समांतर क्रांती / खानापूर
दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सीमाप्रश्न विनाविलंब सोडविण्याची मागणी करणारा ठराव समंत करावा.अशी मागणी नियोजित संमेलनध्यक्षा तारा भवाळकर यांच्याकडे करण्याचा निर्णय गुरुवारी येथील शिवस्मारक सभागृहात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. लवकरच भवाळकर यांची सांगलीत भेट घेतली जाणार असल्याचे यावेळी अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी सांगितले.
हुतात्मा दिनी १७ जानेवारी खानापुरातील हुतात्मा स्मारकात सीमालढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करुन दुपारी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित धरणे आंदोलनात बहुसंख्येने सहभागी होण्याचा निर्धार खानापूर तालुका म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आला. अध्यक्ष गोपाळ देसाई यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. ९) शिवस्मारकात ही बैठक झाली.
सीमाप्रश्नाकडे महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १७ जानेवारी रोजी कोल्हापूरमध्ये सकल मराठा समाज संघटनेतर्फे हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक महिन्यात महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात आंदोलन करुन १ मे रोजी महाराष्ट्र दिनी मुंबईत धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. मध्यवर्ती म. ए. समितीच्या या भूमिकेला पाठिंबा दर्शविण्यात आला. नव्या सरकारने त्वरित सीमा समन्वयक मंत्र्यांची नियुक्ती करावी. सर्वोच्च न्यायालयातीलखटल्याला गती द्यावी. महाराष्ट्रातील नेते सीमाभाग केंद्रशासित करावा अशी सर्वोच्च न्यायालयातील खटल्याशी विसंगत भूमिका घेत आहेत. त्यामुळे, सीमालढ्याला व दाव्याला बाधा पोचू शकते. याबाबत महाराष्ट्र सरकार व विरोधी पक्षातील नेत्यांची भेट घेऊन मध्यवर्ती समितीच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्याचे ठरविण्यात आले.
बैठकीला माजी आमदार दिगंबर पाटील, प्रकाश चव्हाण, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, मारुती परमेकर, संजीव पाटील, अजित पाटील, देवाप्पा भोसले, अनंत पाटील, अॅड. अरुण सरदेसाई, नागेश भोसले, जगन्नाथ बिर्जे, अभिजीत सरदेसाई, राजाराम देसाई, शंकर गावडा, रुक्माण्णा झुंजवाडकर, रमेश धबाले उपस्थित होते. सचिव आबासाहेब दळवी यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले.
मुरलीधर पाटील यांचा सत्कार
खानापूर भूविकास बँकेवर सलग तिसऱ्यांदा चेअरमनपदी निवड झालेले समिती कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, व्हा.चेअरमन लक्ष्मण कसर्लेकर व बँकेच्या सर्व संचालकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.