गेली १४ वर्षे तो कारागृहातच आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संपूर्ण गोव्यात हाहाकार माजला होता.
अपघातात दुचाकीस्वार ठार, आमदार हलगेकर धावले घटनास्थळी
खानापूर: दुचाकीने कारला ठोकरल्याने झालेल्या अपघातात हेब्बाळ येथील शशिकांत यल्लाप्पा मादार (वय ४५) हा दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. घटनेची माहिती मिळताच आमदार विठ्ठल हलगेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन मयताच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. मयत शशिकांत हे टिप्पर चालक होते, ते कामावर जात असतांना ही दुर्घटना घडली. गोवा क्रॉसजवळच्या सेवा रस्त्याने चुकीच्या दिशेने […]