चेतन लक्केबैलकर
आश्वासनांची खैरात करून जनसामान्यांना गुंतवून ठेवण्याचा चंग बांधून आगामी निवडणुकीत इस्पित साध्य करून घेण्याचा ध्यास तालुक्यातील इच्छूक उमेदवारांनी घेतला आहे. त्यात म.ए.समितीचे नेते, काँग्रेसच्या सर्वेसर्वा आमदार डॉ. अंजली निंबाळकर आणि तालुक्याच्या विकासाचा महामेरू पेलत असल्याचा अभास निर्माण करणाऱ्या भाजपच्या नेत्यांसह ‘भायल्यां’चाही समावेश आहे. मात्र, त्यांच्या या आश्वासनांमुळे सर्वसामान्यांचे जीव कवडीमोल झाले आहेत. तालुक्यातील एकही रस्ता आजच्या घडीला सुस्थितीत नाही. परिणामी, प्रवाशांची कंबरतोड नेहमीचीच झाली आहे. त्यातही खड्ड्यांवरचे रस्ते अपघातास कारण ठरून अनेकांना जीवाला मुकावे लागत आहे. मयत झाल्यानंतर ‘मगर मच्छ के असू’ डोळ्यात भरून तुटपुंज्या आर्थिक मदतीसाठी धावणाऱ्या नेत्यांची खरंच ‘त्या’ पिडीत कुटुंबीयांच्या हानीची भरपाई त्यांच्या स्वार्थी स्वांत्वनाने होईल, असे वाटणे हेच त्यांच्या बेमुर्वतपणाचे उदाहरण आहे.
मंगळवारी सकाळी आकराच्या सुमारास खानापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर रुमेवाडी क्रॉस-करंबळदरम्यान झालेल्या अपघातात दोन तरूण जीवांना बलिदान द्यावे लागले. त्यात हिंडलगी येथील प्रदिप मारूती कोलकार (वय २७) आणि ऐश्वर्या गुरन्नावर (वय २०) या दोघांचा बळी गेला. टिप्परच्या घडकेमुळे हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले तरी त्यामागील कारणांचा आढावा घेण्याची गरज आहे. त्याकडे मात्र तालुक्यातील कथीत नेत्यांचे आणि स्वार्थी लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झालेले आहे.
रुमेवाडी क्रॉस ते पुढे अळणावरपर्यंतच्या ताळगुप्पा रस्त्याची दयनीय अवस्था आहे. गोवा क्रॉसपासून रामनगरपर्यंतच्या रस्त्याची दूरवस्था तर अवर्णनीय अशीच आहे. कांही महिन्यांपूर्वी तालुक्याच्या ‘कार्यसम्राज्ञी’ आमदार डॉ. निंबाळकर यांनाच रुमेवाडी क्रॉस येथे रस्त्यांच्या दुरूस्तीच्या मागणीसाठी आंदोलनात उतरावे लागले होते. याहून मोठा दैवदुर्विस नाही. एकीकडे आपण तालुक्याचा इतका विकास केला असा दावा करायचा आणि दुसरीकडे राज्यातले भाजप सरकार विकास कामांसाठी सहकार्य करीत नाही, निधी उपलब्ध करून देत नाही, असे आरोप करायचे. यापैकी नेमका खरे? दावा की आरोप? याबाबत तालुकावासीयांत संभ्रम आहे. जर राज्य सरकार सहकार्य करीत नसेल तर विकास कोठून केला? आणि विकास केल्याची दवंडी पेटवत असाल तर तो कोठून केलात? याचे उत्तर तालुकावासीयांना अपेक्षीत आहे.
तालुक्यातील बहुतेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे होणारे अपघात सर्वसामान्य वाहनचालकांच्या जिवावर उठले आहेत. ज्या रस्त्यांचा विकास केल्याचा दावा केला जात आहे. त्यातील केवळ मोदेकोप आणि रामगुरवाडी गावांना जोडणाऱ्या संपर्क रस्त्यांची उदाहरणे घेतली तरी तालुक्यातील रस्ता विकासाचा दर्जा काय आहे, हे लक्षात येते. सर्वच खाती ‘हप्त्या-हप्त्यां’नी सुधारत असून रस्त्यांच्या कामातही तोच कित्ता गिरविला जात आहे. रस्ता केल्याच्या आवघ्या दोन-तीन महिन्यात रस्ते कसे खराब होतात? केवळ कामांच्या याद्या आणि भूमीपूजनाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल करून विकास होत असल्याची कोल्हेकुई करण्याचा हा जमाना असला तरी त्यातून घडणाऱ्या अपघातांना लगाम घालण्याचे ‘तंत्रज्ञान’ अद्याप अस्तित्वात आलेले नाही, हे या अक्कलशून्य नेत्यांना कधी समजणार हाच मुख्य प्रश्न आहे.
