कांही माणसं अतिमहत्वाकांक्षी असतात. त्यांना त्यांचे ध्येय गाठल्याशिवाय चैन पडत नसते. त्यासाठी ती एखाद्या मढ्याच्या छाताडावर पाय ठेवून सोपान चढायलाही मागे पुढे पाहत नाहीत. तर कांही जणांची महत्वाकांक्षा आभाळाला भिडण्याची जरी असली तरी त्यांची चिमणी होऊन दाणे टिपण्याचीही कुवत नसते. या मधल्या पोकळीत जी माणसं असतात, ती खऱ्या अर्थाने यशाचे शिखर गाठत गरूडभरारी घेतात. लोकनेता म्हणून समाजाच्या पटलावर आपली वेगळी छबी निर्माण करतात. ‘सहकाररत्न’ अरविंद पाटील हे कोणत्या ‘कॅटॅगिरी’त बसतात, याबाबत ज्याचे त्याने ठरवावे. आमदार म्हणून त्यांनी जे साध्य केलं नाही, त्याहून अधिक त्यांनी सहकार क्षेत्राला दिलं आहे. खरंतर कर्नाटक सरकारने त्यांना सहकाररत्न घोषीत करायला थोडा उशिरच केला. असो, देर आये दुरूस्त आये.
सहकाररत्न अरविंद पाटील हे वादग्रस्त व्यक्तिमत्व. खरंतर त्यांना माजी आमदार अशी बिरुदावली लावतांना थोडं खटकायला होतं. पण सहकाररत्न त्यांच्या कार्यकतृत्वाला शोभण्यासारखं आहे. अर्थातच त्यांनी या क्षेत्रात खरोखरच अत्यंत उल्खनीय कार्य केले आहे. त्याबद्दल कुणी शंका घेत असले तर तो अस्सल मूर्खपणा म्हणावा लागेल. तालुक्यात गेल्या ७५ वर्षात अनेक सहकार महर्षी (?) होऊन गेले; पण क्वचीतच कुण्या सहकार महर्षीने सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार केला असेल. आताही असे स्वयंघोषीत सहकार महर्षी, शिक्षण सम्राट तालुक्यात आहेत. तालुक्याची सत्ता पदरात पाडून घेण्यासाठी त्यांच्या जिवाचा सध्या अटापिटा चालला आहे. पण केवळ एका कृषी पत्तीन संस्थेचा संचालक म्हणून पदार्पण करून चक्क जिल्हा मध्यवर्ती बँकेवर मराठीचा झेंडा फडकविणारे अरविंदराव अवलियाच म्हणावे लागतील. सध्या ते भाजपवासी झाले असले तरी ते अमराठी ठरत नाहीत.
सहकार क्षेत्रात कुठेच चर्चेत नसलेल्या मेरडा कृषी पत्तीन सहकारी संघाचे संचालक झालेले अरविंद पाटील पुढे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि त्याही पुढे जाऊन तालुक्याचे आमदार होतील, असे भविष्य जरी कुणी त्याकाळी वर्तविले असते तर त्या जोतिष्याला खूळ्यात काढण्यापलिकडे वेगळे कांही घडले नसते. जिल्हा मध्यवर्तीवर लिंगायत लॉबीचे एकहुकमी वर्चस्व होते. त्याला खानापूर तालुकाही अपवाद नव्हता. पण, ज्या काळात हातावर मोजण्याइतक्या कृषी पत्तीन संस्था कार्यरत होत्या, त्याकाळात अरविंदरावांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा सोपान चढण्याचे महत्वाकांक्षी स्वप्न पाहिलेच नाही तर ते सत्यात उतरवितांना चार वेळा त्यांनी बँकेवरील आपला वरचश्मा कायम ठेवला आहे. यादरम्यानच्या काळात आधी भाजपचे तत्कालीन आमदार प्रल्हाद रेमाणी आणि गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्याशी टक्कर द्यावी लागली. पण, त्यांनी मोठ्या कसोशीने त्यांना धूळ चारली. अनेक संकटांना त्यांनी मोठ्या मुश्किलीने तोंड देत पण तेवढेच लिलया पेलत जिल्हा मध्यवर्ती बँकेवरील (अर्थातच सहकार क्षेत्रातील) त्यांचा वरचश्मा कायम ठेवला आहे. म्हणून त्यांना सहकाररत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेले नाही.
