समांतर क्रांती विशेष
खानापूर: तालुक्यातील अनेक गावांना ऐतिहासिक महत्व आहे. पण, सर्वसामान्यांना त्याबद्दल माहितीच नाही. गेल्या कांही दिवसांपासून जांबोटीजवळच्या चिरेखाणी गावाची चर्चा सुरू झाली आहे. अर्थातच ही चर्चा तेथील समस्यांमुळे आणि मागासलेपणाबद्दल होत आहे. परंतु, या गावाला ऐतिहासिक महत्व प्राप्त आहे, याची माहिती कुणालाच नाही. जांबोटी संस्थानातील हे महत्वाचे गाव आहे. त्याला २०० वर्षांचा इतिहास असला तरी त्या गावातील समस्या सोडविण्याबद्दल कुणीच दखल घेतलेली दिसत नाही.
काय आहे माहात्म्य?
एक काळ होता, बहुतेक गावं जंगलात वसलेली असायची. जंगलाला आग लागली, महामारी आली की गावे स्थलांतरीत व्हायची. कणकुंबी परिसरातील गवळी आणि हणबर समाजाची वस्ती अशीच स्थलांतरीत झाली आणि ती जांबोटीच्या घनदाट अरण्यात वसली. जांबोटीकर सरदेसाईंच्या संस्थानातील होलिकोत्सव आणि वसंतोत्सवाला येणारे ‘चिरेपान’ हे याच परिसरातून आणले जाते, अशी माहिती भाजपच्या नेत्या धनश्री कर्णसिंह सरदेसाई जांबोटीकर यांनी दिली.
काय आहे स्थिती?
चिरेखाणी गावात सध्या २५ कुटुंबे वास्तव्याला आहेत. बहुतेकांचा उदरनिर्वाह हा पशूपालनावर अवलंबून आहे. गावात पाचवीपर्यंत शाळा आहे. पण, शाळा खोल्या कधी कोसळतील याचा नेम नाही. रस्ता म्हणावा तर नाहीच नाही. प्रत्येक गोष्टीसाठी लोकांना पायपीट करीत जांबोटीला यावे लागते. रुग्णांची तर हेळसांडच होते. मागील वर्षीच्या पावसात एका गर्भवर्ती महिला प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर तीला अक्षरश: लाकडे आणि कापडाच्या डोलीतून जांबोटीला आणावे लागले होते. पाचवीनंतर बहुतेक विद्यार्थी गुराखीच बनतात. जे जांबोटीला शिकायला येतात, त्यांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. उन्हाळ्यात कांही वाटत नाही. पण, पावसाळ्यात अस्वलासह जंगली श्वापदांपासून बचाव करीत घर गाठतांना आपण जिवंत घरी जाऊ याची खात्री त्यांना नसते.
जानू गवळी हे तालुका पंचायतीचे सभापती असतांना २०७-८० साली त्यांनी या गावाला शाळा खोली आणि पिण्याच्या पाण्याची योजना मंजुर करून घेतली. त्यावेळी पाणी योजनेचे काम कंत्राटदार बाळासाहेब शेलार यांनी केले होते. जानू गवळींच्या विनंतीवरून त्यांनी हे काम अत्यंत मेहनतीने केले. ज्यामुळे आजही तेथील लोकांना पाण्याची समस्या उद्भवली नाही. पण, दारोळीचे बबन देसाई यांनी शाळेचे काम अंत्यंत निकृष्ट केले होते. त्याविरोधात जानू गवळींनीही आवाज उठविला होता. (त्यात मीदेखील होतो)
आज जी शाळेची स्थिती आहे ती निर्मितीपासूनच आहे. रस्त्यासाठी धनश्री सरदेसाई जांबोटीलकर यांनी जीवाचं रान केलं. अनेकवेळा सरकारदरबारी समस्या मांडली. पण, आरक्षित जंगलाच्या प्रश्नामुळे ही समस्या सुटू शकलेली नाही. आजही त्या या लोकांना न्याय मिळावा यासाठी धडपडत आहेत. मध्यंतरी हे गाव उठविले जाणार अशाही वावड्या उठल्या होत्या. पण, त्याविरोधातही सौ. सरदेसाई यांनी आवाज उठवत वनखात्याला सज्जड दम दिला.
उपाध्यक्षांनी छतावर चढून ताडपत्री घातली.
नुकताच जांबोटी ग्रा.पं.चे उपाध्यक्ष सुनिल देसाई यांनी भर पावसात चिरेखाणीत जाऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. पंचायतीकडून जेवढ्या समस्या सोडविता येतील तेवढ्या सोडवू. प्रसंगी राज्य सरकारपर्यंत त्या समस्या मांडू, अशी ग्वाही देत दिलासा दिला. गावामध्ये प्राथमिक विद्यालय पहिली ते पाचवी पर्यंत आहे या इमारतीची सुद्धा खूप दुरुस्ती आहे यामुळे विद्यार्थ्यांना बसायला पाण्यामध्ये बसावं लागत होतं, याकरिता त्या इमारतीवर स्वतः चढून छतावर उपाय म्हणून ताडपत्री घातली. ग्रामपंचायत सदस्य अंजना हणबर यांचे पती शिवाजी हणबर यांच्या सहाय्याने या संपूर्ण गावाची पाहणी करून ज्या ज्या गावातील समस्या असतील त्या शासन दरबारी पोहोचवण्यासाठी सदैव तत्पर असणार आहे, असे सुनील देसाई यांनी ‘समांतर क्रांती’शी बोलतांना सांगितले.
कणकुंबीवर पुन्हा ओढवणार संकट
समांतर क्रांती वृत्त खानापूर: कळसा प्रकल्पामुळे अधीच कणकुंबी आणि परिसरातील निसर्ग संपदेवर कर्नाटक सरकारने घाला घातला आहे. प्रचंड अशा कालव्यामुळे कणकुंबीचे अस्तित्वच धोक्यात असतांना आता पुन्हा या परिसरातील गावांना नव्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. हलतर आणि कळसा या नाल्यावरील धरणे म्हादई अरण्यापासून केवळ २१० मिटरवर होणार होती. त्यामुळे हरित लवादासह पर्यावरण मंत्रालयाकडून परवानगी मिळणे […]