वृत्तविश्लेषण / चेतन लक्केबैलकर
गेल्या आठवडाभरापासून भाजपच्या स्थानिक नेत्यांनी ज्या कांही मर्कटलिला चालविल्या आहेत, त्याला काय म्हणावे? असा प्रश्न सुज्ञ नागरीकांस पडला आहे. भाजप आमदार सी.टी.रवी यांच्या ‘त्या’ अश्लिल वक्तव्यानंतर सुरू झालेल्या रणकंदनात राज्यातील भाजपची एक तर खानापूरच्या भाजप नेत्यांची दुसरीच भूमिकाआहे. ती उमगण्याच्या पलिकडची असून यामुळे भाजपच्या नेत्यांनी स्वत:चेच हसू करून घेतले. त्याची जाणीव येथील काँग्रेस नेत्यांनी अगदी शेलक्या शब्दात करून दिल्याने रान पेटण्याची शक्यता आहे.
विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी ‘निवेदनवीर’ बनलेल्या भाजपच्या नेत्यांकडे सध्या कोणताच कार्यक्रम नाही. हम साथ-साथ असल्याचा फुकाचा कांगावा करण्यासाठी भाजपचे नेते- कार्यकर्ते ‘त्यांच्या’ नेत्यांच्या जयंत्या-मयंत्यासह स्थानिक नेते-कार्यकर्त्यांच्या वाढदिवसानिमित्त तरी एकत्र यायचे. पण, हल्ली कुणाचेच वाढदिवस साजरे होत नसल्याने “का रे दुरावा” असा प्रश्न एकमेकांना विचारण्यापलिकडे कांहीच होत नाही. परिणामी, नेत्यांमध्ये समन्वय राहिला नाही. विधानसभा निवडणूक तीन वर्षांनंतर होणार तो पर्यंत भाजपच्या नेत्यांना तसे झेपेल असे कोणतेच काम शिल्लक नाही. तशा तालुक्यात अनेक समस्या आहेत, पण आपलेच दात अन् आपलेच ओठ अशी बिचाऱ्यांची आवस्था आहे.
भाजपची ही अशी दारूण स्थिती असतांना अलिकडेच हिवाळी अधिवेशन संपता-संपता भाजपचे आमदार सी.टी.रवी यांनी खानापूरच्या नेत्यांना विरोधकांना धारेवर धरण्याचा एक कार्यक्रम दिला. तोदेखील त्यांना व्यवस्थित हाताळता आला नाही. एकीकडे भाजपचे राज्यस्तरीय नेते पोलिसांच्या नावाने शंख करीत आहेत. तर दुसरीकडे खानापूरचे नेते पोलिसांची तळी उचलत आहेत. यात हस्यास्पद बाब म्हणजे या नेत्यांनी चक्क आमदार सी.टी.रवी यांनाच खोटारडे पाडण्याचा चंग बांधला आहे. आमदार रवी यांचे दावे साफ खोटे असल्याचेच जणू येथील नेते गेल्या चार दिवसांपासून आतांड-तांडव करून सांगताहेत. त्यांना कांही दलित संघटनांचीही फूस लाभली आहे.
आमदार सी.टी. रवी यांना १९ डिसेंबर रोजी हिरेबागेवाडी पोलिसांनी अटक केली. त्यावेळी त्यांना अक्षरश: उचलून पोलिस वाहनात घालावे लागले होते. तेथून रात्री खानापूरला आणले. त्यावेळी राज्य आणि जिल्हा भाजपच्या नेत्यांसह स्थानिकांनी सुध्दा प्रचंड गोंधळ माजविला. पोलिसांवर धावून जाण्यापर्यंत भाजपेयी नेत्यांची मजल गेली होती. हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर संशयीत आरोपी असलेले आमदार रवी यांना पुन्हा खानापूरहून हलविण्यात आले. त्यानंतर खानापुरातून हा विषय संपल्यात जमा असतांनाच २१ डिसेंबर रोजी येथील पोलिस निरीक्षक नायक यांचे निलंबन करण्यात आले. ही कांही भाजपच्या नेत्यांनी मनाला लावून घेण्यासारखी बाब नव्हती. हा प्रशासकीय निर्णय होता.
