गावगोंधळ / सदा टिकेकर
बालवाडीची अंगणवाडी झाल्यापासून खानापूर तालुक्यात घोटाळ्यांनी जन्म घेतला. खरंतर लहान मुलांना अक्षर ओळख व्हावी, यासाठी अंगणवाडींची सुरूवात झाली. पण, तालुक्यातील राजकारण्यांनी घोटाळे करून या उपक्रमावर अगदीच ‘शि-सू’ करून घाण करून ठेवली आहे. आता राष्ट्रीय पक्षांची सत्ता तालुक्यात आल्यानंतर तरी ही परंपरा खंडीत होईल, असे वाटले असतांना भाजपच्या एका नेत्यांने ‘ना खाऊंगा, ना खाणे दुंगा’च्या राष्ट्रीय घोषणेला (?) हरताळ फासला.
बालवाडीचे आवघ्या दोनेक वर्षात अंगणवाडीत रुपांतर केले गेले. १९९९ च्या सुमारास हे झाले. तेव्हा तालुक्याची नाडी तेव्हाचे म.ए.समितीचे तत्कालीन आमदार अशोक पाटील यांच्याकडे होती. तो काळ आताच्या इतका भ्रष्टाचाराने बजबजलेला नव्हता. तरीही तेव्हा अशोकरावांच्या बगलबच्च्यांनी अंगणवाडी शिक्षिकांच्या नियुक्तीत हात धुवून घेतले. त्याचा फटका अशोकरावांना बसला. अंगणवाडी शिक्षिकांच्या भरतीनंतर त्यांच्या राजकीय उतरंडीची सुरूवात झाली. त्यात त्यांची भ्रष्टाचारी आमदार अशी ओळख निर्माण झाली. त्यांच्या विरोधकांनी हा मुद्दा इतका चघळला की, अशोकरावांना त्यातून पळ काढणे जमले नाही. त्यातच त्यांच्यावर अनेक ‘अनपेक्षित’ आरोपही झाले. खरे-खोटे देव जाणे. अंगणवाडीतल्या भ्रष्टाचाराची सुरूवात ही अशी झाली.
समितीचे सज्जन (?) आमदार दिगंबर पाटील यांच्या काळातील अंगणवाडी शिक्षिका घोटाळ्याने तर कळसच केला. ‘माडीवर’च्या ‘काकां’च्या सेटलमेंटमुळे तेव्हा दिगंबरराव पुरते घायकुतीला आले होते. निंदा नालस्ती झाली ती वेगळीच! या एका घोटाळ्याने दिगंबररावांच्या पांढऱ्याशुभ्र कपड्यांवर डाग लागला. त्यांनीही ‘दाग अच्छे है’ म्हणत सारवासारव न करता मार्गाक्रम केले. पण, त्यात त्यांच्या राजकीय कारकिरर्दीची जी उतरंड सुरू झाली ती त्यांना वर्तमानातदेखील सावरता आलेली नाही. विशेष म्हणजे त्यांच्या या आगळपघळ वागण्याने म.ए.समितीच्या संघटनेचे मात्र तीनतेरा वाजले. यात आणखी एक विशेष म्हणजे विरोधकांनी हा विषय जेवढा चघळला नाही, त्याहून अधिक तो त्यांच्या स्वकीय हितशत्रूंनी चघळून चोथा केला. परिणामी, तीनच वर्षात झालेल्या निवडणुकीत त्यांना आणि समितीला सुध्दा ‘कर्मा’ची फळं मिळाली.
अशाप्रकारे अंगणवाडी शिक्षिका भरतीने दोघा आमदारांच्या राजकीय ‘करीयर’ची वाताहत केली असतांना भाजपचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या काळात ही भरती पारदर्शक होईल, अशी अटकळ होती. दोनच दिवसांपूर्वी त्यांच्या अगदी काखेतल्या नेत्यांने घोटाळा केल्याचे उघडकीस आले. त्या ‘भामट्या’ने तीस हजारांची लाच तर घेतलीच; शिवाय महिला आणि बाल कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी, बनावट शिक्के आणि बनावट नियुक्तीपत्राचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विठ्ठलरावांचा यात कांहीच ‘हात’ नसेलही, पण त्यांच्या जवळच्या नेत्यांने इतके गंभीर धाडस कसे काय केले? असा प्रश्न माजी आमदार तथा राष्ट्रीय काँग्रेसच्या सचीव डॉ. अंजली निंबाळकर यांनी करून भाजपला जबाबदार धरले आहे. एकंदर काय तर खानापूर तालुक्यात अंगणवाडीच्या शिक्षिकांच्या भरती प्रक्रियेत ‘शि-सू’ केल्याशिवाय बालसंवर्धन होणारच नाही, असा या लोकांचा कयास झाल्याचे दिसते. असो..
एरवी, अंगणवाडीतील पोषक आहारावर (?) कर्मचारी डल्ला मारतात, हे समजून घेता येईल. नेतेगिरी मिरविणारे लुबाडून कुणाला नोकऱ्या देत असतील तर पषक आहाराला किड लागणारच. त्यात विशेष काय? बालकांसाठीच्या या उपक्रमातील नेत्यांच्या अशा मर्कटलिलांमुळे इतर खात्यांच्या योजना आणि विकास कामांत काय होत असेल, असा प्रश्न पडल्यास नवल ते काय? असो… शेवटी काय हल्ली न्यायाधीशच लाच घेतांना सापडत असतांना वकील (?) तरी कसे मागे राहणार म्हणा..! असो..!
अंगणवाडी घोटाळाप्रकरणी भाजपच्या ‘त्या’ भामट्यास अटक
समांतर क्रांती / खानापूर अंगणवाडीत नोकरी देण्याचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक केल्या प्रकरणी भाजपच्या कायदा सेलचा संचालक आकाश अथणीकर याला गुरूवारी रात्री पोलिसांनी अटक केली. न्यायालयासमोर त्याला हजर केले असता त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. संशयीत आरोपी आकाश अथणीकर याने पाली येथील शितल प्रवीण पाटील यांना अंगणवाडीत नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून तीस […]