आकरा जागांवर विजय; भाजपला धक्का
बेळगाव: काँग्रेसने पुन्हा भाजपचा उधळलेला सत्तावारू राखत संपूर्ण राज्यात भाजपचा धुव्वा उडविला. बेळगाव जिल्ह्यातदेखील १८ पैकी ११ जागांवर काँग्रेसने दणदणीत विजय मिलविला. मागील विधानसभा निवडणुकीत बेळगाव जिल्ह्यातील १८ पैकी १३ जागांवर भाजपने वर्चस्व मिळविले होते. ऑपरेशन कमळच्या वेळी आणखी तीन आमदारांनी भाजपचा रस्ता गाठला होता. त्यामुळे काँग्रेसकडे केवळ पाच आमदार होते. पण यावेळी जिल्ह्यातील राजकीय समिकरण पूर्णत: बदलले असून पुन्हा काँग्रेसने जिल्ह्यात जम बसविला आहे. विशेष म्हणजे ऑपरेशन कमळमध्ये भाजपवासी झालेले अथणीचे महेश कुमठळ्ळी आणि कागवाडचे श्रीमंत पाटील यांना मतदारांनी नारळ दिला आहे.
बेळगावातील तिन्ही मतदार संघात म.ए.समितीच्या उमेदवारांना दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. बेळगाव दक्षिणमधून समितीचे रमाकांत कोंडूस्करांनी भाजपचे अभय पाटील यांना काटे की टक्कर दिली. मात्र अभय पाटलांनी हा मतदार संघ पुन्हा राखत विजय मिळविला. बेळगाव ग्रामीणमध्ये काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर यांनी त्यांचा करिष्मा स्पष्ट करीत भाजपचे नागेश मन्नोळकर व समितीचे आर.एम.चौगुले यांना पराभव केला. काँग्रेसने पुन्हा बेळगाव उत्तर मतदार संघ काबिज केला असून असिफ (राजू) सेठ यांनी भाजपचे डॉ. रवी पाटील यांचा पराभव केला. खानापूरमध्येही काँग्रेसच्या डॉ. अंजली निंबाळकर यांना भाजपचे विठ्ठल हलगेकर यांनी पराभवाचा धक्का दिला.
निपाणीतून भाजपच्या शशिकला जोल्ले यांनी हॅटट्रीक साधली असून त्यांनी राष्ट्रवादीचे उत्तम पाटील व काँग्रेसचे काकासाहेब पाटील यांना मात दिली. पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रवादीचे उत्तम पाटील यांनी निकराची झुंज दिली. पण, त्यांना मतविभागणीचा फटका बसला. चिकोडी-सदलगा मतदार संघाला काँग्रेस आणि हुक्करींशिवाय पर्याय नाही, हे स्पष्ट झाले असून भाजपचे रमेश कत्ती यांना काँग्रेसचे गणेश हुक्केरी यांनी तब्बल ७८ हजार ५०९ मतांच्या फरकाने धूळ चारली. यमकनमर्डी मतदार संघात काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष सतिश जारकीहोळी यांनी भाजपच्या बसवराज हुंद्री यांचा पराभव करीत आपला मतदार संघ राखला. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या अथणीतील लढतीत निवडणुकीपूर्वी काँग्रेसवासी झालेले माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी तब्बल १ लाख २७ हजार ३२४ मते मिळवित भाजपचे महेश कुमठळ्ळी यांचा तब्बल ७६ हजार १२२ मतांनी पराभव केला. कुमठळ्ळी हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसी पण ऑपरेशन कमळमध्ये ते भाजपवासी झाले होते.
कागवाडमधून काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपवासी झालेले श्रीमंत पाटील यांना काँग्रेसचे भरमगौडा पाटील यांनी पराभवाचा धक्का दिला. कुडचीतून भाजपचे पी.राजीव यांचा काँग्रेसचे महेंद्र तमन्नावर यांनी पराभव केला. रायबागमध्ये भाजपचे आमदार दुर्योधन ऐहोळे हे विजयी झाले. गोकाकमधून भाजपचे आघाडीचे नेते आणि ऑपरेशन कमळचे मास्टरमाईंड रमेश जारकीहोळ्ळी यांनी विजयाची परंपरा कायम राखली. अरभावीतून त्यांचेच बंधू भाजपचे आमदार भालचंद्र जारकीहोळ्ळी यांचा विजय झाला. हुक्केरीत भाजपचे निखील कत्ती यांनी काँग्रेसचे ए.बी.पाटील यांचा पराभव करीत विजयाचे खाते खोलले. कित्तूर मतदार संघात भाजपचे महांतेश दोड्डगौडर यांना सपाटून मार खावा लागला असून तेथून काँग्रेसचे बाबासाहेब पाटील विजयी ठरले. सौंदत्ती येथे भाजपची विजयी परंपरा खंडीत करीत काँग्रेसचे विश्वास वैध यांनी विजय मिळविला. रामदुर्गमध्येही काँग्रेसच्या अशोक पट्टण यांनी बाजी मारली असून त्यांनी भाजपचे चिक्करेवण्णा यांचा पराभव केला. बैलहोंगलमधून काँग्रेसचे महांतेश कौजलगी विजयी झाले.