मेरडा कृषी पत्तीन सहकारी संघाचे संचालक म्हणून त्यांनी स्थानिकांना न्याय मिळवून देण्यात कसर सोडली नव्हती. या संस्थेतील अनुभव पाठीशी असल्याने त्यांनी मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून मोठी कामगिरी केली. तालुकाभर केवळ दहा कृषी पत्तीन होत्या, त्यांची संख्या त्यांनी ४९ पर्यंत पहचविली. या संस्थांना मिळणारी पतही तुटपुंजी होती. २००५ ते २०१० पर्यंतच्या काळात या कृषी पत्तीनचा अडव्हान्स (पत) केवळ ९ कोटी २५ लाख इतका होता. आजच्या घडीला तो सुमारे ९० कोटींचा आहे. अरविंदरावांच्या आधी मध्यवर्ती बँकेवर संचालक असणाऱ्यांना केवळ पाच वर्षातून एकदाच कृषी पत्तीन संस्थांची आठवण व्हायची. अरविंदरावांनी या संस्थांच्या माध्यमातून तालुक्याचे राजकारण केले आणि आमदारकीदेखील पदरात पाडून घेतली. त्यासाठी या संस्थातून शेतकऱ्यांना केवळ कर्ज देऊन ते गप्प बसले नाहीत, तर त्यांना खते मिळावीत या उद्देशाने त्यांनी विशेष प्रयत्न केले. सहकार क्षेत्रात केवळ कृषी पत्तीन संस्थांपुरताच मर्यादीत न राहता त्यांनी इतरही संस्थांशी सलोख्याचे संबंध ठेवत त्यांच्या वृध्दीसाठी विशेष प्रयत्न केले.
२५ वर्षांपूर्वी खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची आवस्था अत्यंत बिकट होती. शेतकऱ्याला शेतीसाठीही सावकाराचे उंबरे झिजवावे लागत. खानापूर शहराच्या मध्यवर्ती भागातील गल्लीतील सावकारांनी शेतकऱ्यांच्या मानगुटी कर्जाच्या ओझ्याखाली दाबून ठेवल्या होत्या. रुपड्यांच्या कर्जासाठी लाखांच्या जमिनी घशात घालून शेतकऱ्याला देशोधडीला लावण्यात या सावकारांनी कोणतीच कसर सोडली नव्हती. बाझारपेठही त्यांच्याच ताब्यात त्यामुळे अख्खा तालुका सावकार आणि त्यांच्या जातभाईंच्या तावडीत सापडला होता.आजदेखील हे सावकार आणि त्यांचे जातभाई ‘मायक्रो-फायनान्स’च्या माध्यमातून लोकांना पिडत आहेत. खुर्सीको सलाम करीत हा गंदा धंदा सुरूच आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तत्कालीन संचालकही त्यांचेच जातभाई त्यामुळे त्यांनी सहकारी संस्थांचा उध्दार केला असता तरच नवल! अरविंदरावांनी केवळ मध्यवर्तीची सत्ताच हस्तगत केली नाही तर त्यांनी तालुक्यातील वेठबिगारीची स्थिती बदलली. त्यामुळेच ते सहकाररत्न या पुरस्काराचे खऱ्या अर्थाने मानकरी आहेत. त्यांना पुरस्कार मिळाला. त्यांचा तालुक्यातील जनतेच्यावतीने सत्कारही झाला. ही रास्त अशीच बाब आहे.व्यक्ती म्हणून त्यांच्यात अनेक उणिवा असतीलही; परंतु, सहकाराच्या माध्यमातून अरविंदरावांनी केलेले कार्य या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी आदर्शवत आहे, हे मान्यच करावे लागेल. राजकारणात यश मिळविण्यासाठी त्यांनी कृषी पत्तीनचा वापर केल्याचा आरोप त्यांच्यावर नेहमीच होत आला आहे. तो तकलादू आहे. तळे राखील तो पाणी चाखील, या म्हणीप्रमाणे त्यांनी चांगल्यातून आपला स्वार्थ साधला तर चुकले कुठे? आताही अनेकजण सर्वसामान्यांना विविध प्रकारची आमिषे दाखवून स्वार्थी राजकारणाचे पत्ते पिसत आहेत. कुणी ताट-वाट्या वाटताहेत, कुणी संगणक वाटताहेत तर कुणी साड्या वाटून आपल्या समाजकार्याचा कंडू शमवून घेत आहेत. त्यातुलनेत अरविंद पाटलांनी सहकार क्षेत्रात केलेले ‘कनंस्ट्रक्टीव्ह’ कार्य मोलाचे ठरते. म्हणूनच त्यांना सहकाररत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन व्हायलाच हवे. अभिनंदन!
धरण तुमचं.. मरण आमचं..!
सुपा विस्थापितांच्या जमिनी 40 वर्षे पाण्याविना काळी नदीच्या पाण्याला उत्तर कर्नाटकाची वाट? बम्मू फोंडे/जोयडा पाण्याने समृद्ध असलेल्या शेत जमिनिंचा सुपा धरणासाठी त्याग केलेल्या विस्थापिताना रामनगर येथे जमिनी दिल्या आहेत , पण त्या जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी गेल्या 40 वर्षात पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली नाही. त्यामुळे सुपा धरणाच्या पाण्यावर होणाऱ्या वीजनिर्मितीतून राज्याला उजेड देणाऱ्या रामनगर वासियांच्या […]