निरीक्षक नायकांच्या निलंबनानंतर भाजपच्या नेत्यांनी त्यावर हरकत घेतली. हा खानापूरकरांसाठी खरंतर धक्काच होता. कारण एकीकडे आमदार सी.टी.रवी हे खानापूर पोलिसांनी त्यांना बेदम मारहाण केल्याचे कोकलून सांगताहेत. तर दुसरीकडे भाजपचे स्थानिक नेते पोलिसांची बाजू घेताहेत. हे सगळंच अनाकलनीय आहे. एकवेळ भाजप नेत्यांच्या धंद्याना आश्रय देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याची बदली, निरीक्षकाचे निलंबन झोंबले असणार यात वाद नाही. पण म्हणून निलंबन मागे घ्यावे, असे निवेदन सादर करून भाजपेयी नेत्यांनी त्यांची वैचारिक कुवतच जगजाहीर करावी हे कांही पटण्यासारखे नाही.
२५ डिसेंबर रोजी २.४५ वाजता आमदार टी.टी.रवी यांनी चिक्कमंगळूरच्या मलगौडा जिल्हा रुग्णालयात उपचार घेतले. तेथे त्यांनी खानापूर पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचे सांगितले. प्रसार माध्यमांना देखील त्यांनी तसेच सांगितले. खानापूरचे नेते मात्र खानापूर पोलिसांची आरती ओवाळत आहेत. त्यामुळे खोटारडे कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जर आमदार रवी खोटे बोलत असतील, तर त्यांनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल आपण कांहीच बोललो नाही, असा केलेला दावा खोटा आहे. ते आरोपी आहेत, असा अट्टाहास भाजपच्या नेत्यांनी का चालविला आहे? हेच अकलनाच्या पलिकडचे आहे.
पोलिस निरीक्षक नायक यांनी नाही तर बेळगावच्या पोलिसांची मारहाण केली असा आरोप भाजपचे नेते करू शकतात. पण, मुळातच स्वत:च्या अज्ञानाचे प्रदर्शन करण्याची घाई असलेल्या भाजपच्या नेत्यांना पोलिस खात्याच्या कायद्यांची माहिती असेल याबाबत शंकाच आहे. मुळात ज्या पोलिस स्थानकात एखादी घटना घडते, त्या स्थानकाची संपूर्ण जबाबदारी ही तेथील एसएचओ म्हणजे स्टेशन हाऊस ऑफीसरची असते. तेथे आयएएस अधिकारी उपस्थित असतील तरी ते केवळ सूचना वा आदेश देऊ शकतात. प्रत्यक्ष कारवाई ही तेथील एसएचओ करू शकतो. तशीच त्याची जबाबदारीही असते. त्यामुळेच नायक यांना तेथील गोंधळाला जबाबदार धरण्यात आले आणि निलंबन करण्यात आले.
आता काँग्रेसनेदेखील या वादात उडी घेतली आहे. काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष ॲड. ईश्वर घाडी यांनी भाजप नेत्यांची चांगलीच झडती घेतली आहे. भाजपचे नेते तालुक्यातील समस्यांबाबत कधी निवेदन देणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. भाजपला केवळ राजकारण करायचे आहे, त्यांना तालुक्यातील समस्यांशी कांहीच देणे घेणे नाही, हेच यावरून स्पष्ट होते, अशी टिप्पणीही त्यांनी केली आहे. आता काँग्रेसचे आव्हान स्विकारून भाजपचे नेते शहाणपणा दाखविणार की अजून हसं करून घेण्यात धन्यता माणणार? याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. बाकी भाजपच्या मर्कटलिलांनी मात्र तालुक्याचे चांगलेच मनोरंजन चालविले आहे.
पीएलडी बँक निवडणूक: गर्लगुंजीतून एकतर्फी; कक्केरीत काटें की टक्कर
समांतर क्रांती / खानापूर येथील भूविकास बँकेच्या आज शनिवारी (ता.२८) झालेल्या निवडणुकीत गर्लगुंजीतून विद्यमान संचालक विरुपाक्षी पाटील (बरगाव) यांचा एकतर्फी विजय झाला. तर कक्केरी मतदार संघात प्रकाश आंग्रोळी आणि निळकंठ गुंजीकर यांच्यात काँटे की टक्कर झाली. दोघांनाही समसमान १२ मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठी काढण्यात आली, त्यात निळकंठ गुंजीकर यांना संचालकपदाची लॉटरी लागली. बँकेच्या १५ पैकी […]