समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर
गुरूवारी (ता.२६) बेळगावात काँग्रेसचे ३९ वे अधिवेशन भरल्याच्या घटनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. महात्मा गांधीजींच्या भेटीला उजाळा देण्यासाठी बेळगावात ‘गांधी भारत’ कार्यक्रमाचे आयोजन बेळगावात करण्यात आले आहे. शंभर वर्षांपूर्वी महात्मा गांधींजींच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या तत्कालीन अधिवेशनाचा घेतलेला हा आढावा…

१८८५ साली भारतात इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली. ॲलन ह्यूम यांनी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर त्याच वर्षी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले. सुरूवातीला ब्रिटीशांच्या दरबारात जनतेच्या मागण्या मांडण्याचा निर्णय या अधिवेशनात घेण्यात आला. पण, नंतरच्या काळात काँग्रेसकडून जनतेच्या आपेक्षा वाढत गेल्या.
अधिवेशन बेळगावात..

१९२३ मध्ये आंध्रप्रदेशातील काकिनाडा येथे काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. त्या अधिवेशनाला तेव्हाचे बेळगावातील जेष्ठ काँग्रेसनेते देशभक्त गंगाधरराव देशपांडे हजर होते. तेथेच त्यांनी पुढील अधिवेशन बेळगावात भरविण्याची विनंती तेव्हाच्या काँग्रेस वर्कींग कमिटीला केली. कमिटीने ती मागणी मान्य केली. अधिवेशनाच्या वर्षभर आधीच बेळगावकरांनी तयारीला सुरूवात केली होती. अधिवेशन झाले आणि राष्ट्रीय चळवळीला बेळगावाच्या लढवय्या मातीतून धार आली. ते अधिवेशन स्वातंत्र्य चळवळीची दिशा देणारे ठरले.
तात्पुरते रेल्वेस्टेशन..

१९२४ मध्ये २६ ते २९ डिसेंबर असे चार दिवस अधिवेशन भरले होते. टिळकवाडीतील साई मंदिर परिसरातील व्हॅक्सीन डेपो मैदानावर अधिवेशन झाले. देशातील प्रतिनिधींच्या राहण्या-जेवणाची सोय तेथेच उभारण्यात आलेल्या तंबूमध्ये करण्यात आली होती. विशेष म्हणजे तत्कालीन ‘मद्रास सदर्न मराठा’ रेल्वेने टिळकवाडीतील आताच्या दुसऱ्या रेल्वे गेटजवळ तात्पुरते रेल्वे स्टेशन उभारले होते.
१७ वर्षांच्या भगतसिंगांची हजेरी..

काँग्रेसच्या अधिवेशनाला सरहद्द गांधी खान अब्दूल गफार खान, पंडित जवाहरलाल नेहरू, मोतीलाल नेहरू, मौलाना आझाद यांच्यासह त्यावेळचे अनेक राष्ट्रीय नेते अधिवेशनासाठी रेल्वेने बेळगावात आले होते. विशेष म्हणजे १७ वर्षांचे भगतसिंग त्यांच्या वडीलांसह या अधिवेशनाला आले होते.
विजयनगर साम्राज्य आणि काँग्रेस विहीर ..

शंभर वर्षानंतर आता बेळगावात महात्मा भारत कार्यक्रमासाठी भव्य सजावट करण्यात आली आहे. त्याहून भव्य अशी सजावट शंभर वर्षांपूर्वी करण्यात आली होती. विजयनगर साम्राज्याची आठवण यावी, अशी ममडपाची सजावट होती. उपस्थित प्रतिनिधींसाठी चार दिवस महाराष्ट्रीय आणि कर्नाटकी पध्दतीच्या जेवनाची सोय करण्यात आली होती. पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी आताच्या लेले मैदानजवळ विहीर खोदण्यात आली. तिचे नामकरण आधी पंपा सरोवर असे करण्यात आले होते. पण, नंतर काँग्रेस विहीर म्हणून ओळखली जाऊ लागली. तेथे आता चित्रसंग्रहालय उभारून या संपूर्ण परिसराला ‘वीरसौध’ असे नाव देण्यात आले आहे.
लक्षवेधी राहुटी आणि गोडसे..
महात्मा गांधीजींनी काँग्रेसचे अध्यक्षस्थान भुषविलेले बेळगावातील १९२४ सालचे अधिवेशन हे एकमेवच. महात्मा गांधीजींसाठी अधिवेशन स्थळावर एक सुंदर अशी स्वतंत्र राहुटी उभारण्यात आली होती. त्या राहुटीचे कौतूक गांधीजींनी केले होते. सदर राहुटी तेव्हाचे प्रसिध्द बांधकाम कंत्राटदार खेमाजीराव गोडसे यांनी बनविली होती.
जिनांकडून स्विकारली सुत्रे..
काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सुत्रे गांधींजींकडे सोपविण्यासाठी मोहमद आली जिना उपस्थित होते. त्यांनी रितसर गांधींजीकडे सुत्रे सुपूर्द केली. या घटनेची आठवण म्हणून पहिल्या रेल्वे गेटजवळील एका रस्त्याला मोहमद अली जिनांचे नाव देण्यात आले होते.
सामाजिक प्रश्नांना टिकळांचा विरोध..

