समांतर क्रांती/विशेष रिपोर्ट
सह्याद्रीच्या खुशीत घनदाट झाडीत लपलेले चिगुळे. सुर्यास्ताचे विलोभनीय दर्शन घडविणारे खानापूर तालुक्यातील लक्षवेधी ठिकाण. महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या हद्दीवर वसलेल्या या गावातील माऊली देवीमुळे तिन्ही राज्यांचे ॠणाणुबंध जुळले आहेत. दरवर्षी हजारो पर्यटक, भाविक गावाला भेट देतात. तेथील निसर्गसौदर्य इतके विलोभनीय आहे की, प्रत्येकजण तेथील आठवणी सोबत घेऊनच जातो.चिगुळेचे तोंड भरून कौतुक न करणारा पर्यटक विरळाच. अलिकडे मात्र या गावाला कुणाची नजर लागली आहे. गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं अशी या गावाची गत झाली आहे. सहिष्णू लोकांच्या गावात आता एकमेकांची डोकी फोडण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. हे का होतंय?
कणकुंबीपासून आवघ्या पाच कि.मी. अंतरावर असलेले चिगुळे हे गाव केवळ पर्यटन स्थळ म्हणून परिचीत होते. अलिकडच्या कांही वर्षात मात्र दरवर्षी होणाऱ्या हाणामारीच्या घटनेमुळे गावाची वेगळीच ओळख निर्माण होऊ पाहत आहे. जमिनीच्या वादातून गावात दोन गट पडले आहेत. त्यातून गावडे आणि चौगुले या दोन कुटुंबातील वाद धुमसत आहे. देव-देवस्कीचा मानपान आणि राजकीय वर्चस्ववादाची किनार या मालमत्तेच्या वादाला आहे. साहजिकच सण-उत्सवाच्या काळात त्याचा भडका उडाल्याशिवाय राहत नाही. त्याचे पर्यावसान हाणामारीत होते. बुधवारी (ता.०७) मात्र हा वाद विकोपाला गेला. दोन गटात झालेल्या हाणामारीत २५ जण जखमी झाले. त्यातील कांहीजण गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर बेळगाव येथील विविध इस्पितळात उपचार सुरू आहेत.
कोकणाच्या सहिष्णू संस्कृतीची किनार लाभलेल्या कणकुंबी भागातील चिगुळे हे गावही तसे संहिष्णूच. देवभक्तीतीत रमलेले. नाही म्हणायला उच्च-निच्चतेची जळमटे परंपरागत चिकटून राहिल्यामुळे मंदिर प्रवेश आणि देवकार्यात दलितांच्या सहभागाला अटकाव हा होताच. त्यातून कित्येक वर्षे वाद सुरू असतांनाच आता जमिनीचा वाद उफाळला आहे. अनंत गावडे आणि वासुदेव चौगुले यांनी शिवाजी चौगुले यांना भात पिकात गुरे घातल्याबद्दल जाब विचारून शिवीगाळ केल्याचे निमित्त झाले. शिवाजी चौगुले यांच्या घरावर २५ जणांच्या टोळक्याने मंगळवारी हल्ला चढविला. त्याबद्दल संबंधीतांविरोधात पोलिसात तक्रार करण्यासंबंधी चर्चा करण्यासाठी शिवाजी आणि रामनाथ चौगुलेंच्या गटाची बैठक बुधवारी त्यांच्या घरी सुरू असतांनाच गावडेंच्या गटातील लोकांनी पुन्हा हल्ला केला. यावेळी झालेल्या हाणामारीत दोन्ही गटातील २५ जण जखमी झाले. जखमीमध्ये महिला आणि तरूणींचाही समावेश आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून चिगुळेत सार्वजनिक जमिनीचा वाद सुरू आहे. जमिन सार्वजनिक असल्याने त्याचे सर्वांना समसमान वाटप झाले पाहिजे किंवा सदर जमिन कसण्याचा समसमान अधिकार गावातील सर्वांना असायला हवा. पण, केवळ कांहीच लोक देवाचे पुजारी, सेवेकरी म्हणून कसत असल्याची उदाहरणे तालुक्यातील प्रत्येक गावात पहावयास मिळतात. तसाच हा चिगुळेचा वाद आहे. एकंदर काय दैव देते आणि कर्म नेते असा हा प्रकार असून माऊली देवी आणि निर्मिकांने केलेल्या निसर्गाच्या अविष्कारामुळे तिन्ही राज्यात डंका असणाऱ्या चिगुळेच्या लौकिकाला जमिनीच्या वादाने गालबोट लागले आहे.
2 thoughts on “चिगुळे: गाव तसं चांगलं, पण..?”