तालुक्यात आजच्या घडीला असे अनेक रस्ते आहेत, ज्यांची प्राथमिक डागडुजीदेखील झालेली नाही. पश्चिम भागातील जंगल रस्त्यांबाबत तर तालुक्यातील सर्वपक्षीयांनी हात टेकले आहेत. ज्या रस्त्यांची सुधारणा होऊ शकते त्यांचीही आवस्था गंभीर म्हणावी अशीच आहे. रामगुरवाडीला जोडणाऱ्या संपर्क रस्त्याच्या कामगिरीवरून ‘रस्ता नको; पण विकासाचे भोकाड आवर’ असे आवाहन नागरीक लोप्रतिनिधींना करू लागले आहेत. अपघातात जीव जाणे ही घटना अपघातप्रवण असली तरी त्याला रोखण्यासाठी कांही प्रयत्न केले जात आहेत का? यावर अनेक प्रश्नांची उत्तरे अवलंबून आहेत. भाजपचे नेते त्यांचे टु-टायर इंजीन सरकार असल्याचा तोरा मिरवित रस्ते विकासाची निवेदने देत फिरत आहेत. त्यांचे हे निवेदननाट्य केव्हाच उघड्यावर पडले आहे. खुद्द आमदारांनाच रस्त्यासाठी आंदोलन करावे लागते, याहून मोठा जोक होऊच शकत नाही.
म.ए.समितीच्या नेत्यांची गत वेगळीच आहे. त्यांचे त्यानांच सावरेना, त्यामुळे त्यांना तालुक्याच्या समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ असेल असे वाटत नाही. नाही म्हणायला गेल्या कांही दिवसांत त्यांनी विविध समस्यांबाबत निवेदनांच्या फैऱ्या अधिकाऱ्यांवर झाडल्या आहेत. पण सत्तेशिवाय शहाणपणा नाही अशी त्यांची गत आहे. तर जे सत्तेत आहेत, त्यांना ‘कमिशन’शिवाय शहाणपण येत नाही. परिणामी प्रदिप आणि ऐश्वर्या यांच्यासारख्या हातातोंडाला येणाऱ्या तरूणांचा रस्ते अपघातात बळी जाणे हे काळाचे देणे ठरते. त्याकडे तालुकावासीय हा केवळ नियतीचा खेळ म्हणून पाहत असतील; तर तो मुर्खपणा आहे. गावांचे सोडाच पण एका तालुक्याहून दुसऱ्या तालुक्याला जोडणारे, राज्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. त्याकडे तरी हे नेते लक्ष देतील का? लक्ष दिलेच तरी रस्ते ‘कमिशन’खाली दाबून त्यांची आवस्था मोदेकोप आणि रामगुरवाडीच्या रस्त्याप्रमाणे होत आहे. त्याविरोधात आवाज उठविणाऱ्यांचा आवाज कुणाच्याच कानापर्यंत जात नाही.
सर्वसामान्यांचा आवाज नेत्यांच्या कानापर्यंत पोहचायचा असेल तर येत्या निवडणुकीपूर्वी या नेत्यांना ‘गावबंदी’ करावी लागेल. तरच ते जमिनीवर येतील आणि त्यांना रस्त्यांची समस्या समजेल. गावबंदी करण्यासाठी आधी गावगुंड बनून ‘दलाली’ करणाऱ्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मुसक्या आवळाव्या लागतील. नाहीतर पुन्हा-पुन्हा प्रदिप आणि ऐश्वर्यासारखे तरूण हाकनाक बळी जातच राहतील. निवडणूक जवळ आली म्हणून हे नेते त्यांच्या घरी जातील. जमलंच तर त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांच्या हातात पाच-पन्नासच्या नोटांचे बंडल ठेवतील. पण, गेलेले जीव परत आणून देतील का?
अभिनंदन तर व्हायलाच हवे..!
सहकार / चेतन लक्केबैलकर कांही माणसं अतिमहत्वाकांक्षी असतात. त्यांना त्यांचे ध्येय गाठल्याशिवाय चैन पडत नसते. त्यासाठी ती एखाद्या मढ्याच्या छाताडावर पाय ठेवून सोपान चढायलाही मागे पुढे पाहत नाहीत. तर कांही जणांची महत्वाकांक्षा आभाळाला भिडण्याची जरी असली तरी त्यांची चिमणी होऊन दाणे टिपण्याचीही कुवत नसते. या मधल्या पोकळीत जी माणसं असतात, ती खऱ्या अर्थाने यशाचे शिखर […]