समांतर क्रांती वृत्त
खानापूर: आमदार विठ्ठल हलगेकर यांनी मनमानी कारभार चालविला असल्याचा घणाघाती आरोप ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी यांनी केला आहे. आमदारांसाठी तालुका पंचायतच्या आवारात प्रशस्त कार्यालय असताना सुद्धा विद्यमान आमदारांनी त्यांचे नवीन कार्यालय देवराज आरस भवनमध्ये सरकारी परवानगी न घेता बेकायदेशीरपणे थाटले, असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी तहशिलदार आणि बीसीडब्लू तालुका अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.
माजी आमदार डॉ.अंजली हेमंत निंबाळकर यांनी सरकार दरबारी प्रयत्न करून खानापूर साठी भव्य असे देवराज आरस भवन मंजूर करून आणले. जनतेच्या सोयीसाठी हे भवन मंजूर करून घेतलेले असतांना संबंधीत खात्याची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता हे कार्यालय बळकावण्यात आले आहे. आमदारांच्या या बळजबरीने बळकवलेल्या कार्यालयाविरूद्ध तात्काळ कारवाई करून देवराज अर्स भवन खाली करून द्यावे अशी मागणी तालुका ब्लॉक कॉंग्रेसने केली आहे. जर दोन दिवसांत देवराज अर्स भवन ची इमारत खाली केली नाही तर संबंधीत अधिकाऱ्यांविरूद्ध निलंबनाची मागणी करणार असल्याचेही महादेव कोळींनी म्हटले आहे.
आमदारांची ही वर्तणूक अशोभनीय असून अशा प्रकारे कुणीही कुठेही त्यांचे कार्यालय थाटत असेल तर उद्या तालकास्तरीय कार्यालयातील कामकाज कुठे करायचे. २० तारखेला देवराज अर्स यांची जयंती आहे. ती कुठे साजरी करायची? संबंधीतांवर कारवाई तर झालीच पाहिजे शिवाय कार्यालय तात्काळ हटविले जावे, अशी आमची मागणी आहे. तसे न झाल्यास आंदोलन हाती घेऊ, असे श्री. कोळी यांनी कळविले आहे.
2 thoughts on “आमदार विठ्ठल हलगेकरांचा मनमानी कारभार”