काँग्रेसच्या विषय पत्रिकेवर सामाजिक प्रश्न असावेत, असे काँग्रेसच्या अनेक नेत्यांना वाटायचे. तसा आग्रह नेहमीच होत असे. पण, बाळ गंगाधर टिळक आणि त्यांच्या अनुयायानी त्याला विरोध केला. पण, बेळगावच्या अधिवेशनात गांधीजींनी सामाजिक मुद्दे विषय पत्रिकेवर घेतले. त्यावर चर्चा केली. म्हणूनच शंभर वर्षांपूर्वी बेळगावात झालेले अधिवेशन राष्ट्रीय चळवळीला वेगळी दिशा देणारे ठरले. अश्पृशता निवारण, केरळमधील वायकोम आंदोलनाला पाठींबा, महिलांचा स्वातंत्र्य चळवळीत सहभाग, स्वतंत्र भारतात लोकशाही, प्रत्येक प्रौढ स्त्रि-पुरूषाला मतदानाचा हक्क, शिक्षण, दारूबंदी, खासगी सावकारीला विरोध असे कार्यक्रम गांधीजींनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून दिले.
हिंदू-मुस्लिम ऐक्य..
बेळगावच्या अधिवेशनात विशेष गाजला तो हिंदू – मुस्लिम ऐक्याचा मुद्दा. हे दोन्ही समाज एकत्र येऊन ब्रिटीशांविरोधात लढले पाहिजे, असे आवाहन गांधीजींनी त्यावेळी केले होते. इतरही समाजांना स्वातंत्र्य चळवळीत सामावून घेण्याची सूचना त्यांनी काँग्रेसजणांना केली. १९२४ च्या या अधिवेशनानंतर राष्ट्रीय चळवळीला धार आली. त्यामुळे अभिजन बिथरले. आणि १९२५ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना होऊन गांधीविरोधाला सुरूवात झाली. संघ आणि हिंदू महासभेने वेळोवेळी गांधीजींच्या धोरणाला विरोध केला.
भाषावर प्रांतरचनेचा उद्घोष..
भारत स्वतंत्र झाल्यानंतर भाषावार प्रांतरचना होईल, असे आश्वासन गांधीजींनी देशाला बेळगावात दिले. त्याकाळी प्रशासकीय व्यवहाराची भाषा इंग्रजी होती. त्याऐवजी प्रशासकीय व्यवहार लोकभाषेतून व्हावा, असे मत त्यांनी मांडले होते. पण, दुर्दैवाने ज्या ठिकाणी ही भूमिका गांधीजींनी मांडली. त्याच बेळगावला स्वातंत्र्यांच्या ८० वर्षानंतरही न्याय मिळालेला नाही.
पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईकांचे निलंबन रद्द करा
समांतर क्रांती / खानापूर पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांचे निलंबन तात्काळ रद्द करण्याची मागणी मंजुनाथ नाईक समर्थकांनी केली आहे. यासंदर्भात आज गुरुवारी (ता. 26) तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात, पोलिस निरीक्षक नाईक हे प्रामाणिक अधिकारी आहेत.भाजपचे आमदार सी. टी. रवी यांना अटक करून खानापूरात आणले होते. त्यावेळी नाईक यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात […]