समांतर क्रांती वृत्त
खानापूर: भरपूर गाजावाजा करीत गणेबैल येथील टोल नाक्यावर वसुली सुरू झाली असून दुसऱ्याच दिवसापासून वाहन चालकांच्या लुटीची चर्चा आहे. तसेच मासिक पास देण्याविषयीही संभ्रमावस्था निर्माण झाल्यामुळे टोल पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. केवळ एकेरी टोल आकारला जात असून त्याचा फटका वाहन चालकांना बसत असल्याचे समजते. याबाबत तक्रार करणाऱ्यांशी कर्मचारी हमरीतुमरी करीत आहेत.
शेतकऱ्यांना भरपाई आणि इतर मागण्यांसाठी टोल आकारणी बंद पाडण्यात आली होती. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या शेतकरी नेत्यांशी झालेल्या यशस्वी मध्यस्थीनंतर सोमवारपासून गणेबैल टोल नाक्यावर वसुलीस सुरूवात झाली. पण, पहिल्यास दिवसांपासून तक्रारींचा पाऊस पडू लागला आहे. २४ तासात परतीचा प्रवास करणाऱ्या कार चालकाला ४५ रुपये टोल आकारला जाणे आवश्यक असतांना केवळ एकेरी टोल आकारला जात असून यामुळे १५ रुपयांचा भूर्दंड सहन करावा लागत आहे. मिनिबस, ट्रक आणि इतर वाहनांनाही अशाच प्रकारे फटका बसत आहे. विशेषत: खानापूर-बेळगाव प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्सी कॅब चालकांना त्याचा अधिक फटका बसत असल्याची तक्रार आहे.
टोल नाक्याजवळ दुहेरी टोल आकारणीचे फलक लावले गेले आहेत. पण, आमच्याकडे ती सोय नाही. एकेरी टोल भरावा लागेल असे सांगत तेथील कर्मचारी वाहन चालकांशी हुज्जत घालत असल्याचे सांगितले जात आहे. कोणत्याच प्रश्नाचे व्यवस्थित उत्तर दिले जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे. तसेच बराच वेळ वाहने थांबून राहत आहेत. शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर आता या आरेरावीविरोधात आंदोलन करून टोल बंद पाडण्याचा इशारा वाहन चालकांनी दिला आहे.
पासबाबत संभ्रमावस्था
स्थानिक वाहनधारकांना पास देण्यात येणार असल्याचे सांगितले गेले होते. पण, ज्यांची वाहने बेळगाव प्रादेशीक वाहतूक अधिकाऱ्यांकडे नोंद आहेत. त्यांच्याच वाहनांची नोंद होत आहे. खानापूर तालुक्यातील बहुतांश वाहने ही गोवा आणि महाराष्ट्रात नोंद असलेली असल्याने गोची झाली आहे. स्थानिक असल्याची कागदपत्रे हजर केल्यानंतरही त्यांना पास मिळेनासा झाल्यामुळे चांगलीच फजिती झाल्याचे दिसून येत आहे.
..आणि तिला रडू कोसळले
समांतर क्रांती वृत्त बिडी: खानापूर तालुक्यातील अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरस्थितीमुळे संपूर्ण तालुका बेहाल झाला आहे. या स्थितीची पाहणी करण्यासाठी आलेले पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतिश जारकीहोळ्ळी यांनी भुरूणकी गावात घरांची पडझड झालेल्यांची भेट घेतली. त्यांना तात्काळ एक लाख विस हजारांचा धनादेश त्यांनी वितरीत केला. यावेळी हातात धनादेश देताच नुकसानग्रस्त खैरुनिसा अब्दुलगणी हेरेकर […]