समांतर क्रांती वृत्त
खानापूर: तालुक्यात सध्या पावसाने थैमान मांडले आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अशातही खोळंबलेल्या शेतीच्या कामांना वेग आला आहे. मलप्रभा नदी काठावरील शिवारात काम करतांना पाय घसरून बैल पाण्यात पडला. या बैलाने अत्यंत जिकरीने दुथडी भरून वाहणाऱ्या आणि वेगवान प्रवाह असणाऱ्या १० कि.मी.चे अंतर पोहत जाऊन स्वत:चा जीव वाचविल्याची घटना आज रविवारी (ता.२३) कुसमळी जवळ घडली. या घटनेत तो धाडसी बैल बचावला असून त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, हब्बनहट्टीचे संतोष गणपती घाडी हे त्यांच्या कुटुंब कबिल्यासह कुसमळी येथील मलप्रभेच्या काठावरील शिवारात भाग लागवडीसाठी गेले होते. त्यांच्यासमवेत असलेल्या बैलाना त्यांनी शेजारी चरण्यास सोडले होते. चरतांना काठाचा अंदाज न आल्याने बैल थेट नदीत पडला आणि शंरपेठच्या दिशेने वाहून जाऊ लागला. ही बाब संतोष यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण, प्रवाह वेगवान असल्याने ते शक्य झाले नाही. जाबाज बैलाने मात्र स्वत:चा जीव वाचविण्यासाठी शंकरपेठपर्यंत मजल मारली. तेथील काठावर झुडपांच्या आधाराने तो अडकून राहिला. संतोष यांनी दहा कि.मी.च्या परिसरात शोध घेत असतांना बैल आढळून आल्यानंतर त्यांनी नि:श्वास सोडला.
बैलाला पाण्याबाहेर काढण्यात आले. पण, पोटात पाणी गेल्याने तो अत्यवस्थ झाला. तात्काळ पशूवैद्यकांना बोलवून उपचार करण्यात आले. अद्याप त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नसल्याचे समजते. संतोष घाडी यांनी त्यांच्या बैलाना जीव लावला आहे. त्यामुळे पाण्यातून वाहून गेलेल्या त्या बैलाने मालकाची वाट पाहत तब्बल १० कि.मी.पर्यंत पोहण्याची जणू शर्थ केली. या घटनेची परिसरात चर्चा होत असून मुक्या प्राण्याच्या या धाडसाबद्दल कौतूक होत आहे.
पाऊस पाणी: दिवसभरात काय घडलं? काय बिघडलं?
समांतर क्रांती वृत्त खानापूर: शनिवारी दुपारनंतर तालुक्याला पावसाने झोडपायला सुरूवात केली असून मध्यरात्रीपासून पावसाचा जोर कमालीचा वाढला आहे. मलप्रभा, म्हादई, काळी यासह अन्य नद्या-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा शहर आणि इतर परिसराशी संपर्क तुटला आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड, रस्ते खचल्याच्या आणि झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. परिणामी […]