खासदारांचे रिपोर्ट कार्ड / समांतर क्रांती ब्युरो
खासदार अनंतकुमार हे देशातल्या निष्क्रीय खासदारांपैकी एक असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या पाच वर्षातील त्यांची संसदेतील कामगिरी अत्यंत सुमार राहिली आहे. एकीकडे संसदेत निष्क्रीय असतांनाच त्यांनी मतदार संघातील जनतेशीदेखील संपर्क ठेवला नाही. त्यामुळेच भाजपने त्यांना नारळ देत घरी बसविले आहे. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो, याचा अनुभव गेल्या ३० वर्षात कारवार लोकसभा मतदार संघातील मतदारांनी घेतला आहे.
सुरूवातीला हिंदुत्व धोक्यात असल्याचे सांगत खासदार बनलेले अनंतकुमार हेगडे यांचा पहिल्या खासदारकीच्यावेळी मतदार संघात वावर होता. त्यानंतर मात्र त्यांची नियत बदलली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या एका निवडणुकीत ‘दत्तकपुत्र’ असा उल्लेख केला आणि हेगडे यांना पंख फुटले. ते पुन्हा जमिनीवर आलेच नाहीत. त्यांनी खासदार म्हणून संसदेतील खूर्ची गरम केल्याचा कालावधी लक्षात घेऊन त्यांना एकदा मंत्रीपद बहाल करण्यात आले. तरीही त्यांचा वारू कांही उधळला नाही. त्यातच त्यांच्या बेताल वक्तव्यांनी पक्षासमोरील संकटात वाढ झाल्याने त्यांना मंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले.
वादग्रस्त व्यक्तीमत्व अशीच हेगडेंची प्रतिमा राहिली आहे. त्यांनी त्यांच्या मतदार संघात विकास कामे तर राबविली नाहीतच. पक्ष संघटनाकडेही त्यांनी कधी लक्ष दिले नाही. केवळ पक्षनेत्यांच्या जीवावर त्यांनी ३० वर्षे संसदेत खुर्ची गरम केली. स्थानिक नेत्यांवर अश्वासनांची खैरात करीत त्यांनी वेळोवेळी इस्पित साध्य केले. वादग्रस्त वक्तव्य करण्यात ते माहीर असून अलिकडेच त्यांनी आपले सरकार आल्यानंतर संविधान बदलणार असल्याची कोल्हेकुई केली होती. तत्पूर्वी दलित, अल्पसंख्यांक आणि महिलांवरील अत्याचाराबाबत त्यांनी वादग्रस्त विधाने करीत अंगावर राळ उडवून घेतली होती. एकंदर, लाईमलाईटमध्ये राहायचे पण काम करायचे नाही, अशी हेगडेंची नीती राहिली आहे.
उत्तर कन्नड मतदार संघातील खानापूर, कारवार, हल्याळ, शिरसी, यल्लापूर हे मतदार संघ जंगलाने व्यापलेले आणि दुर्गम आहेत. साहजिकच येथील समस्या वेगळ्या आहेत. विकासाचा थांगपत्ता नाही. अशा मतदार संघातील एकही समस्या खासदार हेगडे यांनी संसदेत मांडलेली नाही. त्याउलट त्यांनी जनतेची नेहमीच दिशाभूल केली आहे, असा विरोधकांचा आरोप आहे. त्यामुळे यावेळी भाजपवर जनता विश्वास ठेवणार नाही, असा विश्वास त्यांना वाटतो.
खासदार हेगडेंचे रिपोर्ट कार्ड
- १७ व्या लोकसभेत म्हणजे गेल्या पाच वर्षात लोकसभेची १५ अधिवेशने झाली. ती २७३ दिवस चालली. त्यातील १८८ दिवस खासदार हेगडे यांनी हजेरी पुस्तकात सह्या केल्या आहेत. त्यातही बहुतेकवेळा त्यांनी मोबाईल अटेंडन्सचा वापर करून केवळ सह्या केल्या आहेत. प्रत्यक्ष ते सभागृहात खूप कमी वेळा उपस्थित राहिले. तब्बल ८५ दिवस त्यांनी अधिवेशनांना दांडी मारली आहे. पाच वर्षात केवळ १४ लेखी प्रश्न उपस्थित केले आहेत. तर चार प्रश्नांमध्ये सामुहीक सहभाग आहे. पाच वर्षात कोणत्याच चर्चेत ते सहभागी झालेले नाहीत. ३० वर्षांचा अनुभव असतांनाही एखादा खासदार संसदेतल्या कोणत्याच चर्चेत सहभागी होत नाही, ही आश्चर्याची बाब आहे. शिवाय त्यांची पात्रता जाहीर करणारी आहे. त्यांनी खासदारांना मिळणाऱ्या निधीचाही केवळ ६७.८ टक्के इतकाच विनियोग केला आहे. २५ कोटींचा निधी त्यांना मिळाला होता. एकंदर, हेगडे हे निष्क्रीय खासदार ठरले आहेत. त्यांच्या पक्षाचा त्यांच्यावर वचक नसल्याचा हा परिपाक आहे. (Source: Digital Sansad)
क्रमश:
(लवकरच….हेगडेंनी उपस्थित केलेले प्रश्न आणि त्यामागील गोम)
One thought on “अनंतकुमार हेगडेंची ८५ दिवस दांडी; केवळ १४ प्रश्न”