- खानापूर तालुक्यातील सर्व नदी-नाले तुडुंब
- मलप्रभा, म्हादई, काळीने गाठली धोक्याची पातळी
- सर्वत्र पूरस्थिती; जनजीवन विस्कळीत
- कुसमळीजवळून बैल वाहून गेला, पण..
- लोंढ्याजवळ महामार्गावरील पूल कोसळला
- भुरूणकीत दोन घरे कोसळली, सुदैवाने जीवित हानी नाही
- अतिवृष्टीमुळे सोमवारी शाळांना असेल सुट्टी
- ५० हून अधिक गावांचा संपर्क तुटला, वीज गायब
समांतर क्रांती वृत्त
खानापूर: शनिवारी दुपारनंतर तालुक्याला पावसाने झोडपायला सुरूवात केली असून मध्यरात्रीपासून पावसाचा जोर कमालीचा वाढला आहे. मलप्रभा, म्हादई, काळी यासह अन्य नद्या-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा शहर आणि इतर परिसराशी संपर्क तुटला आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड, रस्ते खचल्याच्या आणि झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. परिणामी जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने थैमान मांडल्याने आज रविवारी दिवसभर घराबाहेर पडणे मुश्किल झाले होते. त्यामुळे आठवडी बाझार असूनही खानापूर शहरात शुकशुकाट पसरला होता. दैनंदिन व्यवहाराला त्याचा फटका बसल्याचे किराणा व्यापारी प्रदिप मांजरेकर यांनी ‘समांतर क्रांती’शी बोलतांना सांगितले. अतिवृष्टीचा अंदाज घेत जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा उद्या सोमवारी (ता.२४) शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तसेच पावसाचा जोर आणि पूरस्थितीत वाढ होत असल्याने दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.
कुसमळीत बैल वाहून गेला, पण..
कुसमळी येथील मलप्रभा काठावरून बैल वाहून गेल्याची घटना दुपारी घडली होती. हब्बनहट्टी येथील संतोष घाडी यांच्या बैलाने तब्बल १० कि.मी. पाहून स्वत:चा जीव वाचविला. कणकुंबी भागात पावसाने आणखीनच जोर धरला असून मलप्रभा दुथडी भरून वाहत आहे. या भागातील पारवाड-कणकुंबी, कणकुंबी-चिगुळे, आमटे-तोराळी, देवाचीहट्टी- हब्बनहट्टी या रस्त्यावरील पुलांवर पाणी आल्याने वाहतूक पूर्णत: ठप्प राहिली. हलात्री नाल्यालादेखील पूर आला असून मणतुर्गाजवळील पूल तिसऱ्यांदा पाण्याखाली गेला. या भागातील सुमारे ३० हून अधिक गावांचा शहराशी संपर्क तुटला आहे. कुप्पटगिरीरा जाणाऱ्या जुन्या रस्त्याच्या पुलावरही पाणी आल्याने तो रस्ता वाहतूकीस बंद आहे.
भुरूणकीत घरे कोसळली
दुपारी भुरूणकी येथे दोन घरे कोसळल्याची घटना घडली. एका घटनेत केवळ सुदैवाने जिवीतहानी टळली. अतिवृष्टीमुळे घरांच्या पडझडीला सुरूवात झाली असून नागरीकांनी दक्ष राहावे, असे आवाहन तहशिलदारांनी केले आहे. तालुक्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागात झाडे उन्मळून पडण्याच्या घटनांत गेल्या दोन दिवसांत वाढ झाली आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला आहे. मोबाईल नेटवर्कदेखील मिळत नसल्याने नागरीकांना सपर्क साधणे अवघड झाले आहे. जांबोटी, कणकुंबी आणि शिरोली भागातील स्थिती अत्यंत दयनीय आहे. गेल्या सहा दिवसांपासून या भागात वीज पुरवठा खंडीत असल्याचे आमचे प्रतिनिधी कृष्णा भरणकर यांनी कळविले आहे.
लोंढ्याजवळ पूल कोसळला..
लोंढ्याजवळ नुकताच बांधण्यात आलेला महामार्गावरील पूल कोसळला असून यामुळे महामार्ग प्राधिकारणाची लक्तरेच वेशीवर टांगली गेली आहेत. महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून ही वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. चोर्ला महामार्गावर देखील खड्ड्यांचे साम्राज्य प्रस्तापित झाल्याने गोव्याला जाणाऱ्यांचा मार्ग सध्या खडतर आहे.
शेतकरी म्हणतात.. पूल कोसळला, पण आमची काय चूक?
समांतर क्रांती वृत्त खानापूर: अतिवृष्टी झाली तर ओला दुष्काळ, पाऊस नाही झाला तर सुका दुष्काळ शेतकऱ्याच्या वाट्याला येतो. सरकार चुकले तरी शेतकरीच भरडला जातो. लोंढाजवळ महामार्गावरील नव्याने बांधलेला पूल कोसळला. अतिवृष्टीमुळे पूल कोसळला हे सरकारी उत्तर असले तरी या घटनेमुळे मोहिशेतच्या शेतकऱ्यांची मात्र उपासमार होणार हे ठरलेले आहे. लोंढाजवळचा जो पूल कोसळला आहे, तो मुळातच […]