—
पाच आमदारांना नारळ
जिल्ह्यात पाच विद्यमान आमदारांना मतदारांनी नारळ दिला. त्यात भाजपचे महेश कुमठळ्ळी, श्रीमंत पाटील, पी. राजीव, रत्ना मामणी तसेच काँग्रेसच्या डॉ.अंजली निंबाळकर यांचा पराभव झाला. यापैकी महेश कुमठळ्ळी आणि श्रीमंत पाटील यांना ऑपरेशन कमळ भोवले. नऊ आमदारांना पुन्हा मतदारांनी विधानसभेत पाठविले आहे. त्यात काँग्रेसचे गणेश हुक्केरी, सतिश जारकीहोळ्ळी, लक्ष्मी हेब्बाळकर, महांतेश कौजलगी आणि भाजपच्या मंत्री शशिकला जोल्ले, दुर्योधन ऐहोळ्ळे, भालचंद्र जारकीहोळ्ळी, रमेश जारकीहोळ्ळी, अभय पाटील यांचा समावेश आहे.
जारकीहोळ्ळी आणि जारकीहोळ्ळी
मागीलवेळी ऑपरेशन कमळ यशस्वीपणे राबविणारे रमेश जारकीहोळ्ळी यांनी जिल्ह्यातील राजकारणाची संपूर्ण जबाबदारी घेत समिकरण बदलण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यांच्या अडेलतट्टूपणामुळे यावेळी जिल्ह्यात भाजप उघडे पडले. तर त्यांचे बंधू आणि काँग्रेसचे आघाडीचे नेते सतिश जारकीहोळ्ळी यांनी शिताफीने जिल्ह्यातील पक्षाचे राजकारण हाताळत पुन्हा ११ जागांवर सत्ता प्रस्तापित केली आहे.
म.ए.समितीचा प्रश्नांकीत पराभव
मराठी अस्मितेच्या मुद्यावर गेल्या ६६ वर्षांपासून निवडणूक लढवून लोकेच्छा प्रदर्शित करणाऱ्या म.ए.समितीला यावेळीही दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. पाचपैकी तीन मतदार संघात समितीसाठी अनुकूल वातावरण होते. त्यामुळे यावेळी भगवा फडकणारच अशी मराठी भाषिकांची आपेक्षा होती. पण, ती धुळीस मिळाली असून यावेळचा पराभव हा समितीच्या नेत्यांना वेगळा विचार करावयास भाग पाडणारा आहे. कारण, किमान बेळगाव दक्षिण मतदार संघात तरी समितीचा उमदेवार विजयी होणार अशीच सगळ्यांची अटकळ होती.
बेळगाव दक्षिण मतदार संघात भाजपचे पारंपारीक उमेदवार अभय पाटील यांच्याविरोधात समितीकडून हिंदुत्वावादी रमाकांत कोंडुसकर यांनी शड्डू ठोकला होता. तेथील एकंदर परिस्थितीचा अंदाज घेऊन समिती नेत्यांनी त्यांना उमेदवारी बहाल केली होती. प्रचारातदेखील त्यांची आघाडी घेतली होती. पण, त्यांच्या प्रचारात होणाऱ्या गर्दीचे रुपांतर मतांमध्ये झाले नाही. अभय पाटील यांना ७६ हजार २९९ तर कोंडुसकर यांना ६४ हजार ४८७ मते मिळाली. कोंडुसकरांनी पाटील यांना काटे की टक्कर दिली. बेळगाव ग्रामीण मतदार संघात यावेळी समितीच्या मतांमध्ये वाढ झाली तरी काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकरांचा करिष्मा कायम राहिला.त्यांनी १ लाख ६ हजार ५९० मते मिळविली. मराठी भागातूनही त्यांना मते मिळाली, त्याचा फटका समितीचे आर.एम.चौगुले यांना बसला. भाजपचे नागेश मन्नोळकर यांनीही ५१ हजार ३९ मते घेतली.
खानापूर, बेळगाव उत्तर आणि यमकनमर्डी येथील समितीच्या उमेदवारांना चार अंकी आकडा ओलांडता आला नाही. समितीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणाऱ्या खानापूर मतदार संघातील पराभव समितीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभा करणारा ठरला आहे. समितीचे मुरलीधर पाटील यांना केवळ ९ हजार ५९५ मतांवर समाधान मानावे लागले आहे. एकंदर, समितीच्या पराभवाने मराठी भाषिकांच्या मानसिकतेचे दर्शन घडविले असल्याची प्रतिक्रीया व्यक्त होत आहे.
खानापुरात भाजपची मुसंडी
पैसा जिंकणार की अस्मिता असा प्रश्न गेल्या चार दिवसांपासून सोशल मिडियावर विचारला जात होता. त्याचा निकाल आज लागला. भाजपने खानापूर तालुक्यात मुसंडी मारली असून विठ्ठल हलगेकर हे विजयी झाले. प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर, निजदचे नासीर बागवान आणि समितीचे मुरलीधर पाटील यांची त्यांनी पुरती दाणादाण उडविली. तालुक्याबाहेरील उमेदवार नको हा भाजपचा यावेळचा प्रचाराचा ट्रेंड होता, तो यशस्वी झाला. पण, त्याचा सर्वाधिक फटका समितीला बसला. कारण, डॉ. निंबाळकर यांचा पराभव करायचा असेल तर भाजप हाच पर्याय असल्याची मानसिकता कार्यकर्त्यांमध्ये तयार करण्यात भाजप यशस्वी झाले. परिणामी, समितीची पारंपारीक मतेही भाजपकडे वळल्याचा हा परिणाम आहे. शिवाय कांचनम् सिध्दीनेही भाजपच्या विजयाला हातभार लावला.
सिध्दरामय्या मुख्यमंत्री, २० रोजी शपथविधी
बंगळूर: कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री असतील. काँग्रेसने दोन्ही नेत्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ निश्चित केला आहे. या निर्णयाने मुख्यमंत्री निवडीबाबतचा गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला वाद मिटला आहे. नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 20 मे रोजी बेंगळुरू येथे होणार आहे. रात्री झालेल्या पक्षनेत्यांच्या चर्वितचर्वणानंतर हा निर्णय घेण्यात आला […]