समांतर क्रांती वृत्त
जांबोटी: आधीच मान्सूनने वाकुल्या दाखवत बळीराजाला हैराण करून सोडले आहे. पावसाला सुरूवात झाली असली तरी अजून जोर नाही. त्यात आता एका साधूने यंदा खानापूर तालुक्याची जीवनदायिनी ‘मलप्रभा’ नदी दुथडी भरून वाहणार नाही, असा दावा एका साधूने केला आहे. विशेष म्हणजे या साधूला त्याच्या कारनाम्यामुळे मंदिर कमिटीने बाहेरचा रस्ता दाखविल्यानंतर त्याने मलप्रभेच्या पात्रातच ठाण मांडले आहे. त्याला पात्रातून हटविण्यासाठी तालुका प्रशासनाची शर्त सुरू असून त्याने मात्र त्याचा हेका सोडलेला नाही.त्याचा व्हीडीओही व्हायरल झाला आहे.
जांबोटी भागातील प्रसिध्द तिर्थस्थळ असलेल्या हब्बनहट्टी येथील स्वयंभू मारूती देवस्थानावर कांही वर्षांपूर्वी देवेंद्रसिंह शर्मा नामक व्यक्तीची पुजारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. कुटुंबीयासमवेत राहणाऱ्या या साधूने भक्तांची लूट चालविल्याचा आरोप करीत त्याला देवस्थानातून बेदखल करण्यात आले. त्यानंतर या साधूने माझा अपमान झाल्याचा कांगावा करीत नदी पात्रात ठाण मांडले आहे. जुलैमध्ये मलप्रभेचे पात्र दुथडी भरून वाहते. हा आतापर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन या साधूला तेथून हटविण्यासाठी तालुका प्रशासन प्रयत्नशील आहे. पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांच्यासह जांबोटी विभाग उपतहशिलदारांनी त्याला पात्राबाहेर काढले, पण त्यांची पाठ फिरताच पुन्हा साधूने नदी पात्रात ठाण मांडले.
दरम्यान, या साधूने देवस्थान कमिटीने माझाला अपमान केला असून यंदा तालुक्यात पाऊस होणार नाही. माझी माफी मागून पुन्हा मंदिराचा ताबा माझ्याकडे द्यावा. देवानंतर मंदिरावर माझा अधिकार आहे, असा दावा करीत सर्वांनाच बुचकळ्यात टाकले आहे. कमिटीवर गैरव्यवहाराचा आरोपही त्याने केला आहे. पाऊस आलाच नाही तर आमचे काय होणार? यावर मात्र त्याचे उत्तर विचीत्र असून लोकांनी कमिटीविरोधात आवाज उठवून माफी मागण्यास भाग पाडावे, त्यानंतर पाऊस पडेल असे त्याचे म्हणणे आहे.
One thought on “..म्हणे, यंदा मलप्रभा दुथडी भरून वाहणारच नाही!”