खानापूर: प्रचंड उत्कंठा लागून राहिलेली खानापूर भाजपची उमेदवारी विठ्ठल हलगेकर याना जाहीर झाली आहे. दरम्यान, त्यांना शह देण्यासाठी भाजपचे नेते माजी आमदार अरविंद पाटील, बाबुराव देसाई, मंजुळा कापसे आणि बसवराज सानिकोप्प यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. आज त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक येथील शनाया पाल्ममध्ये झाली यावेळी
कार्यकर्त्यांनी अरविंद पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढवावी, अशी मागणी केली.
खानापुरातही सवदी फॅक्टर राबविण्याची ही नांदी मानली जात आहे. माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी याना डावलण्यात आल्याने त्यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. अरविंद पाटील हे त्यांचे समर्थक असून किमान त्यांना उमेदवारी द्यावी, यासाठी सवदींनी गळ टाकला होता.पण तो अयशस्वी ठरला. त्यामुळे अरविंद पतीलदेखील नाराज झाले आहेत. त्याचाच परिपाक म्हणून आज बुधवारी त्यांच्या हजारो समर्थकांनी त्यांना ‘वेगळा’ निर्णय घेण्याची गळ घातली. भाजप उमेदवाराविरोधात अपक्ष निवडणूक लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली.
निवडणुकीचा सर्व खर्च कार्यकर्ते स्वखर्चाने करतील, प्रचाराची जबाबदारी स्वीकारतील, पण ही निवडणूक लढवावी, अशी मते त्यांच्या समर्थकांनी मांडली.
यावेळी अरविंद पाटील यांनी, ‘ कार्यकर्त्यांनी गोंधळ न माजविता गप्प बसावे. येत्या दोन दिवसात योग्य तो निर्णय घेतला जाईल’ असे सांगत जवळपास बंडखोरीचा इशारा दिला आहे.
खानापुरात राष्ट्रीय पक्षांना बंडखोरीचे ग्रहण
खानापूर/चेतन लक्केबैलकरखानापुरातील राष्ट्रीय पक्षांच्या पाचवीलाच बंडखोरी पुजलेली आहे. यावेळीदेखील भाजप आणि काँगेसला बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. तर प्रादेशिक पक्ष असलेल्या निधर्मी जनता दलाचा उमेदवार ऐनवेळी बदलला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, बंडखोरीचा सामना करण्यातच पक्षाच्या उमेदवारांची अर्धी शक्ती खर्ची पडणार आहे. याचा फायदा समिती उमेदवाराला होण्याची शक्यता आहे. भाजपमधून विठ्ठल हलगेकर यांच्यासह माजी […]