समांतर क्रांती विशेष
खानापूर तालुका हे आश्चर्य आणि अत्यर्क्यासह कुतुहल निर्माण करणाऱ्या गोष्टींचे माहेरघर आहे. निसर्ग आणि निर्मिकांने दोन्ही हातांनी खानापूर तालुक्यावर आविष्कार केला आहे. कांही ठिकाणे तर पर्यटकांचे औत्सुक्य वाढविणारी आहेत. पण, त्यांची ओळख करून देत त्या ठिकाणांना पर्यटनाचा दर्जा मिळवून देण्यात स्थानिक लोकप्रतिनिधींध्ये उदासिनता आहे. परिणामी, अशी अनेक पर्यटनस्थळे काळाच्या पडद्याआड आणि स्थानिकांच्याही विस्मृतीत जात आहेत. असेच कुतुहल निर्माण करणाऱ्या ‘आंतराळी गुंड्या’बाबत तालुक्यातील लोकांनाही माहिती नसणे, ही शोकांतिकाच आहे. कुठे आहे हा आंतराळी गुंडा?
माचिगड (बिजगर्णी) या ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व लाभलेल्या गावापासून पाच कि.मी. अंतरावरील हालसाल गावाच्या पश्चिमेला जंगलात आवघ्या दोन कि.मी. अंतरावर हा आंतराळी गुंडा आहे. अजस्त्र असा हा ग्रेनाईट दगड ज्या पध्दतीने दुसऱ्या दगडावर स्थिरावला आहे, ते आश्चर्यच आहे. हे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी प्रत्यक्ष त्या ठिकाणालाच भेट द्यावी लागते.
जंगलातील या परिसरात दोन-अडीच हेक्टरमध्ये ग्रेनाईटचे दगड आहेत. हाही त्यातीलच एक असला तरी परिसरातील लोक ही देवाची देणगी समजून त्याची पूजा-अर्चा करतात. तसेच अनेकजण साकडे घालतात. तामिळनाडूतील महाबलीपूरम् येथे असाच एक दगड आहे, जो श्री कृष्णाचा लोण्याचा गोळा म्हणून ओळखला जातो. तो पाहण्यासाठी भारतीलच नाही तर जगभरातील लाखो पर्यटक दरवर्षी भेट देत असतात. मात्र, खानापूर तालुक्यातील हालसालजवळील हा ‘कृष्णाचा लोण्याचा गोळा’ उपेक्षित आहे. आता तर ग्रेनाईट फरशीसाठी परिसरातील दगड काढले जात असून या ‘आंतराळी गुंड्या’लाही धोका निर्माण झाला आहे. पण, स्थानिकांनी किमान त्याला देवत्व प्राप्त करून देत संरक्षण केले आहे.
कसे जाल?
सदर ठिकाण हे खानापूर शहरापासून २० कि.मी. अंतरावर आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी खानापुरातून नंदगड-माचीगड असे जावे लागते. तसेच खानापूर कापोलीमार्गेही हालसालला पोहचता येते. या ठिकाणापासून लोंढा रेल्वे स्थानक १४ कि.मी. अंतरावर आहे. कापोली आणि बिजगर्णी (माचीगड) ग्राम पंचायतीने या ठिकाणाला पर्यटनपूरक प्रसिध्दी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, अशी स्थानिकांची मागणी आहे.
One thought on “खानापूर तालुक्यात कुठे आहे हा ‘अंतराळी गुंडा’”