कमरेवरचे हात सोडून
आभाळाला लाव तू,
ढगाला थोडे हलवून
भिजव माझा गाव तू..
अशी विनवणी तालुक्यातील बळीराजा विठ्ठलाकडे करीत आहे. आषाढीला सुरूवात झाली तरी वैशाख वनवा संपता संपेना, त्यामुळे अंगाची लाही होत आहे. बळीराजाला त्याची अजिबात काळजी नाही. बळीराजा आभाळाकडे टक लावून आहे. आषाढीच्या सुरूवातीला शेत पेरणीची कामे हातावेगळी केलेल्या बळीराजाला विठ्ठल भेटीची आस लागते. यावेळी मात्र अद्यापही वरूणराजाची कृपा झाली नसल्याने धुळवाफ पेरण्या केलेल्या शेतकऱ्याची मदार विठ्ठल कृपेवर आहे. विठ्ठल भेटीपूर्वीच त्याच्यावर विठ्ठलाला साकडे घालून पाऊस पाडण्याची विनवणी करण्याची वेळ आली आहे.
बिपरजॉय वादळाने किनारपट्टी भागात थैमान मांडले आहे. परिणामी, मान्सूनने केरळात प्रवेश केल्यानंतरही तो अद्याप कर्नाटकात दाखल झालेला नाही. खानापूर तालुका हा अतिवृष्टीचा तालुका पण येथेही अजून पावसाचा थेंब पडला नाही. मागिल महिन्यात झालेल्या पेरण्या वायफळ ठरल्या असून बियाने कुजल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. यंदा तालुक्यात ३० हजार हेक्टरमध्ये भात पेरणीचे उद्दिष्ठ होते, त्यापैकी २३ हजार ६२५ हेक्टरमधील पेरणी पूर्ण झाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात दुबार पेरणी करावी लागण्याच्या शक्यतेमुळे शेतकरी चिंतातूर बनला आहे. एकीकडे दुबार पेरणीचे संकट आवासून उभे असतांना दुसरीकडे कृषी खात्याकडे बियाणांचा तुटवडा शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे.
नदी उशाला, कोरड घशाला..
खानापूर तालुक्याची जीवनदायिनी मलप्रभा, म्हादई, मंगोत्री, काळी, पांढरी, मार्कंडेय आदी नद्यांचा उगम झाला आहे. सध्या या सर्वच नद्यांची पात्रे कोरडीठाक पडली आहेत. नदी काठावरील गावात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पावसाळ्याची शक्यता लक्षात घेऊन यापूर्वीच बधाऱ्यांमध्ये साठवून ठेवलेले पाणीदेखील सोडून देण्यात आले आहे. परिणामी, पिकांना पाणी मिळत नसल्याने पिके वाळू लागली आहे. दरवर्षी ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागणाऱ्या खानापूर तालुक्यावर यावर्षी जणू सुक्या दुष्काळाचे संकट ओढवल्यासारखी स्थिती आहे.
१४ गावांत पाणीबाणी
खानापूर शहरासह तालुक्यातील हलकर्णी, गांधीनगर, लक्केबैल, रामापूर, क.नंदगड, गर्बेनहट्टी, वडगाव, लोकोळी, कक्केरी, करीकट्टी आणि उचवडे या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. जिल्हाधिकारी वारंवार बैठका घेऊन पाण्याचे नियोजन करण्याची सूचना तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांना करीत आहेत. पण, आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार अशी सद्यस्थिती आहे. खानापूर शहराला सध्या चार ते पाच दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला जात असून कुपनलिकांच्या पाण्यावर शहराचा ‘गावगाडा’ चालला आहे.
येरे येरे पावसा..
सध्या तालुक्यातील शेतकऱ्याचे लक्ष पूर्णत: पावसाच्या आगमनाकडे लागले आहे. यंदा आवकाळी पावसानेदेखील दांडी मारल्याने परिस्थिती आणखीनच जटील आणि गंभीर बनली आहे. त्यामुळे विठ्ठल दर्शनाला जाण्यासाठी आसुसलेला बळीराजा ढगाला थोडे हलवून भिजव माझा गाव तू अशी विनवणी करतांना दिसत आहे.
अध्यक्षपदी पी.एच.पाटील, उपाध्यक्षपदी पुंडलिक कारलगेकर
नंदगड: येथील दक्षिण प्राथमिक कृषीपत्तीन संघाच्या अध्यक्षपदी पी.एच.पाटील यांची तर उपाध्यक्षपदी माजी जि.पं.सदस्य पुंडलिक कारलगेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी संचालक राहुल पाटील, दिलीप पाटील, व्यंकट केसरेकर, पार्वती वि.पाटील, रेणुका गुं.हलशीकर, संभाजी पारिश्वाडकर, महादेव पाटील, कृष्णा वड्डर, अर्जुन खणगावी, चंद्रकांत घाडी, व्यवस्थापक मुकुंद पाटील आणि श्रीनाथ पाटील आदी उपस्थित होते.