उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांचा आरोप; कुमठा येथे डॉ. अंजली निंबाळकर यांची प्रचारसभा
कुमठा: अघोषीत हुकुमशाहीला घाबरू नका असे आवाहन देशातील लोकांना करीत राहुल गांधी यांनी देशभर भारत जोडो यात्रा केली. आम्हीही कर्नाटकात प्रजाध्वनी (जनतेचा आवाज) यात्रा सुरू केली आहे. आम्ही कुणाला फसविले नाही, विधानसभा निवडणुकीत जी आश्वासने दिली ती आवघ्या महिनाभरात पूर्ण केली. कोणतीही योजना जाती-धर्मावर आधारीत नाही. भाजप आणि मोदी जाती-धर्मावर राजकारण करून देशातील शांतता भंग करीत आहे. या पक्षाचे नेते कधीच दिलेला शब्द पाळत नाहीत, असा आरोप उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांनी शुक्रवारी (ता.३) कुमठा येथील सभेत केला.
पुढे बोलतांना ते म्हणाले, राज्यातील काँग्रेसला केंद्र सरकारकडून सापत्न्याची वागणूक दिली जात असतांनाही आम्ही तुमच्या समस्या सोडविण्यासाठी धडपडत आहोत. मार्गारेट अल्वा यांच्यानंतर उत्तर कन्नड मतदार संघातून पुन्हा एकदा महिला उमेदवार दिला आहे. आम्ही कुणाची उणीधुणी काढढण्यासाठी आलेलो नाही. आम्ही जे काम केले त्याची माहिती पोहचवायला आणि तुमच्या समस्या जाणून घ्यायला आलो आहोत.
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणारच!
जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य आणि उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी कुमठ्यात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा संकल्प केला आहे. जाहीरनाम्यातदेखील त्याचा उल्लेख केला आहे. राज्य सरकारचा या संकल्पाला पूर्ण पाठिंबा असून कोणत्याही स्थितीत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभे राहणारच. कारवार जिल्ह्यातील तमाम जनतेने यावेळी काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांना आशिर्वाद देऊन संसदेत पाठवावे, आम्ही तुमच्या समस्या सोडवू, अशी ग्वाही ना. डी.के.शिवकुमार यांनी दिली.
बलात्काऱ्यांना तिकीट देणारे महिलांचे संरक्षण कसे करणार?
प्रसंगी बोलतांना मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी, प्रज्वल रेवन्ना हे महिलांचे संरक्षण करू असे म्हणणाऱ्या मोदींच्या युतीचे उमेदवार आहेत. त्याच्या अत्याचाराची माहिती असतानाही बलात्कार करणाऱ्या प्रज्वल रेवण्णाला तुम्ही तिकीट दिले नाही का? अशा प्रकारे महिलांचे संरक्षण होते का? नरेंद्र मोदी बलात्कार करणाऱ्यांना तिकीट देऊन मुलींना काय संदेश दिला, असा सवाल राज्यातील जनता करत आहे, असे प्रतिपादन केले.
यावेळी लोक आमच्या पक्षाच्या उमेदवाराला आशीर्वाद देतील, असा मला विश्वास आहे. या मतदारसंघातून तुम्ही भाजपला विजयी केले आहे. मार्गारेट अल्वा एकेकाळी खासदार होत्या. या वेळी तुम्हाला पुन्हा बदल करण्याची चांगली संधी आहे. या संधीचा सर्वोत्तम वापर करा आणि बदलाचे कारण व्हा. मोदी फक्त खोटे बोलतील. त्यांनी कोणतेही आश्वासन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला नाही. देशाचे प्रश्न सोडवता येत नसताना पंतप्रधानांच्या खुर्चीत बसण्याची त्यांची पात्रता नाही, असा जोरदार टोला मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी लगावला.
यावेळी बोलतांना माजी खासदार मार्गारेट अल्वा म्हणाल्या, या मतदार संघाने मला एकदा खासदार म्हणून येथील समस्या संसदेत मांडण्याची संधी दिली. आता पुन्हा या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची वेळ आली असून डॉ. अंजली निंबाळकर यांना संसदेत पाठवून या भागाचा विकास करून घ्या.
यावेळी व्यासपिठावर प्रशासकीय आयोगाचे अध्यक्ष आर.व्ही.देशपांडे, जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य, आमदार सतिश सैल, जिल्हाध्यक्ष साई गावकर यांच्यासह काँग्रेस नेते उपस्थित होते. कारवार जिल्ह्यातून अफाट जनसमुदायाने सभेला हजेरी लावत डॉ. निंबाळकर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. घोषणांनी सभास्थळ दणाणून गेले होते.
हलकर्णी येथील प्रसिद्ध सरकारी ठेकेदार ईश्वर खानापुरी यांचे निधन
खानापूर : हलकर्णी ता. खानापूर येथील नामांकित सरकारी कंत्राटदार ईश्वर अंबाजी खानापुरी (83) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. आज शनिवारी सकाळी 12 वा. हलकर्णी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यविधी होणार आहे. राज्य औद्योगिक बॅंकेचे माजी उपाध्यक्ष दिवंगत कृष्णा खानापुरी यांचे ते मोठे […]