समांतर क्रांती / ब्युरो रिपोर्ट
मंगळवारी (१६) खानापूर पोलिस स्थानकाचे हेड कॉन्स्टेबल जयराम हमन्नावर यांची तडकाफडकी बदली झाल्यानंतर आता पुढचा नंबर कुणाचा? पोलिस खात्यातीलच ‘थ्री स्टार’ अधिकाऱ्याची उचलबांगडी होणार असल्याची खमंग चर्चा पोलिस खात्यात आहे. गेल्या कांही महिन्यांपासून खानापूर पोलिस स्थानक हद्दीत भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली आहे. त्याचाच हा परिपाक आहे.
तालुक्यातील सत्तापालट झाल्यानंतर पारदर्शक प्रशासनाची आपेक्षा होती. पण, सध्या ‘कांचनमं सिध्दी’च्या तत्वावर शासकीय कार्यालयांचे व्यवहार चालले आहेत. थेट तहशिलदारांवर गैरव्यवहाराचा आरोप झाल्याने तालुक्यातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. महसूल, पोलिस, वन खाते, जिल्हा पंचायत उपविभाग, तालुका पंचायत कार्यालय, कृषी आणि शिक्षण या खात्यांमध्ये तर कागदावर पैशांचे वजन ठेवल्याशिवाय सर्वसामान्यांचे एकही काम होत नाही. शासकीय कार्यालयातील दलालांच्या फलटणी तर उदंड झाल्या आहेत.
महसूल खात्यातील जमिनींच्या खरेदी-विक्रीत अंदाधुंदी माजली आहे. अधिकारीच जमिनींच्या नोंदीत चुका काढून ती जमिन खरेदी करून ‘जमिनदार’ बनले आहेत. त्यात महसूल निरीक्षक आणि तलाठी दलाली करीत असून इतर कामांत त्यांना अजिबात स्वारस्य राहिलेले नाही. त्यांची कार्यालये त्यांचे ‘पंटर’ सांभाळतात. परणिामी, एकही काम वेळेत पूर्ण होत नाही. अगदी तशीच स्थिती इतरही खात्यात आहे.
विशेषत: पोलिस आणि वन खात्यात भ्रष्टाचाराने कळस केला आहे. शहर आणि पोलिस स्थानकाच्या हद्दील ग्रामिण भागात अवैध धंदे चालले असतांना त्यांना पोलिसच पाठीशी घालत आहेत. तक्रार देणाऱ्याचीच उलटतपासणी करण्याचा अजब प्रकार पोलिस स्तानकात पहावयास मिळत आहे. अवैध व्यवसायांवरील छापे आणि धाडी ही पोलिस खात्याच्या कमाईचा ‘महामार्ग’ बनला आहे. वाहन तपासणीच्या नावाखाली पोलिस कर्मचाऱ्यांचे प्रताप जोरावर आहेत. धनदांडग्यांना आणि दलालांना पोलिसांनी आश्रय दिला आहे. त्यातही तालुक्यातील सत्ताधारी पक्षाच्या ‘दलालां’ची चलती आहे. हे नुकताच उघडकीस आलेल्या अंगणवाडी घोटाळ्यावरून स्पष्ट झाले आहे.
वाळू तस्करीत पोलिसांची ‘हप्तेगिरी’ कुणाच्या आशिर्वादाने सुरू आहे? हे आता लपून राहिलेले नाही. शहरातील एका लॉजवर छापा मारून तेथे कोणतीच कारवाई करण्यात आले नसल्याची तक्रार जिल्हा पोलिस प्रमुखांपर्यंत पोहचली असल्याने आता पोलिस खात्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पहिला बळी ठरलेले जयराम हमन्नावर सध्या जिल्हा पोलिस प्रमुखांच्या ‘कंट्रोल’मध्ये आहेत. अधिवेशन उरकल्यानंतर तात्काळ येथील पोलिस खात्याच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्याची सुरूवात ‘थ्री स्टार’ अधिकाऱ्याच्या उचलबांगडीपासून होणार असल्याची चर्चा पोलिस खात्यात दबक्या आवाजात सुरू आहे.
- काँग्रेस जोरावर, अधिकारी धारेवर!
गेल्या कांही दिवसांपासून काँग्रेसने भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात शड्डू ठोकला आहे. पोलिस खात्याकडून होत असलेल्या कारभारावर वेळोवेळी आवाज उठविला आहे. अंगणवाडी घोटाळ्यात काँग्रेसचे अध्यक्ष ॲड.ईश्वर घाडी यांनी निर्वाणीचा इशारा देण्या दिल्यानंतर कारवाई करण्यात आली. खानापूर भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी काँग्रेसने मोहीम हाती घेतल्याचे समजते. पण, त्यांचेच सरकार राज्यात असतांना काँग्रेसच्या नेत्यांनी निवेदने आणि आंदोलनांच्या आरती ओवाळण्यापेक्षा सरकार दरबारी थेट तक्रारी करून हा भ्रष्टाचारी रोग समूळ नष्ट करावा, अशी जनतेची आपेक्षा आहे.
- लोकप्रतिनिधींचा वचक नसल्याने..
येथील कोणत्याच खात्याच्या अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधींचा वचक राहिलेला नाही. प्रशासकीय यंत्रणा हाताळण्यात आमदार कुचकामी ठरत असल्याने अधिकारी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून नागरीकांना त्रास देत आहेत. लाचखोरीने कळस गाठला आहे. एकीकडे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर वचक नाही, तर दुसरीकडे ‘भविष्यातील आमदार’ दलालांना पाठीशी घालत आहेत. आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळतांना जनसामान्यांवर अन्याय करण्याचा सपाटा त्यांनी चालविला असल्याचे दिसून येत आहे.
पाच रुपयांच्या नाण्यांचे चलन बंद होणार?
समांतर क्रांती / ब्यूरो रिपोर्ट आरबीआयने जाड असलेल्या ५ रुपयांच्या जुन्या नाण्यांवर बंदी घातल्याची बातमी सध्या पसरत आहे. ही नाणी चलनातून मागे घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे. सरकारने या नाण्यांचे उत्पादन थांबवले आहे. पण अद्याप रिझर्व्ह बँकेने अधिकृत घोषणा केलेली नाही. दरवर्षी किती नाण्यांची टांकसाळ करायची हे केंद्र सरकार ठरवते. यानंतर, सरकार रिझर्व्ह बँक ऑफ […]