इंटनेटच्या मायाजालाने जग अगदी जवळ आणले. इतके जवळ की, हल्ली सर्व कांही ऑनलाईन चालले आहे. गृहोपयोगी साहित्याच्या खरेदीपासून ते चक्क लग्न सोहळेही ऑनलाईन पार पडत असल्याचा हा काळ. एक काळ होता. जगभरातील घटना-घडामोडी जाणून घेण्यासाठी रेडिओवर बातम्या ऐकल्या जायच्या. प्रत्येक गावात हमखास एखादी व्यक्ती सकाळी सूर्याची कोवळी किरणे अंगावर झेलत कानाला रेडिओ लावून बसलेली दिसायची. तिच व्यक्ती नंतर गावभर जगभरातील घटना-घडामोडी ‘शेअर’ करायची. पुढे दृकश्राव्य माध्यम आले दुरदर्शनाच्या माध्यमातून. कुठे, काय, कसे, कधी, का घडले? हे याची देही पाहण्याचा योग दुरदर्शनाने जुळवून आणला. आताश: शेकडो न्यूज चॅनेल भारतातून दिसतात. या सगळ्यात अधिक काळ अधिराज्य गाजविले ते वृत्तपत्रांनी. आजही वृत्तपत्रांचा करिष्मा कायम आहे. पण, सध्याची स्थिती वृत्तपत्रांसाठीही चिंताजनक आहे. कारण सोशल मिडियाचे काहूर माजले आहे.
जग हाताच्या अंगठ्यावर आले आहे. बातम्या ऐकण्यात, बघण्यात आणि वाचण्यात कुणालाच रस राहिलेला नाही, असे नाही. परंतू, माध्यमे बदलली आहेत. रेडिओ, दुरदर्शन आणि वृत्तपत्र-नियतकालिकांची जागा आता फेसबूक, व्हाट्सॲप, इन्स्टा, ट्विटर, युट्यूब अशा समाज माध्यमांनी घेतली आहे. जगण्याचा वेग वाढला आहे. त्यात ही माध्यमे सोयीस्कर ठरत आहेत. माहितीचा स्फोट झाला आहे, असेच यानिमित्ताने म्हणावे लागेल. पण, सर्वसामान्यपणे या माध्यमांतून जे कांही जे अपेक्षीत आहे. त्याचे प्रतिबिंब तरी समाजावर, मानवी जीवनावर पडत आहे का? हा खरा प्रश्न आहे. अर्थातच सगळंच कांही आलबेल नाही, तसे सर्वच कांही गढूळ झाले आहे, असा दावाही छातीठोकपणे करता येणार नाही. समाज माध्यमांचा वापर लोकशिक्षणासाठी झाल्यास त्याच्या व्याप्तीची प्रचिती येईल. जीवन सूकर आणि समृध्द करण्यातदेखील समाज माध्यमे एक वेगळी भूमिका बजावून शकतात. याचा साक्षात्कार होताना दिसतो आहे. या क्षेत्रात साक्षर होण्याची गरज आहे. जो शिक्षित आहे, तो साक्षर असेलच असे अजिबात नाही. आपल्याला मिळालेली माहिती सत्य आहे की, असत्य? चूक आहे की, अचूक? समाजाभीमूख आहे की समाजविघातक? याची सहानिशा न करता ‘व्हायरल’ करणे, ही या क्षेत्रातील निरक्षरताच नाही का?
