सदाहरीत जंगल झाडीतून गोवा राज्यात जाणारा चोर्ला महामार्गावरील निसर्ग सौंदर्य नेहमीच पर्यटकांच्या मनाला भूरळ घालत आले आहे. पावसाळ्यात पर्यटकांची मांदियाळी जमविणाऱ्या चोर्ला घाटातील विलोभनीय निसर्ग सौंदर्य पावसाळ्यानंतरही कांहीकाळ पर्यटकांना घाटात थबकायला भाग पाडते. गोव्याकडे जाणारा किंवा गोव्याहून धुंद होऊन परतणारा प्रत्येकजण घाटातील सौदर्याचा मनमुराद आनंद आणि अस्वाद घेताना दिसतो. नागमोडी वळणे, दाट जंगलझाडी त्यातून धबाबा कोसळणारे धबधबे आणि सह्याद्रीच्या हिरवीगार शाल पांघरलेल्या रांगा. घाट माथ्यावरून खाली खोल दरीत कोंबड्यांच्या खुराड्यासारखी दिसणारी घरे आणि गोव्याच्या हद्दीतील केरीचा डॅम हे निसर्गदत्त सौदर्य पर्यटकांना मंत्रमुग्ध करून सोडते. चोर्ला घाटाचा हा परीसर म्हणजे केवळ वर्षा पर्यटनाचाच नाही तर सर्वकालीन पर्यटनाचा दिलखुलास नजराणा आहे,याची प्रचिती तेथे गेल्यानंतरच येते.
कणकूंबीपासून पुढे गोवा राज्यातील केरी गावार्पंत चोर्ला घाटातून प्रवास करणे ही खरं तर पर्वणीच आहे. कोणत्याही ऋतुत या भागातील वातावरण मनाला उभारी देणारे असते. ऑक्टोबर हिटमध्येही तेथील वातावरणात पसरलेला गारवा प्रवाशांना स्वप्नवत दुनयेची सफर घडवित असतो. पश्चिम घाटातील दाट जंगलातून चोर्ला महामार्ग जातो. महामार्गाच्या दुतर्फा असलेली झाडे आणि नदी-नाल्यांची पात्रे यामुळे हा रस्ता केवळ प्रवासासाठी नाही तर पर्यटनाचाही महामार्ग असल्याचा भास होत राहतो. चोर्ला गावाचा फाटा ओलांडून पुढे गेल्यानंतर बऱ्याच ठिकाणी कोसळणारे धबधबे दृष्टीस पडतात. पावसाळ्यात अतिवेगाने प्रवाहित होणारे हे धबधबे हिवाळ्यात थंडावतात. पावसाळयात चोर्ला घाट पर्यटकांच्या गर्दीने फुलून निघतो.
नागमोडी वळणे घेत पुढे जाल,तसा निसर्गाच आविष्काराचा चमत्कार अनुभवास मिळतो. चोर्ला घाट ज्या ठिकाणी संपतो.त्या ठिकाणी उजवीकडे सह्याद्रीच्या पर्वतरांगा नजरेत भरून उरतात. डोंगरांची साखळी, एकमेकांत हरवून गेलेले डोंगर पाहतांना ते जणू एकमेकांच्या प्रेमात पडून हातात हात घेऊन प्रेमालाप करीत असल्याचा भास होतो. सूर्याच्या कोवळ्या किरणात जेव्हा हा परीसर उजळुन निघतो, तेव्हा स्वर्ग म्हणतात तो हाच तर नाही ना? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. मधे एके ठिकाणी कोसळणारे धबधबे पहावयास मिळतात. रस्त्यापासून किमान पाच-सहा कि.मी. अंतरावर असावेत. लाकडीचा धबधबा असे त्याचे नाव. हे नाव का पडले? याची माहिती कुणालाच नाही. पावसाळ्यात धबधब्यांपर्यंत पोहचता येत नाही. पण पावसाळ्यानंतरच्या काळात जंगलातील रस्ते मोकळे झाले की तेथे जाता येते. पण मार्ग अत्यंत जिकरीचा आणि तितकाच अवघडही. तरीही कांही बहाद्दर पर्यटक तेथवर पोहचतात. पर्यटनाचा आणि ट्रेकिंगचा आस्वाद घेतात.धबधबे आणि पर्वतरांगांचे सौंदर्य डोळ्यातून गळून पडेल, अशी भिती वाटावी असा हा परीसर.
कर्नाटकाची हद्द संपुन गोव्यात प्रवेश केल्याची चाहुल लागते ती केरीच्या डॅममुळे.आईच खुशीत निवांत पहुडलेल्या ताण्हुल्यासारखा भासणारा पर्वत रांगात पसरलेला हा सरोवर पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडतो. सकाळच्या तिरप्या किरणांत तो उजळुन निघतो, तेव्हा एखाद्या चित्रकारांने रेखाटलेल्या सुंदर-सुरेख चित्रकृतीसारखा भासतो. सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळचे सौंदर्य काय वर्णावे? आकाशातील सूर्यास्तापूर्वीच्या रंगछटांचे प्रतिबिंब जेव्हा सरोवरात पडते तेव्हा जणू नभीचा भास्कर जमिनीवर अवतरल्याचा भास होतो.चोर्ला घाटातल्या सौदर्याचा अस्वाद न घेणारा एकही प्रवासी भेटणार नाही. अगदी मालवाहू ट्रकचे अरसीक वाटणारे चालकही या निसर्गसौंदर्याचे वेडे आहेत.
एरवी, एखाद्या रस्त्यावरचा घाट म्हटलं की, प्रवाशांच्या मनात एक भिती असते. चालकांच्या मनावर दडपण असते. पण चोर्ल्याचा हा घाट प्रवाशांना पर्यटक बनवून सोडतोच; शिवाय आपल्या प्रमातही पाडतो. अलिकडे या मार्गावरील प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. शासनाने रस्त्याच्या बाबतीत दाखविलेली हितासक्ती प्रवास सूकर करणारी ठरली आहे. चोर्ला घाटाचा हा परीसर पश्चिम घाटात येतो. आरक्षीत जंगलं. कचरा करणाऱ्यावर कडक निर्बंध असले तरी पर्यटकांकडून त्याचे पालन होतेच असे नाही. कर्नाटक आणि गोवा सरकारनेही ठिकठिकाणी सावधानता आणि स्वच्छतेची सुचना करणारे फलक लावले आहेत. त्याची कदर पर्यटकांनी करायला हवी. पावसाळा सुरू झाला आहे. नाही, नाही म्हणता चोर्ला घाटातील धबधबे फेसाळू लागले आहेत, तर मग वाट कशाची बघताय.. चर्ला वर्षा पर्यटनाला..!
One thought on “चोर्ला घाट: वर्षा पर्यटनाची पर्वणी”