समांतर क्रांती विशेष
कृषी पत्तीन सहकारी संघावरील वर्चस्वावर जिल्हा मध्यवर्ती बँकेवरील नेतृत्वाचे भवितव्य अवलंबून असल्याचे लक्षात आल्यानंतरच्या काळात म्हणजे गेली दोन दशके माजी आमदार अरविंद पाटील यांनी कृषी पत्तीन संघ आपल्या वळचणीला बांधून ठेवले आहेत. नाही म्हणायला त्यांनी तालुक्यात या संघांचे जाळे पसरवून शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. इतर कुणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक असते तरी हे विनासायास घडलेच असते. मागील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत अरविंद पाटील हे केवळ एका मताने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक झाले होते. त्यांना माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी काँटे की टक्कर देऊन दमछाक उडविली होती. त्या रिंगणात राहिल्या तर पुन्हा अशी कसरत करावी लागणार हे न समजण्याइतके अरविंद पाटील दूधखुळे नसल्याने त्यांनी यावेळी कृषी पत्तीन संघांच्या निवडणुका अविरोध करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठी त्यांनी नेहमीच्याच क्लृप्त्या अजमावण्याचा प्रयत्न चालविला असून त्याला कांही ठिकाणी यशही येत आहे, ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे.
विधान सभेच्या निवडणुकीत माजी आमदार अरविंद पाटील यांना भाजपच्या हायकमांडने ठेंगा दाखवित विठ्ठल हलगेकर यांना उमेदवारी दिली. साहजिकच अरविंद पाटील यांची गोळाबेरीज चुकली. पण, किमान जिल्हा मध्यवर्ती बँक तरी आपल्या आवाक्यात असावी, यासाठी त्यांनी कृषी पत्तीन संघांना ताब्यात ठेवण्यासाठी धडपड चालविली आहे. यावेळी त्यांना कोणीच तालुकास्तरीय नेत्यांने आडकाठी केलेली नाही. काँग्रेसच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर विधानसभा निवडणुकीचे उट्टे काढण्यासाठी आताच्या निवडणुकांचे रान पेटवतील अशी आपेक्षा होती, ती तूर्तास धुळीस मिळाली आहे. म.ए.समितीकडून अशावेळी कांही आपेक्षा करण्याचे कारण नाही. घरच झालंय थोडं, व्याह्याने धाडलंय घोडं अशी त्यांची गत झाली आहे. अरविंद पाटील भाजपवासी झाल्याने आणि विठ्ठल हलगेकरांच्या आमदारकीचे ‘शिल्पकार’ असल्याचे भासविण्यात ते यशस्वी झाल्याने भाजपेयी नेत्यांनी त्यांच्या प्रयत्नांत आडकाठी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
गावपातळीवरील वातावरण मात्र वेगळेच आहे. अरविंद पाटील यांनी भविष्यातील बेजमी करायला सुरूवात केली आहे, हे ओपन सिक्रेट आहे. त्यांना विरोध करणाऱ्यांना कुणाचाच पाठिंबा नसल्याने सध्या त्यांची गाडी सुसाट आहे. साम, दाम, दंड, भेदाचा वापर करून त्यांनी निवडणुका अविरोध करण्याच्या नावाखाली चमकोगिरीच चालविली आहे. एकुण २५ संघांपैकी खानापूर कृषी पत्तीनसह अन्य कांही संघांच्या निवडणुकांत मात्र त्यांचा नेहमीप्रमाणेच कस लागणार हे निश्चित आहे. त्यामुळे किती संघ अरविंद पाटील यांच्यासमवेत राहणार हे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीपर्यंत गुलदस्त्यात राहणार आहे.
कोमात तरीही जोमात..?
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मते मिळविण्यासाठी मोठा घोडेबाजार भरवावा लागतो, हे सगळ्यानाच माहीत आहे. आताच सगळी उर्जा खर्च करण्यापेक्षा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवेळीच मते खरेदी करू, अशी योजना अरविंद पाटील यांच्या विरोधकांनी आखली आहे. मागील वेळी अशी योजना केवळ एका मताने अपयशी ठरली होती. परिणामी, आता अरविंद पाटील कितीही आकांडतांडव केले तरी पुढे त्यांना खिंडीत पकडले जाणारच.
सभासद अनभिज्ञ?
२५ कृषी पत्तीन संघांच्या निवडणुका असल्या तरी त्या संघांचे सभासद निवडणुखपासून अनभिज्ञ आहेत. मराठीबहुल भागातील संघांच्या प्रस्तापित संचालकांनी निवडणुकांचा थांगपत्ता लागू नये यासाठी निवडणुकीचे प्रकटन (जाहिरात) कानडी वृत्तपत्रांना दिल्या, तर कन्नडबहूल संघांनी मराठी वृत्तपत्रांना जाहिराती दिल्या आहेत. निवडणुका अशा पध्दतीने अविरोध करणारे मस्तक आणि त्यांचे हस्तक कोण आहेत, हे लोकांना माहीत नाही अशातला भाग नाही. पण, तूर्तास मांजरीच्या गळ्यात घंटा कोण बांधणार हा मोठा प्रश्न असल्याने सगळ्यांनीच हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवले आहे.
One thought on “अरविंदराव जोमात, बाकी सगळे कोमात!”