समाज माध्यमांतील बांडगूळ काढून फलोत्पादीत वृक्ष फोफावण्यासाठी याच माध्यमांचा विवेकबुध्दीने वापर होण्याची आवश्यकता आहे. वृत्तपत्रांचे मालक-संपादक सत्तेच्या वळचणीला जात असतानाच्या आणीबाणीच्या काळात आम्ही ११ जून २०१७ रोजी साप्ताहिक ‘समांतर क्रांती’चा पहिला अंक प्रकाशीत केला. अत्यंत प्रतिकूल स्थितीत आम्हास अनेकांनी त्यावेळी मदतीचा हात दिला. सलग तीन वर्षे अगदी दिमाखात साप्ताहिक चालले. अर्थातच त्यात आमच्या वाचकांचा, जाहिरातदार, विक्रेते आणि हितचिंतकांचा वाटा मोलाचा होता. याच दरम्यान आम्ही ‘समांतर क्रांती’चे वेबपोर्टल सुरू केले. सुमारे साडेतीन लाख वाचकांनी हे पोर्टल समृध्द केले. परंतू, कोरोना महामारीचा सर्व क्षेत्रांना फटका बसला. आम्हीही त्याला अपवाद नव्हतो. गेली तीन वर्षे साप्ताहिक आणि पोर्टलसह युट्यूब चॅनेल आणि इतर समाज माध्यमावरील आमचे अपडेट शिथील झाले होते. आता सर्वकांही पूर्ववत होत असतांना लोकाग्रह वाढत गेला. ‘समांतर क्रांती’ हे केवळ शिर्षक नाही, तर सर्वसामान्यांचा आवाज असल्याचे आम्हाला जाणवले. त्यामुळेच पुन्हा ऑनलाईन साप्ताहिक, वेबपोर्टल आणि युट्यूब चॅनेल सुरू करण्याचा निर्णय घेत आम्ही आपल्या सेवेत दाखल झालो आहोत. सक्रीय झालो आहोत.
आम्ही वाचकांशी बांधील..
बदलता काळ आणि परिस्थितीनुसार आमची भूमिका स्पष्ट करण्याची गरज वाटली. म्हणूनच हा अट्टाहास. सुरूवातीपासूनच ‘बहुजन हिताय’ हा आमचा चेहरा राहिला. तो कायम राहील. जेथे अन्याय तेथे आम्ही या न्यायाने जनसेवेचे व्रत आम्ही अंगिकारले आहे. लोकशिक्षण हा सर्वात महत्वाचा उद्देश आहे. नि:पक्ष, विश्वासार्ह, वास्तव, पारदर्शक आणि निस्पृह माहितीचा खजिना रिता करण्यात कुठेही हयगय केली जाणार नाही. विशेष म्हणजे हे माध्यम कुणाही राजकीय पक्ष वा व्यक्तीच्या वळचणीला बांधले जाणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. आपल्या-तुपल्याचा व्यवहार न करता सर्वसामान्य-पिडीत आणि रांजला-गांजला ‘माणूस’ हा केंद्रबिंदू असेल, याबाबत शंका नसावी. पित्त-पत्रकारितेऐवजी विकास प्रत्रकारिता करीत सत्याशी भिडण्याचा आमचा प्रयत्न आहे.
हे सगळं करीत असतांना साप्ताहिक, वेबपोर्टल आणि युट्यूबच्या माध्यमातून निरनिराळी सदरे आपल्या भेटीला येतीलच. त्यांचे पूर्वीप्रमाणेच स्वागत होईल, यात वाद नाही. एकंदर, ‘समांतर क्रांती’ हे वाचकांचे व्यासपीठ असेल. तसेच नवलेखकांनाही प्रोत्साहन दिले जाईल. मराठी भाषा-संस्कृती आणि पर्यावरण संरक्षण-संवर्धनात ‘समांतर क्रांती’ नेहमीच अग्रेसर राहील, याबाबत कुणीही शंका बाळगू नये. धन्यवाद!
म.ए.समिती: 'झालाच पाहिजे' की, 'झालीच पाहिजे!'
कारण-राजकारण चेतन लक्केबैलकर ‘बेळगाव, कारवार, निपाणी, खानापूर, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र’ हे शब्द कानावर पडताच दुसऱ्याक्षणी ‘झालाच पाहिजे’चा प्रतिसाद लाभला नाही तरच नवल! गेल्या ६५ वर्षांपासून या घोषणेने भाषा आणि संस्कृतीसाठीचा प्रदीर्घ लढा जिवंत ठेवला आहे. आता संयुक्त महाराष्ट्र ‘झालाच पाहिजे’ऐवजी एकी ‘झाली पाहिजे’ अशी दुर्दैवी हाक मराठी भाषकांना त्यांच्या नेत्यांना द्यावी लागत आहे. […]